Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये शिकारीचा थरार..घडली धक्कादायक घटना

संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये शिकारीचा थरार..घडली धक्कादायक घटना

भाईंदर : पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील राखीव असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यान म्हणजेच बोरीवली नॅशनल पार्कमध्ये बेकायदा घुसखोरी करून रानडुकरांची शिकार करण्यासाठी गेलेल्या टोळक्यातील एका व्यक्तीचा गोळी लागून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या या घटनेत अन्य दोघे जण सुद्धा जखमी झाले असून, त्यांच्यावर काशीगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे, घटनेनंतर मृतदेहाचे शवविच्छेदन न-करता आणि पोलिसांना माहिती न देता पहाटेच अंत्यसंस्कार उरकण्यात आल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. मृत्यूचे खोटे प्रमाणपत्र देणार्‍या डॉक्टरसह चार ते पाच जणांना काशीगाव पोलिसांनी ताब्यात घेतले असून, या प्रकरणाचा तपास सुरू आहे.( A thrilling hunt in Sanjay Gandhi National Park… a shocking incident unfolds)

मिळालेल्या माहितीनुसार, चेना गाव परिसरातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पाच ते सहा जणांचा ग्रुप रानडुकरांची शिकार करण्यासाठी गेले होते. शिकारीसाठी बंदुका, छरे आणि अन्य साहित्य त्यांच्याकडे होते. मध्यरात्री 12 ते 1वाजण्याच्या सुमारास जंगलात उतरताना बॅटरीच्या प्रकाशात शिकार सुरू असताना, अंधारात प्राण्याचे डोळे समजून एका दिशेने गोळीबार करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या गोळीबारात विजय सुखरू सापटे (वय ६० वर्ष, रा. बेलखडी पाडा, चेना गाव) यांच्या छातीत गोळी लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. सापटे हे मिरा-भाईंदर महानगरपालिकेत सफाई कामगार म्हणून कार्यरत होते. या घटनेत कुणाल शेलार आणि कल्पेश ढगळा हे दोघेही जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यापैकी एकाच्या मांडीला, तर दुसर्‍याच्या खांद्याला गोळी लागल्याचे सांगितले जात आहे. दोघांवर काशीगाव येथील आशिष रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्यासोबत मृत व्यक्तीचा एक अल्पवयीन मुलगाही असल्याची माहिती समोर आली असून, त्याबाबत अधिक तपास सुरू आहे.

या घटनेची माहिती एका समाजसेवकाने प्रशासनाला दिली. त्यानंतर सुरुवातीला जखमी व्यक्तींनी मासेमारी करताना स्फोटकाचा स्फोट होऊन अंगात छरे घुसल्याने दुखापत झाल्याचे सांगितल्याची माहिती आहे. नदीच्या पाण्यात स्फोटक टाकून मासेमारी करत असताना हा प्रकार घडल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, पोलिसांनी सखोल चौकशी केल्यानंतर शिकारीदरम्यान गोळीबार झाल्याची बाब समोर आल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता तेथे रक्ताचे डाग आढळल्याची माहिती आहे. त्यानंतर तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यात आली. सुरुवातीला दिलेली माहिती आणि प्रत्यक्ष घटनेतील विसंगती लक्षात घेऊन पोलिसांनी संबंधितांची कसून चौकशी सुरू केली आहे.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे जैवविविधतेच्या दृष्टीने महत्त्वाचे आणि पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र आहे. अशा संरक्षित वनक्षेत्रात बेकायदा प्रवेश करून शस्त्रांच्या साहाय्याने शिकार करण्याचा प्रकार समोर आल्याने वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या घटनेत केवळ एका व्यक्तीचा जीव गेला नसून, शिकारीसाठी वापरल्या जाणार्‍या शस्त्रांमुळे इतरांच्या जीवितालाही धोका निर्माण झाल्याचे स्पष्ट होत आहे. या प्रकरणी सदोष मनुष्यवधासह मृतदेहाची विल्हेवाट लावणे आणि पुरावे लपविण्याच्या संशयासंदर्भात कायदेशीर कारवाईचा तपास सुरू आहे. याशिवाय, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान प्रशासनाकडून वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत स्वतंत्र गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती आहे. मिरा-भाईंदर गुन्हे प्रकटीकरण शाखा-१ आणि काशीगाव पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुलकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास कांबळे या प्रकरणाचा तपास करीत आहेत. ताब्यात घेतलेल्या संशयितांची चौकशी सुरू असून, या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, हे तपासातून स्पष्ट होणार आहे.

मृतदेहावर पहाटेच अंत्यसंस्कार

या प्रकरणातील सर्वाधिक गंभीर बाब म्हणजे, गोळी लागून मृत्यू झालेल्या विजय सापटे यांच्या मृत्यूची माहिती पोलिसांना न देता आणि शवविच्छेदन न करता मृतदेहावर पहाटेच अंत्यसंस्कार करण्यात आल्याचा आरोप आहे. मृत्यू नैसर्गिक असल्याचे भासवून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाल्याचा संशय पोलिसांना आहे. संबंधित खासगी डॉक्टरांनी सापटे यांचा मृत्यू घरी हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे नमूद करणारे प्रमाणपत्र दिल्याची माहिती समोर आली आहे. मृत्यूचे कारण आणि परिस्थिती याबाबत प्रमाणपत्रात चुकीची माहिती दिल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी संबंधित डॉक्टरसह चार ते पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, प्रमाणपत्र कसे देण्यात आले, मृत्यूची माहिती का लपविण्यात आली आणि अंत्यसंस्काराची घाई का करण्यात आली, याचा तपास सुरू आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar