मुंबई : महाराष्ट्रात जानेवारीमध्ये जिल्हा परिषदांच्या निवडणुका झाल्या होत्या. त्यावेळी केवळ 12 जिल्हा परिषदांच्या निवडणुका झाल्या होत्या आणि आरक्षणाच्या टक्केवारीमुळे 20 जिल्हा परिषदेच्या निवडणुका थांबल्या होत्या.
आता या रखडलेल्या 20 जिल्हा परिषदांच्या निवडणुका डिसेंबर 2026 मध्ये होण्याची शक्यता आहे. या संदर्भात राज्य सरकारने गुरुवारी (30 जुलै) सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले. त्यात 50 टक्के आरक्षणाची मर्यादा पाळून निवडणुका घेण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे कदाचित राज्यातील 20 जिल्हा परिषदांच्या निवडणुका या वर्षाअखेरीस होण्याची शक्यता नाकारता येत नाही. zilla parishad elections in maharashtra
निवडणूक होणाऱ्या जिल्हा परिषदा
कोकण (2) : ठाणे, पालघर
उत्तर महाराष्ट्र (5) : नाशिक, अहिल्यानगर, जळगाव, धुळे, नंदुरबार
मराठवाडा (4) : बीड, जालना, हिंगोली, नांदेड
विदर्भा (9) : नागपूर, अमरावती, चंद्रपूर, अकोला, वाशीम, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, गडचिरोली
स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात मंगळवारी (21 जुलै) झालेल्या सुनावणीदरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की, कोणत्याही परिस्थितीत एकूण आरक्षण 50 टक्क्यांपेक्षा जास्त असू शकत नाही. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती विपुल पांचोली यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले आहे की, त्यांच्या पूर्वीच्या आदेशाचा चुकीचा अर्थ लावला गेला होता. तसेच उर्वरित निवडणुका घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाला कोणत्या प्रशासकीय आणि इतर सुविधांची आवश्यकता आहे, याची विचारणा न्यायालयाने केली आहे. सुनावणीदरम्यान, महाराष्ट्र सरकारने न्यायालयाला माहिती दिली की, राज्यातील महापालिका, नगरपालिका आणि बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण झाल्या आहेत. केवळ 20 जिल्हा परिषदा आणि 211 पंचायत समित्यांच्या निवडणुका व्हायच्या आहेत. सरकारने सांगितले की, जिल्हा परिषद निवडणुका घेण्यास आधीच मंजुरी देण्यात आली आहे, परंतु उर्वरित वादावर अंतिम निर्णय होण्यास काही वेळ लागेल.
त्यावेळी ओबीसी समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ज्येष्ठ वकील इंदिरा जयसिंग यांनी न्यायालयाला सांगितले होते की, सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशानुसार अनेक भागांमध्ये 27 टक्के ओबीसी आरक्षणासह निवडणुका आधीच घेण्यात आल्या आहेत आणि त्यामुळे इतर निवडणुकाही त्याच पद्धतीने घेतल्या पाहिजेत. त्यांनी असा युक्तिवाद केला होती की, राजकीय आरक्षणाकडे सामाजिक आरक्षण म्हणून पाहू नये. त्यांनी सांगितले की, जास्त अनुसूचित जमाती लोकसंख्या असलेल्या काही भागांमध्ये, अनुसूचित जमातींसाठी राखीव जागांची संख्या इतकी जास्त होते की ओबीसींसाठी एकही जागा शिल्लक राहत नाही. अशा परिस्थितीत ओबीसींना शून्य आरक्षण देणे योग्य ठरेल का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. जयसिंग यांनी असेही सांगितले की, ज्या भागांमध्ये एकूण आरक्षण 50 टक्क्यांपेक्षा जास्त आहे, त्या सर्व भागांची संपूर्ण नोंद महाराष्ट्र सरकारकडे आहे आणि ही माहिती न्यायालयासमोर सादर केली पाहिजे.
यावर महाराष्ट्र सरकारने उत्तर दिले होते की, ओबीसींसाठी शून्य आरक्षणाची परिस्थिती केवळ दोन-तीन जिल्ह्यांपुरती मर्यादित आहे. ज्येष्ठ वकील गोपाल शंकरनारायणन यांनी असा युक्तिवाद केला की, कोणत्या समुदायांना राजकीय प्रतिनिधित्व मिळावे हे निश्चित करणे ही पहिली पायरी असावी आणि त्या आधारावर पुढील निर्णय घेतले जावेत. सुनावणीदरम्यान, सरन्यायाधीशांनी नमूद केले की, 23 फेब्रुवारीच्या आदेशात न्यायालयाने स्पष्टपणे म्हटले आहे की एकूण आरक्षण 50 टक्क्यांपेक्षा जास्त नसावे. यावर इंदिरा जयसिंग यांनी असा युक्तिवाद केला होता की, कृष्णमूर्ती निकालातही अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्के आरक्षण ओलांडण्याच्या शक्यतेचा उल्लेख आहे. त्यांच्या मते, या प्रकरणातील मुख्य प्रश्न अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीय यांच्यातील राजकीय आरक्षणाचा समतोल राखणे हा आहे. सुनावणीदरम्यान, राज्य निवडणूक आयोगाने सांगितले की, मतदारयादीची विशेष सखोल पुनर्तपासणी ऑक्टोबरपर्यंत सुरू राहील आणि संपूर्ण प्रशासकीय कर्मचारी वर्ग सध्या त्या कामात गुंतलेला आहे. त्यामुळे, तात्काळ निवडणुका घेणे कठीण होईल.
यावर प्रतिक्रिया देताना, सरन्यायाधीशांनी नमूद केले होते की, राज्यातील बहुतेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुधारित मतदारयादीशिवाय आधीच घेण्यात आल्या आहेत. त्यांनी पुढे सांगितले की, उर्वरित निवडणुका फेब्रुवारी किंवा मार्चपर्यंत पुढे ढकलणे अयोग्य ठरेल. न्यायालयाने असेही म्हटले की, केवळ काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शिल्लक असल्याने, आवश्यक असल्यास राज्य निवडणूक आयोगाला पुरेसा कर्मचारी वर्ग आणि इतर प्रशासकीय साहाय्य पुरवले जाऊ शकते. सुनावणीच्या शेवटी, सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला उर्वरित निवडणुका वेळेवर घेण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रशासकीय सुविधा आणि संसाधनांची माहिती न्यायालयाला कळवण्याचे निर्देश दिले.

