कोल्हापूर : राज्याच्या राजकारणातील ज्येष्ठ राजकारणी तथा शिक्षणसम्राट अशी ओळख असलेले पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील अर्थात ज्ञानेश्वर यशवंतराव पाटील यांचे निधन झाले आहे. वयाच्या 90 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
कोल्हापुरात त्यांचे आज मंगळवारी (4 ऑगस्ट) सकाळी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे राजकीय क्षेत्रात आणि शिक्षण क्षेत्रात शोककळा पसरली आहे. ते जरी काँग्रेसपासून लांब झालेले होते, तरी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशी त्यांची ओळख होती. ते त्रिपुरा, बिहार, पश्चिम बंगालचेही राज्यपाल राहिले होते. काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार सतेज (बंटी) पाटील हे त्यांचे पुत्र असून ते पाटील कुटुंबीयांचा राजकीय वारसा कायम ठेवून आहेत. मात्र, त्यांच्या या निधनामुळे मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
डॉ. डी. वाय. पाटील यांचे मंगळवारी कोल्हापुरी राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या निधनाने राजकीय आणि शिक्षण क्षेत्रातील दूरदर्शी तज्ज्ञ गमावल्याची भावना व्यक्त केली जात आहे. डॉ. डी. वाय. पाटील यांचे अनेक शैक्षणिक क्षेत्रात मोठे काम केले आहे. त्यांचे अनेक शैक्षणिक संकुल आहेत. त्यांच्या कुटुंबात अनेक सदस्य विविध शैक्षणिक संस्थांच्या व्यवस्थापनाशी संबंधित आहेत. त्यांचे पुत्र डॉ. संजय डी. वाय. पाटील, सतेज उर्फ बंटी डी वाय पाटील, विजय डी. पाटील, डॉ. अजिंक्य डी. वाय. पाटील यांच्यासह कन्या डॉ. नंदिता पालशेतकर आणि इतर सदस्य शिक्षण व आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांचे नातू ऋतुराज पाटील हेही सार्वजनिक जीवनात सक्रिय आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती नाजूक होती. त्यांच्यावर उपचार सुरू होते. ते वृद्धापकाळामुळे घरातच असायचे. परंतु आज त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. त्यांनी मंगळवारी कोल्हापुरातील निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने राज्यभरात शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे.
डॉ. डी. वाय. पाटील यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1935 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील आंबप येथे झाला. त्यांनी समाजपरिवर्तन घडवून आणण्यासाठी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही जागतिक दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी काम सुरू झाले. डी. वाय. पाटील यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीला काँग्रेमधून सुरुवात केली. ते 1957 ते 1962 या काळात कोल्हापूरचे महापौर होते. त्यानंतर 1967 आणि 1972 मध्ये ते पन्हाळा मतदारसंघातून विधानसभेवर आमदार म्हणून निवडून आले. यानंतर त्रिपुरा, बिहार, पश्चिम बंगालच्या राज्यपाल पदीही त्यांनी भूषविले होते. डी. वाय. पाटील यांनी वयाच्या 45 व्या वर्षी सक्रिय राजकारणातून काहीसा संन्यास घेत शिक्षणाचा वटवृक्ष उभारण्यास सुरुवात केली. 1983 मध्ये नवी मुंबईत 'रामराव आदिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी' (RAIT) या पहिल्या अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थापना केली.
अभियांत्रिकी, वैद्यकीय (मेडिकल), फार्मसी, मॅनेजमेंट, आर्किटेक्चर आणि कृषी यांसारख्या विविध क्षेत्रांत त्यांचे उत्तम जाळे पसरलेले आहे. आज त्यांच्या डी. वाय. पाटील ग्रुप अंतर्गत कोल्हापूर, मुंबई, पुणे यांसारख्या शहरांमध्ये 3 हून अधिक डीम्ड युनिव्हर्सिटीज, 6 खाजगी विद्यापीठे आणि 180 पेक्षा जास्त शिक्षण संस्था कार्यरत आहेत. तर, नवी मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियम हे त्यांच्या दूरदृष्टीचे प्रतीक मानले जाते. या स्टेडियममध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने, आयपीएल, फुटबॉल स्पर्धा आणि विविध राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांचे आयोजन झाले आहे.
शिक्षण आणि समाजसेवेतील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल भारत सरकारने 1991 मध्ये त्यांना पद्मश्री या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केले. त्यांना अमेरिकेच्या 'वर्ल्ड युनिव्हर्सिटी राउंडटेबल' (1985), ब्रिटनच्या 'नॉटिंगहॅम ट्रेंट युनिव्हर्सिटी' (1196) आणि शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर (2015) कडून मानद डॉक्टरेट आणि 'डी.लिट' पदवी प्रदान करण्यात आली आहे.

