Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
ठाण्यात येणार्‍या डेटा सेंटरची रहिवाशांना चिंता!

ठाण्यात येणार्‍या डेटा सेंटरची रहिवाशांना चिंता!

कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल अर्थव्यवस्थेच्या युगात डेटा सेंटर ही काळाची गरज बनली असली, तरी त्यासाठी शहरांचे पाणी, वीज, पर्यावरण आणि नागरिकांचे आरोग्य धोक्यात घालायचे का, हा प्रश्न आता जगभर उपस्थित होत आहे.

ठाण्यातील बाळकूम येथे प्रस्तावित डेटा सेंटरविरोधात नागरिकांनी उभारलेले आंदोलन हे केवळ एका प्रकल्पाविरोधातील नाही, तर विकासाच्या विद्यमान मॉडेललाच दिलेले आव्हान आहे. त्यामुळे प्रशासनाने विकास आणि पर्यावरणाचा समतोल साधत नागरिकांचा विश्वास संपादन करायला हवा.


कृत्रिम बुद्धिमत्ता, क्लाऊड कॉम्प्युटिंग, डिजिटल अर्थव्यवस्था आणि इंटरनेटच्या झपाट्याने वाढणार्‍या वापरामुळे जगभरात डेटा सेंटरची उभारणी अभूतपूर्व वेगाने सुरू आहे. जगातील सर्वात मोठ्या तंत्रज्ञान कंपन्या अब्जावधी डॉलरची गुंतवणूक करून प्रचंड क्षमतेची डेटा सेंटर उभारत आहेत. भारतही या स्पर्धेत मागे नाही. मुंबई महानगर प्रदेश, हैदराबाद, चेन्नई, नोएडा यांसारख्या शहरांमध्ये डेटा सेंटर उद्योग झपाट्याने विस्तारत आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वाढत्या गरजांमुळे पुढील काही वर्षांत भारत हा आशियातील सर्वात मोठा डेटा सेंटर हब बनण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे चित्र आहे. मात्र, या विकासाच्या झगमगाटामागे एक वेगळीच वास्तवकथा दडलेली आहे. डेटा सेंटर म्हणजे केवळ संगणकांचे गोदाम नाही. तर, ती प्रचंड प्रमाणात वीज, पाणी, जमीन आणि शीतकरण प्रणालीवर (कुलिंग सिस्टम) चालणारी यंत्रणा आहे. या प्रकल्पांचा स्थानिक पर्यावरणावर, पाणीपुरवठ्यावर, ऊर्जावापरावर, ध्वनी प्रदूषणावर आणि नागरी जीवनावर होणारा परिणाम आता जगभर चर्चेचा विषय ठरत आहे. त्यामुळेच इंग्लंडपासून अमेरिकेपर्यंत आणि आयर्लंडपासून नेदरलँड्सपर्यंत अनेक ठिकाणी नागरिकांनी डेटा सेंटर प्रकल्पांना विरोध केला आहे.

आता हाच संघर्ष ठाण्यातही उभा राहिला आहे. बाळकूम येथे प्रस्तावित डेटा सेंटरविरोधात हजारो नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. स्थानिक रहिवासी, गृहनिर्माण संस्था, पर्यावरणप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध राजकीय पक्षांनी या प्रकल्पावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. प्रशासन विकासाची भाषा बोलत असताना नागरिक जीवनमान, पर्यावरण आणि संसाधनांच्या संरक्षणाची भाषा बोलत आहेत. त्यामुळे हा संघर्ष केवळ एका प्रकल्पाचा राहिलेला नाही; तो विकासाच्या मॉडेलवरच प्रश्न उपस्थित करणारा बनला आहे. आजचा मूलभूत प्रश्न असा आहे की, डिजिटल अर्थव्यवस्थेच्या नावाखाली शहरांवरील नैसर्गिक संसाधनांचा भार वाढवून सामान्य नागरिकांना त्याची किंमत मोजावी लागणार आहे का? विकास आणि पर्यावरण यांच्यातील समतोल साधण्याची जबाबदारी नेमकी कोणाची? ठाण्यातील आंदोलन या प्रश्नांची उत्तरे मागत आहे.

