दिवस 11 सप्टेंबर 1893 हा होता. शिकागोतील आर्ट इन्स्टिट्यूटचा भव्य हॉल, जगभरातून आलेल्या 7,000 हून अधिक विद्वानांचा मेळा आणि व्यासपीठावर भगव्या वस्त्रातील एक तरुण भारतीय संन्यासी. जागतिक सर्वधर्म परिषदेचे ते पहिले सत्र होते आणि स्वामी विवेकानंद जेव्हा बोलण्यासाठी उभे राहिले तेव्हा त्यांनी उच्चारलेले पहिले 5 शब्द इतिहासात कोरले गेले, सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका.
त्या 5 शब्दांनी संपूर्ण सभागृह 2 मिनिटे टाळ्यांच्या कडकडाटात बुडून गेले. कारण तिथे आलेल्या प्रत्येक वक्त्याने लेडीज अँड जंटलमन असे संबोधन केले होते, पण एका भारतीयाने सर्वांना आपल्या कुटुंबाचा भाग मानले होते. हाच भारतीय संस्कृतीचा पहिला विजय होता. विवेकानंदांनी भाषणात कोणत्याही धर्माची श्रेष्ठता सांगितली नाही. त्यांनी सांगितले की, मी अशा धर्माचा अभिमानी आहे ज्याने जगाला सहिष्णुता आणि सार्वत्रिक स्वीकृती हे 2 महान विचार शिकवले. आम्ही फक्त सहिष्णू नाही तर सर्व धर्म खरे आहेत असे मानतो, असे त्यांनी ठामपणे सांगितले. हिंदू धर्म हा कोणत्याही धर्माचा द्वेष करत नाही, तर प्रत्येक धर्मातील ईश्वरापर्यंत पोहोचण्याच्या वेगवेगळ्या वाटा आहेत हे मान्य करतो, हा विचार त्यांनी जगासमोर मांडला.
विवेकानंदांनी शिवमहिम्न स्तोत्रातील रुचीनां वैचित्र्यादृजुकुटिलनानापथजुषां या श्लोकाचा दाखला दिला, ज्याचा अर्थ असा की वेगवेगळ्या रुचीच्या लोकांनी वेगवेगळे मार्ग निवडले असले तरी ते सर्व शेवटी एकाच ईश्वराकडे जातात, जसे वेगवेगळ्या नद्या शेवटी समुद्राला मिळतात. त्या काळात जगात धार्मिक कट्टरता आणि सांप्रदायिकता शिगेला पोहोचली होती. अशा पार्श्वभूमीवर विवेकानंदांचा हा विचार म्हणजे एका नव्या युगाची सुरुवात होती. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की सांप्रदायिकता, धर्मांधता आणि त्यांचे भयानक वंशज असलेली असहिष्णुता यांनी या सुंदर पृथ्वीला दीर्घकाळ व्यापले आहे, त्यांनी पृथ्वी रक्ताने भरली आहे. जर ही भयानक राक्षसे नसती तर मानवी समाज आजच्यापेक्षा कितीतरी अधिक प्रगत झाला असता. त्यांचे हे भाषण केवळ 5 मिनिटांचे होते, पण त्याने अमेरिकेतील प्रत्येक वर्तमानपत्राचे पहिले पान व्यापले.
न्यूयॉर्क हेराल्डने लिहिले की विवेकानंद हे परिषदेतील नि:संशय सर्वात महान व्यक्ती आहेत. त्यानंतरच्या दिवसांत त्यांनी हिंदू धर्माचे तत्वज्ञान, वेदांत, आत्मा आणि पुनर्जन्म यावर सविस्तर व्याख्याने दिली. पण 11 सप्टेंबरचे ते पहिले भाषण म्हणजे भारताच्या आध्यात्मिक पुनरुज्जीवनाचा प्रारंभ होता. पराभव आणि गुलामगिरीने खचलेल्या भारतीयांना त्यांनी सांगितले की तुमची संस्कृती महान आहे. आज 13३ वर्षांनंतरही जेव्हा जगात दहशतवाद आणि धर्माच्या नावावर हिंसा घडते, तेव्हा शिकागोतील ते 5 शब्द अधिक प्रासंगिक वाटतात, कारण तो धर्माचा नव्हे तर मानवतेचा जयघोष होता.

