Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
राज्यात पशुपालनाच्या माध्यमातून समृद्धी आणणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यात पशुपालनाच्या माध्यमातून समृद्धी आणणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर : पशुसंवर्धन विभागाला केंद्रस्थानी ठेवून विकास वाढीची योजना (ग्रोथ स्ट्रॅटेजी) तयार करण्यात आली असून याद्वारे 25 टक्के विकास दर गाठण्याचा प्रयत्न आहे. यातून शेतीपुरक अर्थव्यवस्था निर्माण करत राज्यात पशुपालनाच्या माध्यमातून समृद्धी आणता येईल व या प्रयत्नात राज्य गोसेवा आयोगाचे मोलाचे योगदान असेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी (5 जुलै) येथे केले.

गोआधारीत अर्थव्यस्थेला चालना देण्यात येईल व यातून शेतकऱ्यांना संकटात खंबीरपणे उभे राहण्याचे बळ मिळेल,असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

राज्य शासनाचा पशुसंवर्धन विभाग आणि राज्य गोसेवा आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने येथील वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित 'राज्यमाता गोमाता संवाद यात्रा-2026'च्या समारोप कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर,वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, खासदार माया इवनाते, नागपूरच्या महापौर नीता ठाकरे, पशु संवर्धन विभागाचे आयुक्त किरण पाटील, महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा आदी यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भारतदेशात समृद्ध कृषी संस्कृती होती व तिच्या केंद्रस्थानी गाय होती. गाय ही आधार देणारी आहे. गीर, थारपारकर, राठी, सहिवाल, लालसिंधी, देवणी, गवळावू असा भारतीय देशी गायींचा मोठा इतिहास आहे. देशी गायींच्या संवर्धनातून शेतीच्या प्रगतीला चालना मिळते असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, ब्राझील देशाने भारतीय देशी गायींवर प्रयोग करून त्या देशात दूध उत्पादन वाढविण्याची क्रांती केली.जगातील 10 देशांनी भारतीय देशी गायी नेवून संकरीत गायी तयार केल्या त्या देशांमधील गायींमध्ये 80 टक्के जीन हे भारतीय देशी गायींचे आहेत.

ज्या शेतकऱ्यांकडे गायी आहेत त्यांनी विपरीत परिस्थितीत डगमगून न जाता आत्महत्या न केल्याचे संशोधन व अहवाल प्रसिद्ध असल्याचे सांगून त्यांनी गायींचे महत्व अधोरेखीत केले. मोठया प्रमाणातील जागृती व विकसित पद्धतीतून देशात मोठया प्रमाणात दूध देणाऱ्या गायी तयार करता येतील असे चित्र आहे. याला संशोधनाची जोड देऊन मूल्य साखळी निर्माण करता येईल असेही त्यांनी सांगितले. गायींच्या संरक्षण व संवर्धनासोबतच संशोधनाची जोड देत प्रत्येक गोशाळा शक्ती केंद्र व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. गोपालनासोबतच गोआधारीत अर्थव्यवस्था उभी करता येईल व त्यातून मोठे परिवर्तन साधता येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. गायीच्या शेणापासून निर्मित पेंट, विविध औषधांमध्ये गोमूत्र,शेण व दुधाचा वापर अशा गोआधारीत उत्पादनाचे योग्य ब्रँडींग करण्यात पुढाकार घ्यावा राज्यशासन अशा उत्पादनांना वेगवेगळया ठिकाणी सवलतीच्या दरात किंवा नाममात्र दरात स्टॉल्स उपलब्ध करून देईल असेही त्यांनी सांगितले. गोवंश संरक्षण व संवर्धनासाठी राज्य शासनाने विविध निर्णय घेतले आहेत. भविष्यात गोआधारीत अर्थव्यवस्था निर्माण करण्यासाठी निर्णय घेतले जातील. यातून या क्षेत्राला बळ मिळेल व यासाठी गोसेवा आयोग आणि गोपालकांच्या पाठीशी शासन भक्कमपणे उभे राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar