Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
'पुन्हा आपल्या मुळांकडे वळायचं होतं' - सायली साळुंखे

'पुन्हा आपल्या मुळांकडे वळायचं होतं' - सायली साळुंखे

हिंदी मालिकांमध्ये मुख्य नायिका म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केल्यानंतर अभिनेत्री सायली साळुंखे पुन्हा एकदा मराठी मालिकाविश्वात परतली आहे. स्टार प्रवाहवरील 'तुझ्याकडे तुला मागणे' या मालिकेत ती 'इरा' ही धाडसी, हुशार आणि स्वतंत्र विचारांची तरुणी साकारत आहे.

अनेक वर्षांनंतर मराठीत मुख्य भूमिका साकारताना सायली उत्सुक तर आहेच, पण आपल्या मुळांकडे परतण्याचा हा अनुभव तिच्यासाठी तितकाच भावनिकही आहे. राकेश बापटसोबतची केमिस्ट्री, 'इरा'च्या व्यक्तिरेखेतील विविध पदर, स्वतःच्या अनुभवातून पात्र घडवण्याची तिची पद्धत आणि प्रेक्षकांच्या अपेक्षांकडे ती कशा पद्धतीने पाहते, अशा विविध विषयांवर सायलीसोबत मनमोकळेपणाने साधलेला हा संवाद.


'तुझ्याकडे तुला मागणे' या नव्या मालिकेत तुझी निवड कशी झाली आणि जेव्हा तुला समजलं की तू 'इरा' साकारणार आहेस, तेव्हा तुझी पहिली प्रतिक्रिया काय होती?
मी दहा वर्षांपूर्वी मराठीत काम करत असताना वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. त्यानंतर कदाचित माझ्या नशिबात होतं म्हणून मला हिंदीमध्ये मुख्य नायिका साकारण्याची संधी मिळाली. गेल्या काही वर्षांत मी हिंदीमध्ये सहा-सात शो केले आहेत. आताही माझ्याकडे हिंदी शोचा आणि मराठी शोचा, असे दोन्ही पर्याय होते. पण मला हा शो जास्त चांगला वाटला. मला असं वाटलं की, पुन्हा एकदा आपल्या मुळांकडे वळूया आणि नव्याने ही सुरुवात करून पाहूया. माझी ही जर्नी पुढे कशी असेल, मलाही माहीत नाही. पण मी आशावादी आहे आणि त्यासाठी मेहनतही घेत आहे. त्यामुळे ही जर्नी सुंदरच असावी आणि स्टार प्रवाह वाहिनीवरील 'तुझ्याकडे तुला मागणे' हा शो प्रेक्षकांना खूप आवडावा, अशी माझी मनापासून इच्छा आहे. पहिली प्रतिक्रिया म्हणाल, तर माझ्यामध्ये एक वेगळा आत्मविश्वास आणि छान ऊर्जा नक्कीच आहे. अनेक वर्षांनंतर पुन्हा मराठीत काम करण्याची आणि काहीतरी वेगळं करण्याची संधी मला मिळाली आहे. त्यामुळे हे एक आव्हानही आहे.

हिंदी मालिकांमध्ये मुख्य भूमिका गाजवल्यानंतर पुन्हा एकदा मराठी मालिकेत मुख्य नायिका म्हणून कमबॅक करताना तुझ्या काय भावना आहेत?
मी खरंच खूप एक्साइटेड आहे. कारण खूप वर्षांनंतर मी मराठीत काम करते आहे. त्याचबरोबर थोडी नर्व्हसही आहे. लोकांना माझं काम आवडेल का? लोक मला पुन्हा मराठीत स्वीकारतील का? त्यांच्या काय प्रतिक्रिया असतील? हे जाणून घेण्यासाठीही मी खूप उत्सुक आहे. त्यामुळे नर्व्हसनेस आणि एक्साइटमेंट दोन्ही आहेत. पण माझा स्वतःवर विश्वास आहे. मला हा शो खूप आवडला आणि त्याचा कॉन्सेप्टही खूप आवडला. त्यामुळे पुढे काय नशिबात आहे, ते बघूया.

या मालिकेत अभिनेता राकेश बापट मुख्य भूमिकेत आहे. राकेशच्या प्रोमोनंतर नायिकेबद्दल खूप उत्सुकता होती. त्याच्यासोबत स्क्रीन शेअर करण्याचा तुझा अनुभव कसा आहे?
राकेशच्या प्रोमोआधी खरं सांगायचं तर मी ही गोष्ट फार कमी लोकांना सांगितली होती. माझ्या मित्रमंडळींनाही याबद्दल माहिती नव्हतं. अगदी माझ्या कुटुंबासाठीही हा एक सरप्राइज होता की, मी असा मराठी शो करते आहे. माझ्या कुटुंबाची खूप इच्छा होती की मी पुन्हा मराठी शो करावा. त्यामुळे मला त्यांना हा सरप्राइज द्यायचा होता. जेव्हा माझा प्रोमो आउट झाला, तेव्हा ते खूप खूश आणि एक्साइटेड झाले. राहिला प्रश्न राकेशसोबत काम करण्याचा, तर सध्या मला त्याच्यासोबत फारशी कामं करण्याची संधी मिळालेली नाही. आमचे एकमेकांसमोरचे फारसे सीन्स अजून आलेले नाहीत. पण राकेशसोबत काम करताना एक छान एनर्जी आणि पॉझिटिव्ह वातावरण जाणवतं. त्यामुळे त्याच्यासोबत काम करताना मला नक्कीच मजा येणार आहे आणि प्रेक्षकांनाही आम्हाला एकत्र पाहताना तेवढीच मजा येईल.

'इरा' हे पात्र धाडसी, हुशार आणि स्वतंत्र विचारांचं आहे; खर्‍या आयुष्यातील सायली आणि 'इरा' यात किती साम्य आहे?
आपण एक कलाकार म्हणून दिवसाचे जवळपास बारा तास सतत काम करत असतो आणि महिन्याचे तीसही दिवस काम असतं. त्यामुळे एखादं पात्र पूर्णपणे घडवणं ही खरंच कठीण गोष्ट आहे. कारण जेव्हा आपण सिनेमा किंवा वेब सीरिज करतो, तेव्हा एका पात्रावर काम करण्यासाठी आपल्याला किमान दोन-तीन महिने किंवा कधी सहा-सहा महिनेही मिळतात. पण टीव्हीमध्ये तसं नसतं. कास्टिंग झालं, भूमिका निश्चित झाली, प्रोमो शूट झाले आणि लगेच शूटिंग सुरू होतं. आज सकाळी एखादा सीन झाला, तर संध्याकाळी त्याच पात्राचे पुढचे सीन्स शूट होत असतात. त्यामुळे त्या दरम्यान एखादं पात्र तयार करणं खूप कठीण असतं. माझ्या अनुभवातून मला असं वाटतं की, सायली आणि इरा या दोघांच्या व्यक्तिमत्त्वातील काही गुण पकडून आणि त्यांचा एक समतोल साधून हे पात्र मी साकारते. आजवर मी जितकी पात्रं केली आहेत, त्यात जवळपास ८० टक्के सायली असते आणि उरलेली २० टक्के त्या लेखकाने, दिग्दर्शकाने किंवा निर्मात्याने लिहिलेली व्यक्तिरेखा असते. त्या पात्रामध्ये माझ्याकडून काहीतरी देण्याचा मी प्रयत्न करते आणि त्याला किती न्याय देता येईल, हे पाहते. पण कुठेतरी आपण नैसर्गिकपणे परफॉर्म करतो आणि आपल्यातला काही भाग त्या पात्रातून बाहेर येतो. त्यामुळे माझ्या मते हे फिफ्टी-फिफ्टी असतं. माझ्या आताच्या पात्रामध्ये आणि माझ्या स्वतःमध्येही अनेक साम्य आहेत.

इराच्या भूमिकेला अनेक पदर आहेत. अशा गुंतागुंतीच्या आणि प्रभावी भूमिकेसाठी तू विशेष काही तयारी किंवा अभ्यास केलास का?
एका कलाकाराचा सगळ्यात मोठा अभ्यास म्हणजे त्याचा अनुभव आणि त्याचं निरीक्षण. आपण आपल्या आयुष्यात आजूबाजूच्या अनेक छोट्या-छोट्या गोष्टी सतत निरीक्षण करत असतो. आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये, आई-वडिलांच्या वागण्यात किंवा प्रवासात भेटणार्‍या वेगवेगळ्या व्यक्तींमध्ये आपण काही ना काही पाहत असतो. त्या गोष्टी नकळत आपल्या मनात साठत जातात आणि पुढे आपल्या परफॉर्मन्समध्ये त्याचा उपयोग होतो. त्यामुळे माझ्यासाठी ऑब्झर्वेशन खूप महत्त्वाचं आहे. इराच्या पात्रात अनेक लेयर्स आहेत. लेखकाने तिची जर्नी खूप सुंदर लिहिली आहे. कधी ती दुःखी आहे, कधी आनंदी आहे, तर कधी आयुष्यातल्या अनेक चढ-उतारांमधून ती जात आहे. हे सगळं अनुभवताना मला असं वाटतं की, प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात अशा भावना अनुभवत असते. फक्त त्या अनुभवण्याची कारणं किंवा उदाहरणं वेगवेगळी असतात; पण भावना मात्र सारख्या असतात. मला वाटतं की, योग्य वेळी योग्य भावना मनापासून फिल करायच्या आणि त्या प्रामाणिकपणे व्यक्त करायच्या. त्यामुळे पात्र साकारण्याची प्रक्रिया सोपी होते. त्याचबरोबर बारा तासांचं शूटिंगही मग तितकं हेक्टिक वाटत नाही. अनेक शो आणि सीरियल केल्यानंतर एका कलाकारामध्ये एक सहजपणा आपोआप येत जातो. विशिष्ट सीन्ससाठी कधी कधी विशेष मेहनत घ्यावी लागते. त्याव्यतिरिक्त दिग्दर्शक त्यांचा व्हिजन सांगतात, आपण आपलं काम करतो आणि त्यातून दोघांमध्ये एक सुंदर इक्वेशन तयार होतं. हळूहळू एक पात्र तयार होतं आणि अशा पद्धतीने आम्ही ते एन्जॉय करतो.

इरा ही कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला असलेली मुलगी दाखवली आहे. ही भूमिका करताना तुला तुझे कॉलेजचे दिवस आठवले का? सायली कॉलेजमध्ये कशी होती?
खरं सांगायचं झालं तर मला माझ्या कॉलेजच्या दिवसांचा फारसा आनंद घेता आला नाही. मी अकरावी-बारावी पूर्ण केली आणि त्यानंतर ओपन युनिव्हर्सिटीमधून पुढचं शिक्षण पूर्ण केलं. कारण बारावीनंतरच मी या इंडस्ट्रीमध्ये आले. शूटिंग आणि कॉलेजची अटेंडन्स या दोन्ही गोष्टी एकत्र सांभाळणं शक्य नव्हतं. कॉलेजमध्ये ८० ते ९० टक्के उपस्थिती गरजेची होती आणि ती मला राखता येत नव्हती. त्यामुळे मला पुढचं शिक्षण ओपन युनिव्हर्सिटीमधून पूर्ण करावं लागलं. मात्र माझे शाळेचे दिवस मी खूप आनंदात आणि मजेत घालवले आहेत. त्यामुळे कॉलेजचे दिवस मी फार मिस करत नाही. 'अरे, आपण कॉलेजमध्ये एवढी मजा का केली नाही?' अशी खंतही मला वाटत नाही. कारण शाळेतच मी खूप मजा केली आहे. मला असं वाटतं की, माझ्यात अजूनही एक लहान बाळ दडलेलं आहे. माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये आणि कुटुंबात मी अजूनही एका लहान मुलीसारखीच असते आणि माझे खूप लाडही केले जातात. त्यामुळे माझ्यातला तो बालिशपणा किंवा चाइल्डिश नेचर अजूनही कायम आहे आणि म्हणूनच एखादं आणखी तरुण पात्र साकारताना त्याचा मला फायदाही होतो.

इंडस्ट्रीतील तुझ्या आधीच्या कामांमुळे प्रेक्षकांच्या तुझ्याकडून खूप अपेक्षा आहेत. या अपेक्षांचे दडपण वाटते की नवी ऊर्जा मिळते?
माझ्या या स्टेटमेंटवर कदाचित काही लोकांना वाईटही वाटू शकतं. पण काय होतं ना, प्रेक्षकांमध्ये काही लोक असे असतात जे तुम्हाला खूप सपोर्ट करतात, तर काही लोक असेही असतात जे तुमच्यावर टीका करतात किंवा तुम्ही पुढे जात असतानाही तुमच्याबद्दल काही ना काही वाईट बोलतात. म्हणून मला असं वाटतं की, मी या इंडस्ट्रीमध्ये काम करते ते सगळ्यात आधी माझ्यासाठी. मला कामातून आनंद मिळतो, समाधान मिळतं. मला कलाकार व्हायचं होतं ते कोणाला काही सिद्ध करण्यासाठी नाही, तर स्वतःसाठी. मी जेव्हा बारा तास काम करते, तेव्हा दिवसाच्या शेवटी मला त्याचं समाधान मिळतं. माझ्यासाठी माझी मेहनत, माझी जिद्द आणि माझं डेडिकेशन हे जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे सगळ्यात आधी मला स्वतःला त्या भूमिकेला न्याय द्यायचा आहे. दडपण मला फारसं येत नाही. कधी कधी नक्कीच वाटतं की, 'लोकांना काय वाटेल? प्रेक्षकांना मी आवडेन का?' पण एका टप्प्यानंतर मी पुन्हा माझ्या मूळ विचारांकडे येते. स्वतःला सिद्ध करण्यासाठी आणि स्वतःच्या कामाला न्याय देण्यासाठी मी कलाकार झाले. म्हणून कोणाचंही दडपण मी घेत नाही. मध्ये मध्ये नक्कीच वाटतं की प्रेक्षकांनी मला पसंत केलं पाहिजे, लोकांना मी आवडली पाहिजे. पण पुन्हा मी स्वतःला आठवण करून देते की, मी माझ्यासाठी काम करते आहे. मी मनापासून मेहनत केली आणि मला माझं काम आवडलं, तर कालांतराने ते प्रेक्षकांनाही नक्कीच आवडेल, असं मला वाटतं.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar