Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
प्रत्येक भूमिकेत स्वतःला नव्यानं सिद्ध करायचं आहे - विदुला चौगुले

प्रत्येक भूमिकेत स्वतःला नव्यानं सिद्ध करायचं आहे - विदुला चौगुले

राठी डिजिटल विश्वात तब्बल दशकभर प्रचंड लोकप्रिय ठरलेल्या 'स्ट्रगलर साला' या वेब सिरीजने आता मोठ्या पडद्यावर झेप घेतली आहे. या यशानंतर आता 'चावट' टीमचा 'मामाच्या गावाला जाऊया' हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला असून, अभिनेत्री विदुला चौगुले यात प्रमुख भूमिकेत झळकत आहे.

नव्या पात्रांची भर, ताज्या नात्यांची गुंफण आणि मनोरंजनाचा भन्नाट तडका असलेल्या या चित्रपटात विदुलाचा ग्लॅमरस आणि तितकाच दमदार अभिनयही पाहायला मिळत आहे. या सिनेमातील तिची भूमिका, अभिनेता अंकुश चौधरी आणि दिग्दर्शक विजू माने यांच्यासोबतचा अनुभव, तसेच आगामी वाटचालीविषयी अभिनेत्री विदुला चौगुले हिच्याशी साधलेला हा खास संवाद.


तब्बल दहा वर्ष गाजलेल्या 'स्ट्रगलर साला' वेब सिरीजचा आता सिनेमा झाला. मुख्य अभिनेत्री म्हणून तू यातून समोर आली आहेस. काय सांगशील तुझ्या भूमिकेबद्दल?
खरं सांगायचं तर ही माझ्यासाठी खूप आनंदाची आणि तितकीच जबाबदारीची गोष्ट आहे. 'स्ट्रगलर साला'चा स्वतःचा एक खूप मोठा चाहता वर्ग आहे. त्यामुळे या विश्वाचा भाग होणं म्हणजे माझ्यासाठी मोठी संधी होती. माझी भूमिका खूप उत्साही, बिनधास्त आणि आजच्या पिढीचं प्रतिनिधित्व करणारी आहे. ती फक्त ग्लॅमरस नाही, तर कथेला पुढे नेणारी व्यक्तिरेखा आहे. प्रेक्षकांना तिच्यात नक्कीच काहीतरी आपलं वाटेल, अशी आशा आहे.

वेब सिरीजमध्ये कुशल, संतोष, अभिजित यांच्या प्रमुख भूमिका होत्या. सिनेमात मात्र तुझ्यासोबत नेहा आणि रुचिरा अशी 'गर्ल गँग'ही दिसतेय. प्लॉट वेब सिरीजपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे का?
सिरीजवर प्रेम करणाऱ्या प्रेक्षकांना त्याचं फील नक्की मिळेल. पण हा सिनेमा फक्त सिरीजचा विस्तार नाही. यात नवीन पात्रं, नवीन नाती, नवीन संघर्ष आणि खूप मजेदार प्रसंग आहेत. आमची गर्ल गँग ही या सिनेमाची मोठी ताकद आहे. आमच्यातली मैत्री, मस्ती आणि संवाद प्रेक्षकांना खूप रिलेट होतील. त्यामुळे सिरीज आवडणाऱ्यांनाही काहीतरी नवीन अनुभवायला मिळेल.

सिनेमात अंकुश चौधरी प्रमुख भूमिकेत आहेत. त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव कसा होता?
अंकुश सरांसोबत याआधी काम केलं असल्यामुळे सुरुवातीपासून फारसं दडपण नव्हतं. ते खूप सहकार्य करणारे कलाकार आहेत. सेटवर ते वातावरण खूप हलकं-फुलकं ठेवतात. एखाद्या सीनमध्ये काही अडचण आली तर ते स्वतः मार्गदर्शन करतात. त्यांच्या अनुभवातून खूप काही शिकायला मिळालं. वरिष्ठ कलाकार असूनही ते नव्या कलाकारांना प्रोत्साहन देतात, ही त्यांची खूप मोठी जमेची बाजू आहे.

दिग्दर्शक विजू माने यांच्याबद्दल काय सांगशील?
विजू सर ग्रेट आहेत.कलाकाराकडून अगदी सहज आणि नैसर्गिक अभिनय करून घेतात. प्रत्येक सीनमागचं कारण ते समजावून सांगतात. त्यामुळे अभिनय करताना फक्त संवाद न बोलता ती भावना जगता आली. त्यांच्या सेटवर काम करताना खूप मोकळं वातावरण असतं. या भूमिकेमुळे अभिनेत्री म्हणून माझ्यात कॉन्फिडन्स वाढला.

'डार्लिंग' गाण्यात तुझा ग्लॅमरस लूक पाहायला मिळतोय. पुन्हा तुझी एक हटके इमेज पाहायला मिळणार का?
प्रत्येक कलाकाराला वेगवेगळ्या भूमिका करायला आवडतात. या गाण्यात माझा ग्लॅमरस लूक आहे. पण तो केवळ दिसण्यासाठी नाही. तो त्या पात्राचा भाग आहे. मला नेहमीच पात्राला न्याय देणं महत्त्वाचं वाटतं. प्रेक्षकांनी मला एका चौकटीत न पाहता प्रत्येक वेळी नवीन रूपात स्वीकारावं, एवढीच इच्छा आहे.

या सिनेमाचं कास्टिंग कसं झालं? आणि ही भूमिका किती महत्त्वाची वाटते?
ऑडिशन आणि लूक टेस्टनंतर माझी निवड झाली. जेव्हा ही भूमिका मिळाली तेव्हा खूप आनंद झाला. कारण हा केवळ आणखी एक सिनेमा नाही, तर एका लोकप्रिय फ्रँचायझीचा भाग आहे. त्यामुळे जबाबदारीही तितकीच होती.

मामाच्या गोव्याला जाऊया' नुकताच ३१ जुलैला प्रदर्शित झाला. प्रेक्षकांना काय सांगशील?
र्वांनी कुटुंबासोबत आणि मित्रमैत्रिणींसोबत थिएटरमध्ये येऊन हा सिनेमा जरूर पाहा. यात भरपूर मनोरंजन, विनोद, मैत्री, भन्नाट संगीत आहे. आम्ही मनापासून मेहनत घेतली आहे. प्रेक्षकांचे प्रेम आणि आशीर्वाद मिळावे असे वाटते.

पुढे विदुला कोणत्या भूमिकेतून दिसणार?
सध्या काही प्रोजेक्ट्सवर काम सुरू आहे. अजून अधिकृत घोषणा झालेली नाही त्यामुळे फार काही सांगू शकत नाही. पण एक गोष्ट नक्की, प्रत्येक वेळी प्रेक्षकांना वेगळी भूमिका पाहायला मिळावी यासाठी प्रयत्न करेन.

(लेखक आपलं महानगर ठाणे आणि रायगड आवृत्तीचे ब्यूरो चीफ आहेत.)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar