Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
राज्यात नर्सिंग शिक्षणाचा विस्तार, मंत्री हसन मुश्रीफांची विधानसभेत माहिती

राज्यात नर्सिंग शिक्षणाचा विस्तार, मंत्री हसन मुश्रीफांची विधानसभेत माहिती

मुंबई : राज्यातील आरोग्य व्यवस्थेसाठी कुशल परिचारिकांची उपलब्धता वाढविणे आणि गरीब विद्यार्थ्यांना शासकीय स्तरावर दर्जेदार नर्सिंग शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने नर्सिंग शिक्षणाच्या विस्तारास मंजुरी दिल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी बुधवारी (8 जुलै) विधानसभेत निवेदनाद्वारे दिली.

या निर्णयानुसार राज्यात 10 नवीन शासकीय बीएससी नर्सिंग महाविद्यालये सुरू करण्यात येणार असून, 8 विद्यमान जीएनएम महाविद्यालयांचे बीएससी नर्सिंग महाविद्यालयांमध्ये रूपांतर करण्यात येणार आहे. तसेच 5 विद्यमान शासकीय बीएससी नर्सिंग महाविद्यालयांची प्रवेशक्षमता 50 वरून 100 करण्यात येणार असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.

मुंबईतील जे. जे. रुग्णालय, सेंट जॉर्जेस रुग्णालय, धुळे, सोलापूर, बीड, अकोला, नागपूर येथील आयजीएमसी आणि सांगली येथील एकूण 8 जीएनएम महाविद्यालयांचे रूपांतर करून प्रत्येकी 100 प्रवेश क्षमतेची शासकीय बीएससी नर्सिंग महाविद्यालये सुरू करण्यात येणार आहेत. याशिवाय मुंबई, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, पुणे आणि नांदेड येथील 5 विद्यमान शासकीय बीएससी नर्सिंग महाविद्यालयांची प्रवेशक्षमता 50 वरून 100 करण्यात येणार असल्याची माहिती हसन मुश्रीफ यांनी यावेळी दिली.

याशिवाय राज्यात चंद्रपूर, सिंधुदुर्ग, यवतमाळ, अलिबाग, रत्नागिरी, अमरावती, धाराशिव, गडचिरोली, पालघर आणि अहिल्यानगर येथे 10 नवीन शासकीय बीएससी नर्सिंग महाविद्यालये स्थापन केली जाणार आहेत. तसेच ठाणे, सातारा, नाशिक, जालना, बुलढाणा, परभणी, हिंगोली, वाशीम, वर्धा आणि भंडारा या जिल्ह्यांमध्येही नर्सिंग महाविद्यालये सुरू करण्यासाठी केंद्र सरकारकडे तातडीने प्रस्ताव पाठविण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.

आरोग्य व्यवस्था होणार सक्षम

या संपूर्ण प्रकल्पासाठी 491 कोटी 91 लाख रुपये इतक्या अनावर्ती खर्चास तसेच वार्षिक 12 कोटी 85 लाख रुपयांच्या आवर्ती खर्चास मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे राज्यातील नर्सिंग शिक्षणाची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार असून शासकीय आरोग्य सेवा अधिक सक्षम, गुणवत्तापूर्ण आणि परिणामकारक होण्यास मदत होईल, असा विश्वास हसन मुश्रीफ यांनी यावेळी व्यक्त केला.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar