मुंबई : एकीकडे मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण तापले असताना दुसरीकडे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे ओबीसी किंवा कुणबी जात प्रमाणपत्र असल्याचा खळबळजनक दावा केला.
त्यांच्या या विधानाचे पडसाद राज्यात चांगलेच उमटले. यावरून सुप्रिया सुळे चांगल्याच संतापल्या आणि त्यांनी जाहीर माफी मागावी, अशा आशयाचे ट्विट केले. यानंतर अवघ्या काही मिनिटांच विजय वडेट्टीवार यांनी जाहीर माफी मागितली. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी काँग्रेसवर अनेक गंभीर आरोप केले. पण, वडेट्टीवार यांनी माफी मागताच त्यांनी आपले आरोप मागे घेतले. Congress vs NCP SP Clash
नेमकं प्रकरण काय?
राज्यातील आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, "राज्यातील अनेक मोठ्या मराठा नेत्यांनी ओबीसी प्रमाणपत्रे काढून घेतली आहेत. याच संदर्भात त्यांनी सुप्रिया सुळे आणि भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नावांचा थेट उल्लेख केला. पण, शरद पवार यांच्याकडे असे प्रमाणपत्र आहे की नाही, हे आपल्याला माहिती नसल्याचे विधान त्यांनी केले.
सुप्रिया सुळेंनी फेटाळला दावा
विजय वडेट्टीवारांच्या या दाव्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत स्पष्टीकरण दिले. "माझ्याकडे माझे जन्माचे, कॉलेजच्या पदवीचे, लग्नाचे आणि खासदारकीचे प्रमाणपत्र आहे, पण कोणतेही ओबीसी प्रमाणपत्र नाही. काँग्रेस नेत्यांनी माझे ओबीसी प्रमाणपत्र पुराव्यासह दाखवून द्यावे. विजय वडेट्टीवार यांनी हा आरोप पुराव्यासह सिद्ध करावा, नाहीतर विनापुरावा केलेल्या आरोपांबद्दल जाहीर माफी मागावी." असे आवाहन त्यांनी यावेळी केले. तसेच, "संसदेत आणि इतर ठिकाणी आम्ही नेहमी काँग्रेसची पाठराखण करतो. तरीही महाराष्ट्र काँग्रेसमधील लोक मला वारंवार का लक्ष्य करत आहेत," असे म्हणत आपली नाराजी व्यक्त केली.
काय म्हणाले प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे?
खासदार सुप्रिया सुळेंबाबत केलेल्या दाव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी विजय वडेट्टीवार यांच्यावर हल्लाबोल केला. "मित्र पक्षांना संपवण्यापेक्षा त्यांच्यासोबत काम करणे गरजेचे आहे. 2014 ला काँग्रेसमुळे सत्ता गेली. आम्ही महायुतीमध्ये जाण्याची चर्चा आहे, मात्र आम्ही महायुतीमध्ये गेलो का? आम्ही आहे तिथेच आहोत, मग आम्हाला लक्ष का केले जात आहे? विजय वडेट्टीवार यांना कुठून पुरावे मिळाले? ते त्यांनी सांगावे," अशी मागणी त्यांनी यावेळी केली. "वडेट्टीवार यांनी कोणाची सुपारी घेतली हे त्यांनी सांगावे. मित्राची गरज काँग्रेसला वाटत नाही का? सुप्रिया सुळे यांच्याबद्दल चुकीचे आरोप सहन करणार नाही" असा इशारा त्यांनी दिला. यावेळी, काँग्रेसच्या अशाच वागण्यामुळे 2014 मध्ये काँग्रेसची सत्ता गेल्याचा दावाही यादरम्यान केला.
वडेट्टीवारांनी मागितली माफी
शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून येणाऱ्या टीकेनंतर अखेर काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी काही तासांतच जाहीर माफी मागितली. "ओबीसी प्रमाणपत्राच्या संदर्भात माझी भूमिका मांडताना खासदार सुप्रिया सुळे यांच्या नावाचा अनावधानाने उल्लेख झाला. त्यामागे त्यांच्यावर कोणताही आरोप करण्याचा माझा हेतू नव्हता. अनावधानाने त्यांच्या नावाचा उल्लेख झाल्याबद्दल खेद व्यक्त करतो." असे म्हणत त्यांनी आपल्या विधानापासून माघार घेतली. त्यामुळे आता या वादावर पडदा पडण्याची शक्यता असली तरीही महाविकास आघाडीतील दोन महत्त्वाच्या नेत्यांमध्ये झालेल्या वादामुळे अनेक प्रश्न उपस्थित राहिले आहेत.

