Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
'रस्ते खोदले.पण दुरुस्ती नाही'; चिखलात बसून भाजप नगरसेवकांचे आंदोलन

'रस्ते खोदले.पण दुरुस्ती नाही'; चिखलात बसून भाजप नगरसेवकांचे आंदोलन

सई : नालासोपारा पूर्वेत सुरू असलेल्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या कामामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. सांडपाणी वाहिन्या टाकण्यासाठी खोदण्यात आलेले रस्ते महिनोनमहिने दुरुस्त न केल्याने पावसाळ्यात अनेक भाग चिखल, खड्डे आणि साचलेल्या पाण्याने व्यापले आहेत.

परिणामी नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोकाही वाढला आहे. या समस्येबाबत महापालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही परिस्थितीत कोणतीही सुधारणा न झाल्याने संतप्त झालेल्या भाजपच्या नगरसेवकांनी गुरुवारी थेट चिखलात बसून आंदोलन करत कंत्राटदार आणि महापालिका प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.

वसई-विरार शहरातील मंजूर सात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांपैकी सध्या केवळ विरारच्या बोळींज येथील प्रकल्प कार्यरत आहे. उर्वरित सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेने नालासोपारा पूर्व येथे 103 दशलक्ष लिटर क्षमतेचा 434 कोटी रुपयांचा नवीन प्रकल्प हाती घेतला आहे. या कामाचा ठेका 'इगल इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड'ला देण्यात आला असून, पाइपलाइन टाकण्यासाठी खोदलेले रस्ते वेळेत दुरुस्त न केल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

पावसाळा सुरू झाल्यानंतर प्रभाग क्रमांक 15, 17, 21 आणि 22 मधील परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे. रस्त्यांवर मोठे खड्डे, चिखल आणि साचलेले पाणी यामुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत असून पादचाऱ्यांनाही जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होत असून अपघाताचा धोकाही वाढला आहे.

भाजपचे गटनेते तथा नगरसेवक अशोक शेळके यांनी सांगितले की, या समस्येबाबत महापालिका प्रशासनाकडे अनेक वेळा तक्रारी आणि निवेदने देण्यात आली. मात्र, त्याची दखल घेतली गेली नाही. त्यामुळे नागरिकांचा वाढता संताप लक्षात घेऊन आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागला.

दरम्यान, कामातील त्रुटींमुळे महापालिकेने संबंधित कंत्राटदाराला आतापर्यंत 13 नोटिसा बजावल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, नोटिसांनंतरही कामाच्या पद्धतीत कोणताही बदल झालेला नसल्याने प्रशासन कडक कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोपही आंदोलकांनी केला.

आंदोलनादरम्यान नगरसेवकांनी स्पष्ट इशारा दिला की, नागरिकांना सुरक्षित आणि सुस्थितीतील रस्ते उपलब्ध करून देणे ही महापालिकेची जबाबदारी आहे. त्यामुळे कंत्राटदाराने प्रथम खोदलेले रस्ते व्यवस्थित दुरुस्त करावेत आणि त्यानंतरच सांडपाणी प्रकल्पाचे पुढील काम सुरू करावे. अन्यथा हे काम तात्पुरते थांबवून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar