Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
सिद्धिविनायक मंदिरातील दानचोरी प्रकरणाची चौकशी करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती

सिद्धिविनायक मंदिरातील दानचोरी प्रकरणाची चौकशी करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती

मुंबई : अयोध्येच्या राम मंदिरातील दानचोरीनंतर राज्यातील प्रभादेवीमधील श्री सिद्धिविनायक मंदिरातील दानचोरीवरून राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. या प्रकरणात श्री सिद्धिविनायक मंदिर न्यास समितीचे अध्यक्ष आणि शिवसेनेचे (शिंदे) नेते सदा सरवणकर यांनी मंगळवारी (4 ऑगस्ट) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.

शिवाय या दानचोरी प्रकरणात चौकशी करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपयांच्या दानचोरीचा पर्दाफाश होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. आपलं महानगरने सिद्धिविनायक मंदिरातील दानचोरी प्रकरणाचा सतत पाठपुरावा करून श्रद्धेचा बाजार मांडणाऱ्यांना शिक्षा करण्याची भूमिका पहिल्यापासून घेतली आहे. या प्रयत्नांना यश येताना दिसून येत आहे.

सिद्धिविनायक मंदिरातील दानपेटीतून दरवर्षी 18 कोटी रुपयांची चोरी होत असल्याचा गंभीर आरोप मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी शनिवारी (1 ऑगस्ट) विद्यार्थी सेनेच्या वर्धापन दिनाच्या मेळाव्यात केला होता. त्यात त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मंदिराच्या विश्वस्तांनी लिहिलेले पत्र वाचून सिद्धिविनायक मंदिरातील या घोटाळ्यावर जाहीर प्रकाशझोत टाकला होता. तर त्या आधी एकनाथ शिंदे यांनी 15 जुलै रोजी विधिमंडळात या घोटाळ्याचा उल्लेख केला होता. मात्र, आम्ही न लिहिलेले पत्र राज ठाकरेंनी वाचल्याचा दावा अध्यक्ष सदा सरवणकर आणि विश्वस्त राहुल लोंढे यांनी सोमवारी (3 ऑगस्ट) पत्रकार परिषदेत केला होता. तसेच या प्रकरणी एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेणार असल्याचेही स्पष्ट केले होते. त्याप्रमाणे त्यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.

दरम्यान, सिद्धिविनायक मंदिरातील दानचोरीप्रकरणात मुख्यमंत्र्यांनी थेट कारवाईचा इशारा दिला आहे. कुठेही शंका निर्माण झाली आणि पुरावा असेल तर चौकशी झालीच पाहिजे आणि निश्चितपणे या प्रकरणाची चौकशी केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. या प्रकरणात 20 मार्च रोजी 10 हजार रुपयांच्या चोरी प्रकरणात मंदिर ट्रस्टने दादर पोलिसांत 9 कर्मचाऱ्यांविरोधात तक्रार केली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल करून 21 मार्च रोजी राजेंद्र पेंडुरकर या कर्मचाऱ्याला अटक केली. त्यानंतर पोलिसांनी आणखी 5 कर्मचाऱ्यांना 22 मार्च रोजी तर दोघांना 24 मार्च रोजी अटक केली. एक आरोपी कर्मचारी फरार झाला होता आणि त्याने 17 जून रोजी अटकपूर्व जामीन मिळवला आहे. त्यामुळे सध्या सर्व 9 आरोपी जामिनावर बाहेर आहेत. मंदिर ट्रस्टने आठजणांकडून प्रत्येकी 10 रुपयांप्रमाणे 80 हजार रुपये वसूल केले आहेत.

पाच वर्षांचे ऑडिट करण्याचे शिंदेंचे आदेश

सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सदा सरवणकर, विश्वस्त राहुल लोंढे, मीना कांबळी यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन दानचोरीच्या प्रकरणाची सविस्तर माहिती दिली. एकनाथ शिंदे हे प्रकरण गांभीर्याने ऐकल्यानंतर सिद्धिविनायक मंदिराच्या हिशेबाचे पाच वर्षांचे ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत. भाविकांच्या श्रद्धेचा आदर राखत आणि मंदिराची बदनाम टाळण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑडिट करण्याचा आदेश दिला आहे, अशी माहिती सदा सरवणकर यांनी आपलं महानगरला दिली.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar