मुंबई : पुण्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मिरवणुकीतील डीजे (DJ) आणि लेझर लाईट्सच्या वापरावरून सध्या मोठा वाद रंगला आहे. हा वाद प्रामुख्याने ध्वनीप्रदूषण, नागरिकांचे आरोग्य आणि उत्सवाची परंपरा या मुद्द्यांभोवती फिरत आहे.
गेल्या काही दिवसापासून पुण्यामध्ये दोन मतप्रवाह दिसून आले आहेत. एकीकडे पुणेकरांनी डीजेला विरोध केला आहे. तर, दुसरीकडे पुण्यातील काही गणेश मंडळांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. यावरून पुण्यामध्ये 30 ऑगस्ट रोजी काही नागरिकांनी पुण्यात डीजे नको, असे म्हणत आंदोलनही केले आहे. या प्रकरणात काँग्रेसनेही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे आता हे प्रकरण चांगलेच चिघळले आहे. Pune DJ Dolby in Ganeshotsav 2026
डीजे-डॉल्बी विरोधात पुण्यात आंदोलन
रविवारी (30 ऑगस्ट) डीजे आणि डॉल्बीच्या विरोधात पुण्याच्या डेक्कन येथील गुडलक चौक आणि अभिनव चौक येथे भव्य आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. नागरिकांनी 'आवाज नको, आरती ऐकू द्या' आणि 'डीजे बंद करा, पुण्याची संस्कृती जप' अशा घोषणा देत विरोध केला. गणेशोत्सवात आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या आणि लेझर लाईट्सचा अतिरेक करणाऱ्या डीजेवर बंदी घालावी, यासाठी पुणेकरांनी आणि सामाजिक संस्थांनी ऑनलाइन पेटीशन सुरु केले असून त्याला हजारो नागरिकांनी पाठिंबा दिला आहे.
पुण्यातील डीजे आणि डॉल्बीवरून वाढता वाद पाहता काही नागरिक संघटना आणि गणेश मंडळे यांच्यात सकारात्मक चर्चा झाली. पारंपरिक पद्धतीने सण साजरा करण्यासाठी आणि संवाद साधण्यासाठी 'पुणेकर - सुजाण नागरिकांची ठाम भूमिका' अंतर्गत काढण्यात येणारा पायी मोर्चा काही ठिकाणी प्रशासकीय परवानगी आणि सामोपचारामुळे बदलण्यात आला, तरीही सकल हिंदू समाज व इतर संघटना पारंपरिक वाद्यांच्या समर्थनासाठी आग्रही आहेत. पुण्यात जवळपास 200 हून अधिक गणेश मंडळांनी स्वतःहून यंदाचा गणेशोत्सव डीजेमुक्त ठेवण्याचा तसेच केवळ पारंपरिक ढोल-ताशा आणि बँडला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे.
काँग्रेसची भूमिका काय ?
पुण्यातील डीजे आणि डॉल्बी विरोधावरून काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केली. काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले की, "गणेशोत्सव वैभवशाली आणि पारंपारिक असल्यामुळे या उत्सवात पारंपारिक वाद्यांचा समावेश असावा. डीजेचा उन्माद गणेशोत्सवाला बदनाम करतो आहे, त्यामुळे अनेकांचे कानाचे पडदे फाटले आहेत किंवा अनेक आजार काही लोकांना झाले आहेत. काँग्रेस पक्षाची भूमिका आहे की, गणेशोत्सव पारंपारिक वाद्य असावीत लाऊड स्पीकर हवा पण डीजे नको." असे म्हणत डीजेच्या विरोधाला पाठिंबा दिला आहे.

