पालघर : राज्य शासनाच्या 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६' अंतर्गत पालघर जिल्ह्यातील पात्र शेतकर्यांची तब्बल १०५ कोटी १० लाख ७० हजार रुपयांची कर्जरक्कम माफ होणार असून, या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी शेतकर्यांनी आधार प्रमाणीकरण तातडीने पूर्ण करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की, २९ जुलैपर्यंत ५,३९४ शेतकर्यांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण केले असून आणखी ५,०९० शेतकर्यांचे प्रमाणीकरण बाकी आहे. पात्र शेतकरी वेळेत प्रक्रिया पूर्ण करतील, तेव्हाच त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळू शकणार आहे. या योजनेअंतर्गत १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ दरम्यान वितरित झालेल्या आणि ३० सप्टेंबर २०२५ रोजी थकीत असलेल्या दोन लाख रुपयांपर्यंतच्या पीक कर्जाची माफी दिली जाणार आहे.
दोन लाखांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या शेतकर्यांसाठी एकवेळ समझोता योजना लागू करण्यात आली असून, अतिरिक्त रक्कम भरल्यानंतर त्यांनाही दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. वेळेत कर्जफेड करणार्या शेतकर्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार असल्याची माहितीही डॉ. जाखड यांनी दिली. पालघर जिल्ह्यातील १४,०५३ कर्जखाती योजनेसाठी सादर करण्यात आली असून, पहिल्या टप्प्यात १०,४८४ कर्जखात्यांची आधार प्रमाणीकरणासाठी निवड करण्यात आली आहे. तालुकानिहाय पाहता वाडा, पालघर, विक्रमगड, मोखाडा आणि डहाणू येथे सर्वाधिक शेतकर्यांनी प्रमाणीकरण पूर्ण केले आहे. मात्र मोखाडा, डहाणू, तलासरी आणि जव्हार येथे अद्याप मोठ्या संख्येने शेतकर्यांचे प्रमाणीकरण प्रलंबित असल्याने त्यांनी विलंब न करता प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

