मैत्रीचे गीत म्हणून लोकप्रिय ठरलेले 'तेरा यार हूं मैं' हे गाणे अनेक वर्षांनंतरही श्रोत्यांच्या मनात घर करून आहे. या गाण्याला आजही लाखो व्ह्यूज आणि स्ट्रीम्स मिळत असून ते श्रोत्यांच्या आवडत्या गाण्यांपैकी एक आहे.
अशा या गाण्याला आकार देणारी अरिजित सिंग, रोचक कोहली, कुमार आणि लव रंजन यांची टीम पुन्हा एकदा 'पहला प्यार दूसरी बार' या चित्रपटातील 'पुराने दिन' या गाण्यासाठी एकत्र आली आहे.
'तेरा यार हूं मैं' हे गाणे मैत्रीतील घट्ट नात्याचे दर्शन घडवते, तर 'पुराने दिन' हे गाणे प्रेक्षकांना मैत्रीशी जोडलेल्या सुंदर आठवणींच्या जगात घेऊन जाते. या नव्या गाण्यात तारुण्यातील प्रेमाची भावना, वर्गात लपूनछपून एकमेकांकडे पाहणे, न बोलताही मनातील भावना समजून घेणे आणि दररोज आपल्या आवडत्या व्यक्तीला पाहण्यासाठी मनात असलेली उत्सुकता अशा अनेक हळुवार क्षणांचे दर्शन घडते.
या गाण्याला रोचक कोहली यांनी संगीतबद्ध केले असून, अरिजित सिंग यांनी आपल्या सुरेल आवाजाने ते सजवले आहे. कुमार यांनी लिहिलेल्या 'पुराने दिन' या गाण्याला हळुवार आणि मनाला भिडणारे संगीत लाभले आहे, जे नव्या प्रेमातील निरागसता आणि ऊब सुंदरपणे व्यक्त करते. या गाण्यामुळे तुषार छिब्बर, सरगुन कौर लूथरा, कुणाल वैद, साक्षी वैद्या, स्पर्श वालिया आणि अलीशा चोप्रा या सहा प्रमुख कलाकारांच्या कथेला भावनिक स्पर्श मिळतो. गाण्यात सर्व कलाकारांची पात्रे मैत्री, मनातील भावना आणि आपल्या प्रेमकथेच्या सुरुवातीच्या टप्प्यातून प्रवास करताना दिसतात.
संगीतकार रोचक कोहली म्हणतात, "'तेरा यार हूं मैं' या गाण्याला आजही ज्या प्रकारचे प्रेम मिळत आहे, त्याबद्दल मी मनापासून आभारी आहे. 'पुराने दिन'च्या निमित्ताने लव रंजन, अरिजित आणि कुमार यांच्यासोबत पुन्हा काम करण्याची आणि प्रत्येकाच्या मनाला भावणाऱ्या एका खास भावनेचा, म्हणजेच पहिल्या प्रेमाच्या निरागसतेचा, वेध घेण्याची संधी मिळाली, याचा मला आनंद आहे. ऐकताना ओळखीचे वाटेल, पण तरीही एक नवा अनुभव देईल, असे गाणे तयार करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. 'पुराने दिन'देखील पुन्हा तोच जादुई अनुभव निर्माण करेल आणि येणाऱ्या अनेक वर्षांपर्यंत लोकांच्या मनाशी जोडलेले राहील, अशी मला आशा आहे."
गीतकार कुमार पुढे म्हणतात, "'तेरा यार हूं मैं' आणि 'पुराने दिन' ही दोन्ही गाणी एकाच भावविश्वातून येतात-मैत्री आणि मोठे होत असताना आपल्या आयुष्याशी जोडल्या जाणाऱ्या आठवणी. 'पुराने दिन'च्या माध्यमातून मला महाविद्यालयीन जीवनातील तो निरागस काळ दाखवायचा होता, जेव्हा मैत्री, पहिला क्रश आणि अगदी छोट्या छोट्या गोष्टीही खूप खास वाटायच्या. कदाचित आपण मागे सोडून आलेल्या त्या काळाबद्दल लिहिणे, हा माझा उद्देश होता; मात्र त्या काळातील भावना आजही आपल्या मनात जिवंत आहेत. या गाण्याचे शब्द लोकांना त्या दिवसांची पुन्हा आठवण करून देतील, जेव्हा आपण तरुण होतो, आपले मित्र आपल्या सोबत होते आणि आपण सर्वजण मिळून त्या पहिल्या भावनांचा अनुभव घेत होतो, अशी मला आशा आहे."
हे गाणे टी-सीरिज म्युझिकवर उपलब्ध आहे. लव्ह फिल्म्स प्रस्तुत 'पहला प्यार दूसरी बार' या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुज सैनी यांनी केले आहे, तर लव रंजन आणि अंकुर गर्ग यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट 23 ऑक्टोबर 2026 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे.

