वसई : प्रवाशांशी व्यवहार करताना संवाद साधता यावा, यासाठी अमराठी रिक्षाचालकांना किमान व्यावहारिक मराठीचे ज्ञान असणे बंधनकारक करण्यात आले आहे. राज्य सरकारने दिलेली १५ ऑगस्टची मुदत पूर्ण झाली असून, पालघर जिल्ह्यातील तब्बल ११ हजार ६४० अमराठी रिक्षाचालकांनी मराठी भाषेचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे.
त्यामुळे रिक्षाचालक आणि प्रवाशांमधील संवाद अधिक सहज होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
महाराष्ट्रात अनेक वर्षे वास्तव्य करूनही मराठीत संवाद न साधणार्या रिक्षाचालकांचा मुद्दा चर्चेत आल्यानंतर राज्य सरकारने अमराठी रिक्षाचालकांना मराठी शिकविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार १ जूनपासून परिवहन विभाग, कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघ यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यभरात मोफत 'मराठी भाषा अभ्यास केंद्रे' सुरू करण्यात आली.
पालघर जिल्ह्यात वसई-विरार परिसरात परराज्यातून मोठ्या प्रमाणावर स्थलांतर झाल्याने अमराठी रिक्षाचालकांची संख्या अधिक आहे. त्यामुळे वसई, विरार, नालासोपारा आणि नायगाव परिसरात एकूण १६ प्रशिक्षण केंद्रे सुरू करण्यात आली. रिक्षा परवाना रद्द होण्याची शक्यता असल्याने चालकांनी या प्रशिक्षणाला मोठा प्रतिसाद दिला.
या प्रशिक्षणामध्ये अवघड व्याकरण किंवा साहित्यिक मराठी शिकवण्याऐवजी रिक्षाचालकांना रोजच्या व्यवहारात उपयोगी पडणार्या साध्या मराठीवर भर देण्यात आला. प्रवाशांना कुठे जायचे आहे, भाडे किती झाले, सुट्टे पैसे आहेत का, यांसारखी दैनंदिन संभाषणातील वाक्ये शिकविण्यात आली. तसेच प्रवाशांशी नम्रपणे आणि आदराने कसे बोलावे, याचेही मार्गदर्शन करण्यात आले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर रिक्षाचालकांची तोंडी परीक्षा घेण्यात आली. ही प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण करणार्या चालकांना कोकण मराठी साहित्य परिषद आणि परिवहन विभागाच्या वतीने प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत. पालघर जिल्ह्यातील रिक्षाचालकांनी या उपक्रमाला चांगला प्रतिसाद दिला असून, ११ हजार ६४० चालकांनी प्रशिक्षण पूर्ण केले आहे. त्यामुळे आता प्रवाशांशी दैनंदिन व्यवहार करताना किमान व्यावहारिक मराठीत संवाद साधणे त्यांना शक्य होणार असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकार्यांनी दिली.
पालघरात ३८७ जणांना मराठी प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र
प्रवाशांशी मराठीतून सहज आणि आत्मीयतेने संवाद साधता यावा, यासाठी पालघरात रिक्षाचालकांसाठी राबविण्यात आलेल्या 'महाराष्ट्र माझा, मराठी माझी संवाद भाषा' या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या प्रशिक्षणांतर्गत पालघर केंद्रातील तब्बल ३८७ रिक्षाचालकांनी मराठी संवादाचे प्रशिक्षण पूर्ण केले असून, बुधवारी झालेल्या प्रमाणपत्र वितरण सोहळ्यात त्यांना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. प्रशिक्षणाची अंतिम मुदत १५ ऑगस्ट २०२६ निश्चित करण्यात आली होती. त्यानुसार पालघर केंद्रात १४ जून ते ५ ऑगस्ट २०२६ या कालावधीत सात बॅचमध्ये प्रशिक्षण घेण्यात आले. प्रमाणपत्र वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी आर्यन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष केदार काळे होते. रिक्षा संघटना पालघरचे अध्यक्ष मनोज घरत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी निवेदिता कवळे, दर्शन भंडारे आणि ज्ञानेश्वर माळी यांचीही प्रमुख उपस्थिती होती. प्रशिक्षक म्हणून उमेश कवळे, निर्मलसिंग वसावे, निवेदिता कवळे आणि दर्शन भंडारे यांनी जबाबदारी पार पाडली. केंद्र संचालक म्हणून नामदेव त्र्यंबक कवळे यांनी काम पाहिले.

