Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पालघरच्या भोगोलेपाड्यात बिबट्या जेरबंद

पालघरच्या भोगोलेपाड्यात बिबट्या जेरबंद

पालघर : पालघर तालुक्यातील नवली येथील भोगोलेपाडा परिसरात वासरांवर हल्ला करणार्‍या बिबट्याला अखेर वनविभागाने जेरबंद केले आहे. गुरुवार, १९ नोव्हेंबर रोजी पहाटे बिबट्याच्या हल्ल्याची घटना घडल्यानंतर वनविभागाने युद्धपातळीवर शोधमोहीम राबवली.

शुक्रवार, २० नोव्हेंबर रोजी पहाटे बिबट्या पिंजर्‍यात अडकला. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.घटनेची माहिती मिळताच पालघर वनपरिक्षेत्रातील अधिकारी-कर्मचारी आणि डहाणू येथील बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी थर्मल ड्रोन, थेट प्रक्षेपण करणारे कॅमेरे आणि स्वयंचलित छायाचित्रण यंत्रणेचा वापर करण्यात आला. १९ नोव्हेंबर रोजी परिसरात पिंजरा लावण्यात आला होता.

वनकर्मचार्‍यांनी ग्रामस्थांमध्ये जनजागृती करत बाहेर बांधलेली जनावरे सुरक्षित ठिकाणी हलवली. अखेर पहाटेच्या सुमारास बिबट्या पिंजर्‍यात अडकला.या मोहिमेसाठी पालघर वनपरिक्षेत्र कार्यालयाने सहा पथके तयार केली होती. संवेदनशील भागांमध्ये नियमित गस्त घालून बिबट्याचे पावलांचे ठसे, शिकारीचे अवशेष आणि इतर पुरावे तपासले जात होते. गुगल अर्थवरील मार्गदर्शन प्रणालीचाही वापर करण्यात आला.

जेरबंद बिबट्याला ठाणे येथील वन्यजीव उपचार केंद्रात हलविण्यात येणार असून, तेथे त्याची वैद्यकीय तपासणी, आरोग्याची पाहणी आणि ओळख निश्चित केली जाणार आहे. ही मोहीम उपवनसंरक्षक निरंजन दिवाकर आणि सहायक वनसंरक्षक रामानुज बांगड यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी सुशील नांदवटे व त्यांच्या पथकाने यशस्वी केली. डहाणू बचाव पथक, वन्यजीव संवर्धन संस्था आणि ग्रामस्थांनीही महत्त्वपूर्ण सहकार्य केले.दरम्यान, बिबट्या जेरबंद झाला असला तरी नागरिकांनी निष्काळजीपणा करू नये. रात्री एकट्याने बाहेर पडू नये, लहान मुलांना घराबाहेर एकटे सोडू नये आणि पाळीव जनावरे सुरक्षित गोठ्यात ठेवावीत, असे आवाहन वनविभागाने केले आहे. बिबट्या दिसल्यास गर्दी किंवा पाठलाग न करता तातडीने वनविभागाच्या १९२६ या टोल फ्री क्रमांकावर माहिती द्यावी, असे वनपरिक्षेत्र अधिकारी सुशील नांदवटे यांनी स्पष्ट केले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar