भाईंदर : परदेशातून महागडे गिफ्ट येणार आधी जीएसटी भरा, मग कुरिअरचा अपघात झाला, नुकसानभरपाई द्या! एवढ्यावरही सायबर भामट्यांचे समाधान न होता थेट सीबीआय अधिकारी आणि दिल्ली पोलिसांच्या नावाने धमकावत भाईंदर पूर्वेतील २७ वर्षीय तरुणीला अक्षरशः भीतीच्या जाळ्यात ओढून तब्बल १३ लाख ७५ हजार रुपयांना गंडा घालण्यात आला.
१२ ते ३० ऑगस्टदरम्यान वेगवेगळी कारणे सांगून ही रक्कम उकळण्यात आली. फसवणूक उघडकीस आल्यानंतर नवघर पोलिसांनी अज्ञात सायबर भामट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मनीष जैन नावाच्या व्यक्तीने व्हॉट्सपवरून तरुणीशी संपर्क साधत महागडी गिफ्ट्स पाठविण्याचे आमिष दाखवले. गिफ्ट मिळविण्यासाठी जीएसटी व इतर शुल्क भरण्यास सांगत पहिला डाव टाकण्यात आला. पैसे भरल्यानंतर कुरिअर कर्मचारी असल्याचे भासवून पुन्हा जीएसटीच्या नावाखाली पैसे उकळण्यात आले. त्यानंतर भामट्यांनी थेट सरकारी यंत्रणांचा मुखवटा चढवला. एका क्रमांकावरून स्वतःला सीबीआय अधिकारी असल्याचे सांगत कुरिअर घेऊन येणार्या वाहनाचा अपघात झाल्याची थाप मारण्यात आली. अपघातातील नुकसानभरपाईच्या नावाखाली पुन्हा पैसे मागण्यात आले.
यानंतर दिल्ली पोलिसांच्या नावाने धमकीचा अंतिम डाव खेळण्यात आला. कुरिअर अवैध मार्गाने आणले जात असल्याने संबंधित व्यक्तींना पकडण्यात आले असून त्यांची सुटका करण्यासाठी पैसे द्यावे लागतील, अशी भीती तरुणीच्या मनात निर्माण करण्यात आली. सरकारी तपास यंत्रणांची नावे घेत, कारवाईची भीती दाखवत आणि एकामागून एक कारणे पुढे करत भामट्यांनी अखेर तरुणीकडून तब्बल १३ लाख ७५ हजार रुपये हडपले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणीने नवघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी संबंधित व्हॉट्सप क्रमांकधारक आणि बँक खातेधारकांविरोधात भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांसह माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक आपेट पुढील तपास करीत आहेत.
गिफ्टच्या नादात सावधान!
गिफ्ट, कुरिअर, जीएसटी किंवा सरकारी कारवाईच्या नावाने अनोळखी व्यक्ती पैसे मागत असल्यास कोणतीही रक्कम देऊ नये. सरकारी तपास यंत्रणांच्या नावाने फोन करून पैसे मागणे हा सायबर फसवणुकीचा गंभीर प्रकार असू शकतो.

