Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
सुनेत्रा पवारांना 'गुंगी गुडिया' म्हणणाऱ्या काँग्रेसला धनंजय मुंडेंनी करून दिली इंदिरा गांधींची आठवण

सुनेत्रा पवारांना 'गुंगी गुडिया' म्हणणाऱ्या काँग्रेसला धनंजय मुंडेंनी करून दिली इंदिरा गांधींची आठवण

मुंबई : बीडमधील पत्रकार परिषदेत घडलेल्या एका घटनेवरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. कारण, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना पत्रकारांना प्रश्न विचारण्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे यांनी रोखले आणि त्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

त्यामुळे याच पत्रकार परिषदेत घडलेल्या या प्रकाराची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली असतानाच या घटनेवर काँग्रेसनेही टीका केली आहे. परंतु, टीका करताना महाराष्ट्र काँग्रेसच्या अधिकृत X (आधीचे ट्विटर) अकाऊंटवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा उल्लेख 'गुंगी गुडिया' असा केला आहे. यावरून आता राज्याच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे. तर, या टीकेला आता धनंजय मुंडेंनी प्रत्युत्तर देत पत्रकार परिषदेत नेमके काय घडले? याची माहिती दिली आहे. तर मुंडेंनी यावेळी काँग्रेसला माजी पंतप्रधान इंदिरा गांधींची आठवण करून दिली आहे.

काँग्रेसने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना गुंगी गुडिया म्हणत टीका केल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. या टीकेनंतर आता काँग्रेसवर संताप व्यक्त करण्यात येत आहे. यावर आता धनंजय मुंडे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना उत्तर देत म्हटले की, काँग्रेसने सुनेत्रा पवार यांच्याविषयी केलेले हे वक्तव्य म्हणजे, त्यांच्या मनात राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याविषयी किती घृणा आणि द्वेष आहे, हे दाखवणारे आहे. काँग्रेसने सुनेत्रा वहिनींना गुंगी गुडिया म्हणण्यापूर्वी स्वत:चा इतिहास तपासून पाहावा. इंदिरा गांधी देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या तेव्हा तत्कालीन विरोधी पक्षाने त्यांना गुंगी गुडिया म्हटले होते. पण त्यानंतर इंदिरा गांधी यांनी कणखरपणे काम केले. सुनेत्रा वहिनींबाबत महाराष्ट्रात त्यापेक्षा चांगला अनुभव येईल. हीच भीती काँग्रेसला आहे, असे मुंडेंनी म्हटले.

तसेच, काँग्रेसने आपल्या अधिकृत सोशल मीडिया पेजवरुन सुनेत्रा वहिनींबाबत हे वक्तव्य केले. कदाचित काँग्रेसच्या या पेजवर झारखंडमध्ये पेपरफुटी झाली, त्यावर ते बोलले असते तर चांगले झाले असते. दिल्लीतील नीट आंदोलनात काँग्रेसने घेतलेली भूमिका खरी होती की खोटी होती, हे माहिती नाही. पण झारखंडच्या पेपरफुटीवर बोलल्यावर काँग्रेसची भूमिका स्पष्ट झाली असती, असा टोला धनंजय मुंडेंना लगावला आहे. यावेळी त्यांनी सुनेत्रा पवार यांच्या नुकत्याच पार पडलेल्या बीड दौऱ्यातील काही चर्चांविषयी भाष्य केले. या दौऱ्यासाठी सुनेत्रा वहिनी संध्याकाळी पाच वाजता बीडला आल्या. त्या रात्री 11 वाजेपर्यंत बैठका घेत होत्या. दुसऱ्या दिवशी डीपीडीसी आणि इतर बैठका आटोपून त्या प्रसारमाध्यमांशी बोलणार होत्या. मात्र, या पत्रकार परिषदेत केवळ निवेदन होईल, प्रश्नोत्तरे होणार नाहीत, अशी कल्पना अगोदरच देण्यात आली होती, असे सांगितले.

तर, सुनेत्रा पवार या आपलं सगळं दु:ख विसरुन जनतेसाठी काम करत होत्या. बीड दौऱ्यात जेव्हा अजितदादांच्या दोन कामांचा विषय आला तेव्हा वहिनी भावनिक झाल्या. त्यांचा हुंदका कधीही बाहेर पडेल, असे मला वाटले. तेव्हा माध्यम प्रतिनिधी प्रश्न विचारत असताना मी त्यांना म्हणालो की, 'आता आपण थांबायला पाहिजे.' सुनेत्रा वहिनी पहिल्यांदा पालकमंत्री म्हणून बीडला आल्या होत्या. भयंकर दु:ख पचवून त्या जनतेची सेवा करायला आल्या होत्या. अशावेळी माध्यमकर्मींनी थोडा भावनिक विचार करुन प्रश्न विचारणे थांबवायला पाहिजे होते. पण बीड जिल्ह्यातील माध्यमांविषयी मी ट्विट केले की, 95 टक्के जण अतिश्य चांगले काम करतात. पण काही मंडळींना बीड जिल्ह्याचे वातावरण सहजासहजी निवळून द्यायचं नाही, जातीपातीचं राजकारण चालू ठेवायचं आहे, असे धनंजय मुंडे यांनी सांगितले.

परंतु, गेले चार दिवस माझ्याविषयी चालवण्यात येणाऱ्या बातम्या मी पाहत आहे. मी चमत्काराविषयी जे भाष्य केले होते, ते माझ्या तब्येतीबाबत होते, राजकारणाबाबत नव्हते. तसेच बीडमधील पत्रकार परिषदेत एक शेतकरी सुनेत्रा पवारांसमोर खूप मोठ्या आवाजात बोलत होतो. मी त्याला इतकंच सांगितलं की, शांतपणे सांग. त्यानंतर माध्यमांनी बातमी चालवली की धनंजय मुंडेंनी शेतकऱ्याला दम दिला. मी एखाद्याला थांबा म्हटले तर ती चूक होत नाही. पण लगेच 'धनंजय मुंडेंची हुकूमशाही' अशा बातम्या चालवण्यात आल्या. मी दीड वर्ष झाले प्रसारमाध्यमांसमोर ब्र सुद्धा बोलत नाही. मी कोणत्याही मंत्रि‍पदावर नाही, आमदार आहे फक्त, तरी माझा किती द्वेष कराल. हे लोकशाहीला धरुन नाही. एका समाज घटकातील व्यक्तीला टार्गेट करणे बरोबर नाही. 252 दिवस माझी मीडिया ट्रायल झाली, अशी खंत धनंजय मुंडे यांनी बोलून दाखवली.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar