मुंबई : भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेच्या अंतर्गत राज्यातील सर्व 288 विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी सोमवारी (31 ऑगस्ट) प्रसिद्ध करण्यात आली.
जुन्या मतदार यादीतील 2 कोटी 6 लाख 88 हजार 487 मतदारांची (21.14 टक्के) नावे प्रारूप यादीत समाविष्ट झालेली नाहीत. याप्रकरणी विरोधक आता टीका करताना दिसत आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी थेट भाजपवर निशाणा साधला आहे.
एसआयआरमध्ये महाराष्ट्रात दोन कोटी मतदार वगळले गेले आहे. प्रारूप मतदार यादीत अजूनही चान्स आहे, असं मुख्य निवडणूक आयुक्त म्हणत आहेत. असा प्रश्न विचारला असात संजय राऊत म्हणाले की, मुंबईत 36 लाख मतदार वगळणं आणि महाराष्ट्रासारख्या राज्यात दोन कोटी मतदार वगळणं ही अत्यंत चिंतेची गोष्ट आहे. पश्चिम बंगालमध्ये सुद्ध हेच केलं होतं. 85 लाख मतदार वगळले जे तृणमूल काँग्रेसला मतदान करतील, अशी शंका होती आणि तिथे भारतीय जनता पक्षाने विजय मिळवला. महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम झालेले आहेत. त्याच्यावरती आमचाही रिसर्च सुरू आहे.
मुंबईत 36 लाख हा आकडा सामान्य नाही. एका विशिष्ट समाजाचे, एका विशिष्ट धर्माचे किंवा जिथे आपल्या विरोधकांना चांगलं मतदान होतं, त्या भागातले हे मतदार कमी करण्याचं काम या माध्यमातून सुरू आहे. नवी मुंबईमध्ये एसआयआरचं बोगस फॉर्म कसे सापडले? भाजपा कार्यालयात हजारोंच्या संख्येने हे प्रत्येक जिल्ह्यात आणि प्रत्येक शहरात झालेलं आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक विभागात झालं आहे. त्याच्यावर सुद्धा आता आम्ही आणि आमचे लोक काम करत आहेत.

