Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
रस्ते रुंदीकरणासाठी शेकडो वर्षांच्या आंब्याच्या झाडांवर घाव

रस्ते रुंदीकरणासाठी शेकडो वर्षांच्या आंब्याच्या झाडांवर घाव

मोखाडा : त्र्यंबकेश्वर येथे होणार्‍या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या रस्ते विकास कामांमुळे निसर्गाच्या शतकानुशतकांच्या ठेव्यावर कुर्‍हाड कोसळत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.खोडाळा- त्रंबकेश्वर रस्त्यावर मौजे देवगाव फाटा ते श्रीघाट दरम्यानच्या सव्वा दोन किलोमीटरच्या पट्ट्यात रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या सुमारे 60 आंब्याच्या झाडांची कत्तल करण्यात आली आहे.

स्थानिकांच्या दाव्यानुसार ही झाडे 150 ते 200 वर्षांपूर्वीची असून, पिढ्यानपिढ्या या वाटेवर सावली देणारी ही झाडे आता नामशेष करण्यात येत आहेत.

रस्ते रुंदीकरण, वाहतूक व्यवस्था आणि भाविकांच्या सुरक्षेसाठी ही कामे आवश्यक असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. मात्र, त्यासाठी शेकडो वर्षे जुन्या वृक्षसंपदेचा बळी दिला जात असल्याने पर्यावरणप्रेमींमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. वृक्षतोड करताना वन विभागाची परवानगी घेण्यात आली होती का, मोबदल्यात वृक्षारोपणाचे नियोजन काय, आणि पर्यायी मार्गाचा विचार करण्यात आला होता का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. सिंहस्थासारख्या धार्मिक पर्वासाठी निसर्गाचा समतोल राखणे अपेक्षित असताना, विकासाच्या नावाखाली हिरवाईचा संहार होत असल्याने प्रशासनाने याबाबत पारदर्शक खुलासा करावा, अशी मागणी नागरिकांना कडून होत आहे.

रस्ते रुंदीकरण गरजेचे असले तरी या झाडांची कत्तल न करता त्यांचे वैज्ञानिक पद्धतीने इतरत्र पुनर्रोपण करणे शक्य होते. प्रशासनाने सोपा मार्ग म्हणून सरळ कुर्‍हाड चालवण्याचा पर्याय निवडला, जो अजिबात सहन करण्यासारखा नाही.

- तुकाराम रोकडे, नागरिक.

सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या रुंदीकरणासाठी वृक्ष तोडीचा प्रस्ताव केला होता. त्या प्रस्तावाला शासनाकडून मान्यता मिळाली आहे. देवगाव ते श्रीघाट या दरम्यान सव्वा दोन किलोमीटरच्या अंतरावर एकूण 60 आंब्यांची झाडे तोडली जाणार असून त्याबदल्यात वृक्षांची लागवड करणार असल्याचे लिखित बंधपत्रात (प्रतिज्ञापत्रात) घेतले आहे.

शेखर देवकर, रिजनल फॉरेस्ट ऑफीसर, त्र्यंबकेश्वर.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar