Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
ठाण्यात साकारणार अत्याधुनिक वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहालय,चितळसर-मानपाडा येथे १० हेक्टर जागेवर महत्त्वाकांक्षी प्रकल्प

ठाण्यात साकारणार अत्याधुनिक वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहालय,चितळसर-मानपाडा येथे १० हेक्टर जागेवर महत्त्वाकांक्षी प्रकल्प

ठाणे । मुंबईतील जिजामाता भोसले उद्यान आणि प्राणी संग्रहालयाच्या धर्तीवर ठाणे शहरात अत्याधुनिक वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहालय उभारण्यात येणार आहे. चितळसर-मानपाडा येथील टिकुजिनी वाडी परिसरातील सुमारे दहा हेक्टर जागेवर हा प्रकल्प साकारला जाणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडून महानगरपालिका क्षेत्रातील विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून दिला जात असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार ठाण्यातील विविध प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामध्ये वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहालयाच्या विकासाचाही समावेश आहे.चितळसर-मानपाडा परिसरातील आरक्षित जागेवर उभारल्या जाणाऱ्या या प्रकल्पातून निसर्ग, जैवविविधता, पर्यावरण संवर्धन आणि पर्यटन यांचा संगम साधण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. विविध वनस्पती प्रजातींचे संवर्धन, पर्यावरण जनजागृती तसेच नागरिकांना दर्जेदार विरंगुळ्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रशासनाचा मानस आहे. राज्य शासनाच्या २० जुलै २०२६ रोजीच्या शुद्धीपत्रकानुसार ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील विकासकामांसाठी १५० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, या प्रकल्पासाठी सुरुवातीच्या टप्प्यात १० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. वेगाने विस्तारत असलेल्या ठाणे शहराला पर्यावरणपूरक प्रकल्पांची गरज असल्याचे सांगत प्रताप सरनाईक यांनी, या उद्यानामुळे नागरिकांना शहरातच निसर्गाचा अनुभव घेता येईल, तर विद्यार्थ्यांसाठी हे ठिकाण निसर्गशिक्षणाचे केंद्र ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. भविष्यात ठाण्याच्या पर्यटन नकाशावर महत्त्वाचे स्थान मिळावे, या दृष्टीने या प्रकल्पाचा दर्जेदार विकास करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या प्रकल्पामुळे चितळसर-मानपाडा परिसराच्या सौंदर्यात भर पडण्याबरोबरच ठाण्याच्या पर्यटन आणि पर्यावरण क्षेत्राला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar