अभिनेत्री प्राजक्ता माळीने अभिनयाच्या जोरावर सिनेसृष्टीत आणि प्रेक्षकांच्या मनात एक अढळ स्थान निर्माण केले आहे. केवळ अभिनयच नव्हे, तर आपल्या उत्तम नृत्यानेही तिने चाहत्यांना भुरळ घातली आहे.
कलाविश्वाव्यतिरिक्त तिने उद्योगक्षेत्रातही पाऊल टाकले असून, तिचा प्राजक्तराज हा दागिन्यांचा ब्रँड आहे. तसेच कर्जत येथे तिचे एक सुंदर फार्महाऊसही आहे. सध्या ती महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा सांभाळत आहे. दरम्यान, प्राजक्ताच्या आयुष्यात पुन्हा आनंदाची बातमी आली आहे. तिने नुकताच मुंबईत महागडा फ्लॅट खरेदी केला आहे. विशेष म्हणजे मुंबईतील तिचं हे दुसरं घर आहे. Prajkata Mali New Home
फ्लॅटची किंमत
सीआरई मॅट्रिक्स आणि बिझनेस स्टँडर्डने दिलेल्या माहितीनुसार प्राजक्ता माळीने गोरेगाव पूर्व येथील ओबेरॉय एक्झिक्विझिट या सोसायटीमध्ये 6.42 कोटी रुपयांना 996 स्क्वेअर फूटचा फ्लॅट खरेदी केला आहे. माहितीनुसार तिचं हे घर 28 व्या मजल्यावर आहे. त्याचबरोबर 240 चौरस फुटांची एक टँडम कार पार्किंग जागा देखील आहे. 12 ऑगस्ट 2026 रोजी या फ्लॅटची नोंद करण्यात आली आहे.
गृहकर्ज घेतले
या व्यवहारासाठी प्राजक्ताने 32.12 लाख रुपये स्टँप ड्युटी आणि 30 हजार रुपये नोंदणी शुल्क भरल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे घराच्या एकूण किमतीपैकी मोठा हिस्सा तिने गृहकर्जाच्या माध्यमातून उभारला आहे. कागदपत्रांवरील माहितीनुसार, प्राजक्ताने इंडियन बँकेकडून 5.78 कोटी रुपयांचं गृहकर्ज घेण्यात आलं असून या कर्जाला 28 जुलै 2026 रोजी मंजुरी मिळाली होती.
फार्महाऊस
काही वर्षांपूर्वी प्राजक्ताने पुण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कर्जतमध्ये कोट्यवधी रुपयांची प्रॉपर्टी विकत घेतली होती. ती तिचं फार्म हाऊस भाड्याने सुद्धा देते. हे फार्महाऊस कर्जत जवळील गौळवाळी गावात आहे. हे 3 बीएचके व्हीला आहे. त्यात तीन बेडरूम, स्विमिंग पूल, बार एरियासह किचन आणि अलिशान गार्डन आहे.
दागिन्यांचा ब्रॅंड
पारंपरिक दागिन्यांची आवड असल्याने 2023 साली तिने प्राजक्तराज हा दागिन्यांचा ब्रँड सुरू केला. यामध्ये फॅशनेबल नथी, गळ्यातले, कानातले आणि बरेच फॅशनेबल ऑप्शन्स आहेत.

