पनवेल : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पनवेल महानगरपालिका हद्दीतील धोकादायक इमारतींमध्ये राहणार्या नागरिकांनी कोणताही धोका न पत्करता तातडीने सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे, तसेच सर्व गृहनिर्माण संस्थांनी आपल्या इमारतींचे संरचनात्मक (स्ट्रक्चरल) ऑडिट करून आवश्यक दुरुस्ती तातडीने पूर्ण करावी, असे आवाहन पालिका आयुक्त मंगेश चितळे यांनी पनवेलकरांना केले आहे.
सध्या राज्यातील विविध ठिकाणी तुलनेने कमी वयाच्या इमारतींचे स्लॅब कोसळण्याच्या घटना घडत असून, नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महानगरपालिकेने विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. सर्व सोसायट्यांनी तातडीने इमारतीचे संरचनात्मक परीक्षण करून घ्यावे. ऑडिट अहवालात इमारत 'सी-१' (अतिधोकादायक) श्रेणीत असल्याचे निष्पन्न झाले असल्यास त्याची माहिती तात्काळ महानगरपालिकेला द्यावी आणि संबंधित इमारत त्वरित रिकामी करून सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे.
हेही वाचा…महाराष्ट्र बंदला अभूतपूर्व प्रतिसाद, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा लढा सुरूच राहणार - प्रकाश आंबेडकर
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम २६४ ते २६८ तसेच शासनाच्या निर्देशांनुसार पनवेल महानगरपालिकेने सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी कार्यक्षेत्रातील धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणात प्रभाग समिती-अ मध्ये ४, ब मध्ये २०, क मध्ये ८ आणि ड मध्ये ३२ अशा एकूण ६४ इमारती 'सी-१' अर्थात अतिधोकादायक घोषित करण्यात आल्या आहेत. या सर्व इमारतींतील रहिवाशांना सदनिका रिक्त करण्याबाबत वेळोवेळी नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
मुंबई उच्च न्यायालय तसेच राज्य शासनाच्या निर्देशांनुसार संबंधित मालक किंवा भोगवटादार यांनी पुरेशी संधी देऊनही इमारत रिकामी करून पाडण्याची कार्यवाही न केल्यास अशा इमारतींचा वीज व पाणीपुरवठा खंडित करून, आवश्यकतेनुसार पोलिसांच्या मदतीने इमारत रिकामी करून पाडण्याची कारवाई महानगरपालिकेमार्फत करण्यात येत आहे.
तथापि, काही अतिधोकादायक इमारतींमध्ये अद्यापही नागरिक वास्तव्यास आहेत. पावसाळ्यात अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेता अशा इमारतींतील रहिवाशांनी विलंब न करता सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे आणि संबंधित इमारती स्वतःहून सुरक्षितरीत्या पाडण्याची कार्यवाही करावी, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
हेही वाचा…गांधी स्मृतीस्थळी इंडिया आघाडीची एकजूट; धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक
धोकादायक इमारत कोसळून कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित इमारतीतील रहिवासी, मालक व भाडेकरू यांची राहील. तसेच इमारतीचे संरचनात्मक ऑडिट करून घेण्याची जबाबदारीही संबंधित मालक किंवा भोगवटादार यांच्यावरच राहणार असून, त्यासाठी महानगरपालिका जबाबदार राहणार नाही, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
धोकादायक व अतिधोकादायक इमारतींची यादी पनवेल महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असून, नागरिकांनी आपल्या परिसरातील अशा इमारतींबाबत सतर्क राहून संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त मंगेश चितळे यांनी केले आहे.
आपत्कालीन परिस्थितीत संपर्क
दूरध्वनी : ०२२-७४५८०४० / ४१ / ४२
टोल फ्री क्रमांक : १८००-२२७-७०१

