- डॉ. महेश केळुसकर
राजकीय, सामाजिक कामात मालवणी मुलखातल्यो अनेक सुकन्यांचो सहभाग कौतुकास्पद आसा. अगदी राज्याच्या स्तरावर फुडारपण करणारे सावंतवाडीच्यो अहिल्याबाई रांगणेकर, देवगडच्यो मृणालताई गोरे हेनी आपल्या कर्तृत्वाचो ठसो उमटवल्यानी.
ज्यावेळी समाजात आपड मानली जायत होती आणि दलितांका तुच्छ समजला जायचा त्या काळात नगरसेविका इंदिराबाई रांगणेकर दलित आवाठातना फिरत, त्या बायकांका चार भले गोष्टी सांगायचे, त्येंची जागृती करायचे. मालतीबाई बाक्रे ह्यो एक उत्तम विदुषी म्हणून प्रसिद्ध होत्यो. राजकीय कार्यकर्ती आणि हाडाची समाजसेविका म्हणून बाक्रे बाईंची प्रसिद्धी हुती.
खूप म्हंजे खूपच मालवणी मुलखातल्या बायलमाणसांची परिस्थिती पूर्वी वायट होती. अर्ध्या अधिक बायलमाणसांका शिक्षण नव्हता आणि भायरच्या जगाचो वारोव तसो लागत नव्हतो. पंदरा-सोळा वरसाचा चेडू झाला आनि कोणाच्या तरी गळ्यात बांदुन दिला काय आवशीबापाशीचा कर्तव्य संपला अशी परिस्थिती होती. चेडवांका शीकान काय करूचा आसा? शेवटी चुलच फुकूची आसा ना? असो प्रश्न घराघरातसून विचारलो जायचो. पण त्या काळात सावंतवाडी संस्थानचे राजे बापूसाहेब महाराज हेंची पत्नी राणी पार्वतीदेवी हेंका वाटला की आपल्या संस्थानातल्या बायकांची तरी सुधारणा होवक व्हयी. बडोद्याचे राजे फत्तेसिंग हेंची ही कन्या आणि बापूसाहेब महाराजांची पत्नी सुधारणावादी होती. राणी पार्वती देवी हेंच्या प्रयत्नान सावंतवाडीत पयली मुलींची शाळा झाली. या शाळेतसून शास्त्रीय संगीत, हस्तकला, हल्लीच्या भाषेतला स्विमिंग म्हणजे पोहणा, सायकल चालवणा, शिवणकाम, विणकाम आणि बॅडमिंटनसुद्धा खेळाक बायकांका शिकवला जायचा.
1936 च्या दरम्यान राणी पार्वतीदेवी हेंच्या महिला समाजाची स्थापना झाली. नुसती संस्थेची स्थापना नाय तर महिला समाजाची इमारतसुद्धा उबी र्हवली. राणी पार्वतीदेवींचो स्त्री विकासाचो दृष्टिकोन व्यापक, उदात्त आणि फुडारलेलो होतो. त्या काळातसुद्धा ह्या महिला समाजाचा, महिलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणारा उत्तम वाचनालय होता. आता ह्या राजघराण्याचे वारसदार युवराज लखमराजे सावंत भोसले आणि तेंची पत्नी युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले ह्या उभयतांनी सावंतवाडी संस्थानची जगप्रसिद्ध चित्रकला 'गंजिफा' उर्जितावस्थेक आणुचो चंग बांधलेलो आसा. युवराज्ञी श्रद्धाराजे ह्यो आंतरराष्ट्रीय दर्जाच्यो शेफ आसत आणि तेंचा सावंतवाडीतला 'बुटीक आर्ट हॉटेल' पर्यटकांमुळा जगप्रसिद्ध झालेला आसा. राणी पार्वती देवी हायस्कूल, सावंतवाडी आणि श्री पंचम खेमराज महाविद्यालय ह्या दोन संस्थांच्या मार्फत राजघराण्याचो शिक्षणप्रसाराचो आणि कलेचो वारसो युवराणी श्रद्धाराजे हेनी चालू ठेवलेलो आसा.
राजकीय, सामाजिक कामात मालवणी मुलखातल्यो अनेक सुकन्यांचो सहभाग कौतुकास्पद आसा. अगदी राज्याच्या स्तरावर फुडारपण करणारे सावंतवाडीच्यो अहिल्याबाई रांगणेकर, देवगडच्यो मृणालताई गोरे हेनी आपल्या कर्तृत्वाचो ठसो उमटवल्यानी. ज्यावेळी समाजात आपड मानली जायत होती आणि दलितांका तुच्छ समजला जायचा त्या काळात नगरसेविका इंदिराबाई रांगणेकर दलित आवाठातना फिरत, त्या बायकांका चार भले गोष्टी सांगायचे, त्येंची जागृती करायचे. मालतीबाई बाक्रे ह्यो एक उत्तम विदुषी म्हणून प्रसिद्ध होत्यो. राजकीय कार्यकर्ती आणि हाडाची समाजसेविका म्हणून बाक्रे बाईंची प्रसिद्धी हुती. 1958 साली स्थापन झालेल्या समाज कल्याण योजनेची जबाबदारी तेंच्यावर सोपवलेली होती. बॅरिस्टर नाथ पै हेंची भावजय अनुताई पै हेनी मडुरा या छोट्याशा खेड्यात पंचायत समितीत निवडान येवन राजकीय आणि सामाजिक कामा केली.
ह्याच काळात संस्थानिक स्त्रियांच्या बरोबरीन अनेक उपक्रमात सामील झालेल्यो आणि बॅडमिंटन, पोहणा, हस्तकला हेच्यात निष्णात आसलेल्यो जिल्ह्यातल्यो प्रथम स्त्री पत्रकार आणि आदर्श शिक्षिका, समाजसेविका असा अष्टपैलू व्यक्तिमत्व लाभलेल्या मीराताई जाधवांका लोक आजून विसराक नाय. राजकीय, सामाजिक कार्य पुरुषांच्या बरोबरीन करणार्यो कणकवलीच्यो कमलताई परुळेकरानी अंगणवाडी चळवळ चालवली. मालवणात कन्याशाळा, बीएड कॉलेज काढणार्यो शिस्तप्रिय गुलाबताई गायतोंडे आणि राजकीय क्षेत्रात स्वत:चो ठसो उमटवलेल्यो मालतीबाई किर्लोस्कर अशी कितीतरी सिंधुरत्ना आजय लोकांच्या आठवणीत आसत.
काय म्हणतास? मालवणी लोक आळशी? अवो ह्यो अपप्रचार जाणूनबुजून केलेलो आसा मालवणी लोकांबद्दल. मालवणी झिलगे आसांदेत नाय तर चेडवा, उद्योग क्षेत्रात खूप फुडे गेलेली आसत. तुम्ही देवगडच्यो जयश्री साटमांचा नाव आयकान आसात काय? फळ प्रक्रियेतून परदेशातसुद्धा प्रॉडक्ट निर्यात केल्याबद्दल त्येंका महाराष्ट्र शासनाचो महिला उद्योजक पुरस्कार मिळालेलो आसा. काजू कारखानो चालवणार्यो वेंगुर्ल्याच्यो मंदाकिनी सामंत, स्वत:च्या हिमतीर साबणाची फॅक्टरी आणि लोणच्याचो घाऊक यापार करणारे आणि विशेष म्हणजे परदेशी पर्यटकांका सिंधुदुर्ग-गोवा दर्शन घडवणार्यो गाईड उद्योजिका जयश्री सामंत, सावंतवाडीच्यो अष्टपैलू उद्योजिका मृणालिनी कशाळीकर, हॉटेलच्या धंद्यात उतारलेल्यो मालवणच्यो सुरेखा वाळके, ममता पाटणकर अशी किती सिंधुकन्यांची नावा तुमचा सांगू, जेणी उद्योग क्षेत्रात आपल्या मुलखाचा नाव फुढे आणलेला आसा.
साहित्याच्या जगात पण मालवणी मुलखातल्यो महिला काय कमी नाय. 70 वर्षांपूर्वी 'वळेसर' कथासंग्रह लिवन वाचकांची वाहवा मिळवणार्यो सावंतवाडीच्यो राधाबाई मुळीक लोकांका आजून आठावतत. त्येंच्याच काळातल्यो कवयित्री उमाबाई माईणकर हेनी आपल्या कवितांतसून कोकणचा यथार्थ दर्शन घडवल्यानी. संगीत नाटककार लीलाबाई पेडणेकर, मालवणच्यो स्वप्नगंधा मालवणकर, सावंतवाडीच्यो ज्येष्ठ लेखिका उषा भागवत आणि कुडाळच्यो कादंबरीकार कुमुदताई रेगे, देवगडच्यो मंदाकिनी गोडसे हेंच्यानी मालवणी कविता लिवन नाव केल्यानी. सध्याच्या काळात उषा परब, कल्पना बांदेकर, डॉ. सई लळीत, वृंदा कांबळी, डॉ. शरयू आसोलकर, प्रा. प्रगती अमृते नाईक, संध्या तांबे, सुनंदा कांबळे, प्रा. तरुजा भोसले, वैशाली पंडित, कल्पना मलये, सरिता पवार अशो कितीतरी लेखिका आणि कवयित्री चांगला सकस लेखन करीत आसत.
कलेच्या क्षेत्रातसुद्धा सिंधुकन्या पाठी पडलेल्यो नाय. प्रसिद्ध गायिका शामल माजगावकर, जयश्री पाटकर, अभिनेत्री हंसा वाडकर ह्यो या मालवणी मुलखातल्योच. जयश्री पारकर ह्या गायिकेन त्या काळात बराच नाव कमावलेला होता. अभिनयाच्या दुनियेत नाव केल्यानी तेंच्यात सावंतवाडीची माधवी शिरसाट, कुडाळची वर्षा सामंत-वैद्य, देवगडची वृषाली खाडिलकर अशी नावा सांगूक येतीत. शास्त्रीय संगीतात वेंगुर्ल्याच्यो अनुजा गोगटे, मानसी कार्लेकर, मंजिरी धोपेश्वरकर अशो गायिका फुडे येत आसत. सावंतवाडीची सुकन्या स्नेहल पार्सेकर आपल्या शास्त्रीय नृत्याचा सादरीकरण जपानपर्यंत घेवन गेली. आमका ह्या सगळ्या सिंधुकन्यांचो अभिमान आसा.

