पुणे : पुण्यात झालेल्या लोकमान्य टिळक पुरस्कार वितरण सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले.
यावेळी बोलताना त्यांनी देशातील राष्ट्रप्रेमी जनतेचा मोदी-शाह जोडीवरील विश्वास अधोरेखित करत, राम-लक्ष्मणाप्रमाणेच ही जोडी देशासाठी कार्यरत असल्याचे सांगितले.
शिंदे म्हणाले, 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात कल्याणकारी सरकार स्थापन झाले. त्या प्रवासात अमित शाह हे सुरुवातीपासूनच त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहिले. आपण फक्त राम नाही म्हणत, सोबत लक्ष्मणाचे नावही घेतो. राम-लक्ष्मणाची जोडी म्हणतो, तसेच देशातील राष्ट्रप्रेमी जनता आज 'मोदी-शाही' म्हणते, हीसुद्धा आमच्यासाठी खूप गर्वाची गोष्ट आहे.
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्याविषयी बोलताना शिंदे म्हणाले, लोकमान्य टिळकांनी देशाला स्वराज्याला संदेश दिला, आणि आज भारत जगाला सुरक्षिततेचा नवा संदेश देत आहे. या संकल्पनेला प्रत्यक्षात आणण्यात अजित डोभाल यांचे मोठे योगदान असून ते पडद्यावरील नव्हे तर प्रत्यक्ष कृतीतून देशाचे संरक्षण करणारे खरे धुरंदर आहेत. त्यांच्या पाठीशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे सक्षम नेतृत्व असल्याचेही त्यांनी सांगितले.
2014 पूर्वीचा आणि त्यानंतरचा भारत यामध्ये मोठा बदल झाल्याचेही शिंदे यांनी आपल्या भाषणात नमूद केले. पूर्वी दहशतवादी हल्ल्यांच्या घटनांनी देश हादरत होता, मात्र गेल्या काही वर्षांत देशाची सुरक्षा अधिक मजबूत झाली आहे. पंतप्रधान मोदी देशाला विकास आणि सुरक्षिततेच्या दिशेने पुढे नेत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, 2023 मध्ये लोकमान्य टिळक पुरस्कार पंतप्रधान मोदी यांना प्रदान करण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी हा सन्मान देशातील जनतेला समर्पित केला होता. यंदा हा पुरस्कार मोदी आणि अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली देशाच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण योगदान देणारे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना मिळाल्याबद्दलही शिंदे यांनी समाधान व्यक्त केले.

