वसई : रानगावच्या धामरशेत परिसरात गावठी दारू तयार करण्यासाठी साठवून ठेवलेल्या सुमारे १,८०० लिटर गूळमिश्रित वॉशवर वसई पोलिसांनी कारवाई केली. पोलिसांनी छापा टाकून दारू निर्मितीसाठी वापरण्यात येणारा सुमारे १ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला.
या कारवाईमुळे परिसरातील अवैध गावठी दारू निर्मितीला आळा घालण्याच्या पोलिसांच्या प्रयत्नांना बळ मिळाले आहे. रानगाव परिसरात गावठी दारू तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वॉश साठवून ठेवण्यात आल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार वसई पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सोमवारी धामरशेत परिसरात छापा टाकला. या कारवाईत पोलिसांना सुमारे १,८०० लिटर गूळमिश्रित वॉश आढळून आला.
त्याचबरोबर दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे एक मातीचे भांडे आणि ११ लहान-मोठे रिकामे ड्रम असा एकूण १ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. पोलिसांनी हा मुद्देमाल नष्ट केला. या प्रकरणी सुनील घनशेट याच्याविरुद्ध वसई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परिसरात अशा प्रकारे अवैध दारू निर्मिती करणार्यांवर पुढील काळातही कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले. ही कारवाई पोलीस उपआयुक्त अशोक विरकर, सहायक पोलिस आयुक्त देवेंद्र पोळ, वसई पोलीस ठाण्याच्या प्रभारी पोलीस निरीक्षक सौरभी पवार आणि पोलीस निरीक्षक प्रकाश मासाळ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने केली.

