पालघर : हवामान विभागाने दिलेल्या रेड अलर्टनुसार गुरुवारी पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती.
दिवसभर झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक महत्त्वाचे रस्ते पाण्याखाली गेले, पुलांवरून पाणी वाहू लागले, काही ठिकाणी दरड कोसळली, तर रेल्वे वाहतुकीलाही मोठा फटका बसला. विक्रमगड तालुक्यात पाचमाड पुलावर पाणी आल्याने मनोर-नाशिक राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. त्यानंतर 24 जुलैला जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट असून वसई-विरार वगळून पालघर जिल्ह्यातील शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत.
जिल्ह्यात मासवण, भोपोली, बोईसर-सरावली, वाणगाव-चिंचणी, तारापूर बायपास, डहाणू-कोसबाड, झाई-बोर्डी, तलासरी, कासा, जव्हार, मोखाडा आणि वाडा परिसरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचल्याने किंवा पुलांवरून पाणी वाहू लागल्याने वाहतूक बंद ठेवावी लागली. मोखाडा येथे दरड कोसळल्यानेही मार्ग बंद झाला. मात्र, जिल्ह्यात कुठेही मोठी पूरस्थिती किंवा जीवितहानीची घटना घडली नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
धामणी धरण ९७ टक्के भरले
पालघर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सूर्या पाणी प्रकल्पातील धामणी धरण जवळपास पूर्ण क्षमतेने भरले आहे. धरणातील पाणी पातळी वेगाने वाढल्याने प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून पाचही दरवाजे उघडून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. धरणात समाधानकारक पाणीसाठा झाल्याने वसई-विरारच्या पाणीपुरवठ्याबाबत मोठा दिलासा मिळाला आहे.पालघर जिल्ह्यात यंदाच्या पावसाने चांगलीच हजेरी लावली असून १ जूनपासून आतापर्यंत तब्बल २,६६४ मीमी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या दोन दिवसातील संततधार आणि जोरदार पावसामुळे सूर्या पाणी प्रकल्पातील धामणी धरणातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली असून धरण आता ९७ टक्के भरले आहे.वसई-विरार शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी धामणी धरण महत्त्वाची भूमिका बजावते. या धरणातून दररोज सुमारे २०० दशलक्ष लीटर पाणी शहराला पुरवले जाते. शहराच्या एकूण पाणीपुरवठ्यातील जवळपास निम्मा वाटा या धरणाचा असल्याने पावसाळ्यात धरणातील जलसाठ्याकडे विशेष लक्ष ठेवले जाते. जुलैच्या सुरुवातीला धरणातील पाणीसाठा केवळ ५४ टक्के होता. मात्र पालघर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे धरणातील पाणी पातळी झपाट्याने वाढली. धरणाची पूर्ण संचय पातळी ११८.६० मीटर असून सध्या ती ११८.०० मीटरपर्यंत पोहोचली आहे. २७६.३५० दशलक्ष घनमीटर क्षमतेच्या धरणात सध्या २६८.०५५ दशलक्ष घनमीटर म्हणजेच ९७ टक्के पाणीसाठा जमा झाला असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.धरणात सुरू असलेली मोठ्या प्रमाणातील पाण्याची आवक लक्षात घेऊन प्रशासनाने २३ जुलै रोजी सकाळी ११ वाजता धरणाचे पाचही दरवाजे आणखी २५ सेंटीमीटरने उघडण्याचा निर्णय घेतला.
८९१ नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर
पालघर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने युद्धपातळीवर बचावकार्य राबवत आतापर्यंत २१८ कुटुंबांतील ८९१ नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित केले आहे. स्थलांतरित नागरिकांसाठी निवारा, जेवण, पिण्याचे पाणी आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून प्रशासन परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहे.डहाणू तालुक्यातील १६९ कुटुंबांतील ६९४ नागरिकांना ग्रामपंचायत कार्यालय कोलवली, सरावली तसेच जिल्हा परिषद शाळा चिंचणी येथे हलविण्यात आले आहे. तलासरी तालुक्यातील १४ कुटुंबांतील ६५ नागरिकांना सिटीजन हॉटेलमध्ये, तर पालघर तालुक्यातील ३५ कुटुंबांतील १२८ नागरिकांना जिल्हा परिषद शाळा खुताडपाडा येथे सुरक्षितपणे स्थलांतरित करण्यात आले. बचावकार्यासाठी तलासरी तालुक्यात मुंबई एनडीआरएफ आणि वसई-विरार महानगरपालिकेचे अग्निशमन दल, तर डहाणू तालुक्यात पालघर एनडीआरएफ आणि पालघर नगर परिषदेचे अग्निशमन दल तैनात करण्यात आले असून संभाव्य आपत्कालीन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड यांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता जिल्हा प्रशासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणार्या अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सर्व यंत्रणा २४ तास सज्ज असून आवश्यकतेनुसार बचाव व मदतकार्य अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

