पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राष्ट्रीय सुरक्षा क्षेत्रातील योगदानासाठी देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान केला. शनिवारी (1 ऑगस्ट) अमित शहा पुण्यात येणार म्हणून काँग्रेसने आंदोलनाची घोषणा करण्यात आली होती.
यावेळी, नीट पेपरफुटी आणि आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी केलेल्या मारहाणीवरून अमित शहांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. यावेळी त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली. या पार्श्वभूमीवर पुणे शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यामुळे या सर्व घडामोडींवर अमित शहा हे भाषणामध्ये काही भाष्य करणार का? याकडे सर्वांचे लक्ष होते. Amit Shah Pune
देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना पुरस्कार प्रदान केल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी यांनी भाषण केले. "लोकमान्य टिळक यांनी देशाला नवीन दिशा देण्यासाठी उद्घोषणा केली, स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे. जेव्हा त्यांनी हे वाक्य बोलले असेल तो क्षण कसा असेल याचा केवळ मी विचार करू शकतो. टिळकांनी जनतेला जोडण्याचे काम केले, त्यांनी आंदोलनात एका नवीन प्रकारच्या राष्ट्रवादाला जन्म दिला, सांस्कृतिक राष्ट्रवाद. त्यांनी गणेशोत्सव आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंती सुरु केली, हा देश जेव्हा स्वतंत्र होईल तेव्हा, याच मार्गाने पुढे जाईल, हे त्यांनी तेव्हा ठरवले होते आणि आज तेच सुरू आहे." असे म्हणत आपल्या भावना व्यक्त केल्या.
विद्यार्थी आंदोलन किंवा नीट पेपरफुटीवर अमित शहा काही भाष्य करतील का? अशी चर्चा असताना त्यांनी या भाषणात तरुणांना एक सल्ला दिला. "मला लोकमान्य टिळकांचा गीतारहस्य हा ग्रंथ गुजरातीत मिळाला. माझे तरुणांना आवाहन आहे की, तुम्ही टिळकांचे गीतारहस्य वाचा. तुमच्या आयुष्यात तुम्ही कधीच चूक करणार नाही. हा ग्रंथ भगवदगीतेचे व्यावहारिक स्वरूप आहे. सामान्य माणूस भगवतगीता कशी जगू शकतो. त्याचे व्यवहारीक स्वरुप त्यात आहे." असा सल्ला त्यांनी यावेळी युवकांना दिला.
"टिळकांनी स्वराज्यासाठी आयुष्य खर्च केले. त्यांनी स्वराज्याच्या आंदोलनासोबत जनतेला जोडण्याचे काम केले. इंग्रज कोणत्या पेपरला घाबरायाचे तर केसरी आणि मराठाला घाबरायचे. त्यामध्ये टिळकांचे मोठे योगदान होते. राष्ट्राच्या चेतनेला जागवल्याशिवाय स्वातंत्र्य मिळत असेल तर त्याला काही मूल्य नाही. राष्ट्राची चेतना जागवूनच स्वातंत्र्य मिळाले पाहिजे असे ते म्हणायचे. त्यांनी अनेक उत्सवाच्या माध्यमातून लोकांना संघटीत करण्याचे काम केले," अस म्हणत अमित शहांनी लोकमान्य टिळकांच्या कार्याचा गौरव केला.