बाळकूम येथे प्रस्तावित डेटा सेंटरविरोधात गेल्या काही दिवसांत निर्माण झालेली परिस्थिती ही केवळ स्थानिक नाराजी नाही. हजारो नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करणे, प्रशासनासमोर प्रश्न मांडणे, लोकप्रतिनिधींनी निवेदने देणे आणि सार्वजनिक सुनावणीची मागणी करणे हे या विषयाचे गांभीर्य अधोरेखित करते. नागरिकांनी उपस्थित केलेल्या आक्षेपांकडे दुर्लक्ष करता येणार नाही. त्यांच्या मते, प्रस्तावित प्रकल्पासाठी दररोज मोठ्या प्रमाणात शुद्ध पाण्याची गरज भासणार आहे. आधीच पाणीटंचाईचा सामना करणार्‍या शहरात एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाणी उद्योगासाठी वापरले जाणार असेल, तर त्याचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांवर होणार नाही का, हा प्रश्न स्वाभाविक आहे. याशिवाय डेटा सेंटरला अखंड वीजपुरवठा आवश्यक असतो. अशा परिस्थितीत शहरातील वीज यंत्रणेवर अतिरिक्त ताण येईल का, भविष्यात घरगुती आणि औद्योगिक वापरात संघर्ष निर्माण होईल का, याबाबतही नागरिक साशंक आहेत. आणखी एक गंभीर मुद्दा म्हणजे सतत कार्यरत राहणार्‍या कूलिंग यंत्रणांमधून निर्माण होणारा ध्वनी. निवासी भाग, शाळा आणि रुग्णालयांच्या जवळ अशा प्रकल्पाची उभारणी झाल्यास त्याचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

ठाण्यात जे घडत आहे, ते जगासाठी नवीन नाही. उलट, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विस्तारामुळे जगभरात डेटा सेंटरची संख्या वाढत आहे. त्यामुळे नवीन संकटे निर्माण होत असल्याची चर्चा सुरू आहे. आज एआय मॉडेल्सना प्रशिक्षण देण्यासाठी आणि क्लाऊड सेवा चालवण्यासाठी प्रचंड संगणकीय क्षमता लागते. त्यासाठी हजारो सर्व्हर दिवस-रात्र चालू ठेवावे लागतात. परिणामी विजेची मागणी विक्रमी वेगाने वाढत आहे. आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालात स्पष्ट केले आहे की, कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे डेटा सेंटरची ऊर्जा मागणी पुढील काही वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. ही वाढ अनेक देशांच्या ऊर्जा नियोजनालाच आव्हान देणारी ठरू शकते.

युरोपमध्ये अनेक भागांत नागरिकांनी प्रश्न उपस्थित केला आहे की, घरांसाठी, शेतीसाठी आणि उद्योगांसाठी आवश्यक असलेली वीज आधी उपलब्ध करून द्यायची की डेटा सेंटरसाठी राखून ठेवायची? ब्रिटनमध्ये तर वीज जाळ्यावर वाढणार्‍या ताणामुळे डेटा सेंटर प्रकल्पांच्या मंजुरी आणि ग्रीड कनेक्शनच्या प्रक्रियेवर नव्याने चर्चा सुरू झाली आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे. डेटा सेंटर उद्योगाला विरोध हा तंत्रज्ञानाला विरोध नाही; तर नियोजनाशिवाय होणार्‍या विकासाला विरोध आहे. डिजिटल अर्थव्यवस्था आवश्यक आहे; पण ती नागरिकांच्या मूलभूत गरजांवर मात करून उभी राहू नये, हीच जगभरातील नागरिकांची भूमिका आहे.

अमेरिकेतील रिझोना, टेक्सास, व्हर्जिनिया, आयर्लंड, नेदरलँड्स, स्पेन, ब्रिटन आणि आशियातील अनेक देशांमध्ये डेटा सेंटरच्या वाढत्या संख्येमुळे स्थानिक प्रशासनासमोर नवे प्रश्न उभे राहत आहेत. जागतिक स्तरावर कृत्रिम बुद्धिमत्तेचा विस्तार होत असताना मोठ्या तंत्रज्ञान कंपन्या अब्जावधी डॉलरची गुंतवणूक करत आहेत. नवीन डेटा सेंटर उभारण्यासाठी हजारो एकर जमीन, स्वतंत्र वीजपुरवठा आणि अत्याधुनिक कूलिंग व्यवस्था उभारली जात आहे. यामुळे रोजगार आणि गुंतवणूक वाढत असली, तरी दुसरीकडे स्थानिक नागरिकांच्या प्रश्नांनाही अधिक तीव्रता मिळत आहे.

विशेष म्हणजे, अनेक देशांमध्ये नागरिकांनी उपस्थित केलेले प्रश्न आणि ठाणेकरांनी विचारलेले प्रश्न जवळपास सारखेच आहेत. स्थानिक पाणीपुरवठ्यावर परिणाम होईल का? विजेच्या उपलब्धतेवर ताण येईल का? पर्यावरणीय परिणामांचा सखोल अभ्यास झाला आहे का? सार्वजनिक सल्लामसलत झाली आहे का? या प्रश्नांची उत्तरे न मिळाल्याने अनेक ठिकाणी प्रकल्पांना विरोध झाला आहे. याचा अर्थ असा नाही की डेटा सेंटर अनावश्यक आहेत. उलट, आधुनिक अर्थव्यवस्थेसाठी ते अपरिहार्य आहेत. परंतु त्यांची जागा, क्षमता, संसाधनांचा वापर आणि पर्यावरणीय परिणाम यांचे नियोजन अधिक जबाबदारीने करणे आवश्यक आहे. अन्यथा विकासाच्या नावाखाली निर्माण होणारा संघर्ष अधिक तीव्र होणार आहे.

भारतातील बहुतांश महानगरे आधीच पाणीटंचाई, वाढती लोकसंख्या आणि अपुर्‍या नागरी सुविधांशी झुंज देत आहेत. ठाणेही त्याला अपवाद नाही. अशा परिस्थितीत मोठ्या प्रमाणात पाणी वापरणार्‍या उद्योगांना परवानगी देताना प्रशासनाने अत्यंत सावध भूमिका घेणे अपेक्षित आहे. डेटा सेंटरमध्ये सर्व्हर सतत कार्यरत असल्यामुळे त्यांना नियंत्रित तापमानात ठेवण्यासाठी अत्याधुनिक शीतकरण व्यवस्था आवश्यक असते. काही तंत्रज्ञानांमध्ये पाण्याचा वापर तुलनेने कमी असला, तरी अनेक ठिकाणी शीतकरणासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता भासते. त्यामुळे स्थानिक जलस्रोतांवर अतिरिक्त ताण निर्माण होऊ शकतो. हवामान बदलामुळे पाण्याची उपलब्धता अनिश्चित होत असताना हा प्रश्न अधिक गंभीर बनतो.

मोठी गुंतवणूक, आधुनिक तंत्रज्ञान आणि जागतिक कंपन्यांची उपस्थिती हे कोणत्याही शहरासाठी अभिमानाचे विषय असू शकतात. परंतु विकासाची व्याख्या केवळ गुंतवणुकीच्या आकड्यांवर होत नाही. विकासाचा खरा अर्थ म्हणजे नागरिकांचे जीवन अधिक सुरक्षित, सुसह्य बनविणे. एखादा प्रकल्प हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक आणत असेल, पण त्याचवेळी स्थानिक नागरिकांच्या पाणी, वीज, वाहतूक, आरोग्य आणि पर्यावरणावर ताण निर्माण करत असेल, तर त्या विकासाचे मूल्यांकन नव्याने करावे लागते. प्रशासनाने केवळ आर्थिक लाभ मोजून निर्णय घेणे पुरेसे नसते; सामाजिक आणि पर्यावरणीय किंमतही तितक्याच गांभीर्याने मोजावी लागते. आज जगभरात 'सस्टेनेबल डेव्हलपमेंट' म्हणजेच शाश्वत विकासावर भर दिला जात आहे. म्हणजेच आर्थिक प्रगती आणि पर्यावरणीय संरक्षण यांच्यात संतुलन राखणे. भारतानेही याच दिशेने वाटचाल करणे आवश्यक आहे. अन्यथा भविष्यात प्रत्येक मोठा प्रकल्प नागरिक आणि प्रशासन यांच्यातील संघर्षाचे कारण ठरेल.

आज ठाण्यात जे घडत आहे, ते उद्या भारतातील इतर शहरांमध्येही घडू शकते. कारण भारत वेगाने डिजिटल अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, क्लाऊड सेवा, डिजिटल बँकिंग, ई-कॉमर्स, ऑनलाइन शिक्षण आणि ई-गव्हर्नन्स या सर्व सेवांचा पाया डेटा सेंटरवर उभा आहे. त्यामुळे डेटा सेंटरची गरज नाकारता येणार नाही. परंतु या गरजेची पूर्तता करताना शहरांची वहनक्षमता लक्षात घेणे तितकेच आवश्यक आहे. प्रत्येक शहराची पाणी उपलब्धता, वीज क्षमता, पर्यावरणीय स्थिती, वाहतूक व्यवस्था आणि लोकसंख्या वेगळी असते. म्हणूनच सर्व शहरांसाठी एकच विकास मॉडेल लागू होऊ शकत नाही.

आज शहराचा विकास आमच्यासाठी आहे की आमच्यावर? असाच प्रश्न ठाणेकरांसमोर असून या प्रश्नाचे उत्तर केवळ या एका प्रकल्पापुरते मर्यादित राहणार नाही. सुंदर, डिजिटल अशा ठाण्याची उभारणी आवश्यक आहे; पण त्या भारताचा पाया पाणी, पर्यावरण, सार्वजनिक आरोग्य आणि लोकशाही सहभाग यांच्या भक्कम आधारावरच उभा राहिला पाहिजे. विकासाचा वेग जितका महत्त्वाचा आहे, तितकाच त्यामागील विवेकही महत्त्वाचा आहे. कारण इतिहास साक्षी आहे, लोकांच्या विश्वासावर उभा राहिलेला विकासच दीर्घकाळ टिकतो; लोकांच्या विरोधावर उभे राहिलेले प्रकल्प मात्र कायम वादाच्या भोवर्‍यात अडकून राहतात.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar