वसई : शेअर बाजारात पैसे गुंतवून चांगला परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवत नागरिकांची फसवणूक करणाऱ्या कॉल सेंटरचा नालासोपारा पोलिसांनी भांडाफोड केला आहे. नालासोपारा पश्चिम येथील गोदावरी अपार्टमेंटमधील एका खोलीत सुरू असलेल्या या कॉल सेंटरवर पोलिसांनी छापा टाकून 14 जणांना ताब्यात घेतले.
या कारवाईत मोबाईल, लॅपटॉप, रजिस्टर, वायफाय उपकरणे आणि अन्य इलेक्ट्रॉनिक साहित्य असा एकूण 8 लाख 87 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या कॉल सेंटरमधून नागरिकांना फोन करून 'फॉर इन्व्हेस्ट 2' आणि 'गेन रिसर्च' या कंपन्या सेबीकडे नोंदणीकृत असल्याचे सांगितले जात होते. शेअर बाजारातील गुंतवणुकीतून चांगला फायदा होईल, असा विश्वास निर्माण करून नागरिकांना गुंतवणुकीसाठी प्रवृत्त केले जात असल्याचा संशय आहे. नालासोपारा पश्चिमेतील गोदावरी अपार्टमेंटच्या खोली क्रमांक 101 मध्ये हे कॉल सेंटर सुरू होते. भरवस्तीत आणि मुख्य रस्त्यालगतच्या इमारतीत हा प्रकार सुरू असल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
या कॉल सेंटरच्या माध्यमातून आतापर्यंत किती नागरिकांची फसवणूक झाली, किती रक्कम उकळण्यात आली आणि या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास नालासोपारा पोलीस करीत आहेत. जप्त केलेल्या इलेक्ट्रॉनिक साहित्याची तपासणी करून कॉल सेंटरच्या व्यवहारांची माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला जात आहे. शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी संबंधित संस्था सेबीकडे नोंदणीकृत आहे का, याची अधिकृत स्रोतांवरून खातरजमा करण्याचे आवाहन या घटनेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना करण्यात येत आहे.

