भिवंडी । पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर विद्युत अपघातांचा धोका वाढत असल्याने भिवंडी शहर व परिसरात वीज वितरण करणाऱ्या टोरेंट पॉवर कंपनीने आपल्या भिवंडी फ्रँचायझी क्षेत्रामध्ये सुरक्षित वीज वापराला प्रोत्साहन देणे आणि विद्युत अपघात टाळणे या हेतूने विद्युत सुरक्षा व ग्राहक जनजागृती अभियान राबविण्यात आले.
या दरम्यान विद्युतदृष्ट्या असुरक्षित असलेल्या २६६ इमारतींना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. या इमारती प्रामुख्याने दोन प्रकारांमध्ये विभागल्या आहेत. पहिल्या प्रकारात मीटरविना अनधिकृत वीज वापर करणाऱ्या इमारतींचा समावेश आहे. अशा अनधिकृत वापरामुळे असुरक्षित आणि अतिभारित विद्युत जाळे तयार होते, ज्यामुळे वीज धक्का, शॉर्टसर्किट,आग लागणे तसेच जीवितहानी होऊ शकणाऱ्या अपघातांचा धोका वाढतो. टोरेंट पॉवरकडून अनधिकृत जोडण्या तोडण्यासाठी नियमित मोहिमा राबविण्यात येत असल्या, तरी काही व्यक्ती स्वतःच्या स्वार्थासाठी अनधिकृत वीज वापर सुरू ठेवतात.
यामुळे अपघातप्रवण आणि धोकादायक विद्युत जाळे निर्माण होते. विशेषतः पावसाळ्यात अशा असुरक्षित विद्युत जाळ्यांमुळे विद्युत अपघात होण्याची शक्यता अधिक वाढते आणि हे अपघातांचे एक प्रमुख कारण ठरते. संबंधित इमारतींना अधिकृत वीज मीटर घेऊन वीजपुरवठा नियमित करण्याचे नोटिसद्वारे आवाहन करण्यात आले आहे.दुसऱ्या श्रेणीमध्ये अशा इमारतींचा समावेश होतो जिथे वीज मीटर बसवलेले आहेत, परंतु इमारतीची अंतर्गत वायरिंग आणि मीटरमधून ग्राहकाच्या जागेपर्यंत जाणारी वायरिंग असुरक्षित, खराब आहे किंवा तिचे नूतनीकरण करणे आवश्यक आहे. अशा इमारतींमधील विद्युत व्यवस्था पावसाळ्यात अधिक धोकादायक ठरू शकते. इमारतींना परवानाधारक विद्युत कंत्राटदारां मार्फत त्यांच्या विद्युत वायरिंगची आवश्यक दुरुस्ती आणि नूतनीकरण करून घेण्याचा नोटिस देण्यात आला आहे.या मोहिमेअंतर्गत नोटिसा बजावलेल्या काही इमारतींमध्ये परशुराम निवास (कणेरी),मास्टर अपार्टमेंट (गौरीपाडा), जलाराम हाउसिंग सोसायटी (गोकुळ नगर),शिवम रेसिडेन्सी (टेमघर पाडा),सदाफ अपार्टमेंट (वफा कॉम्प्लेक्स),अल साबा अपार्टमेंट (अवचित पाडा), रहमत कॉम्प्लेक्स (पिराणी पाडा), यशराज अपार्टमेंट (पद्मा नगर),आणि तेहामी अपार्टमेंट (निजामपुरा) यांचा समावेश आहे.जनहित आणि विद्युत सुरक्षेच्या दृष्टीने असुरक्षित म्हणून ओळखल्या गेलेल्या इमारतींची संपूर्ण यादी टोरेंट ग्राहक पोर्टलवर प्रसिद्ध केली आहे.नागरिकांनी योग्य निर्णय घेण्यासाठी ही यादी जरूर तपासावी त्याच बरोबर सर्व ग्राहक, गृहनिर्माण संस्था,घरमालक आणि मालमत्ता धारकांना अधिकृत वीज वापर करण्याचे तसेच त्यांच्या विद्युत यंत्रणांची नियमित तपासणी व देखभाल करण्याचे आवाहन टोरंट पॉवर प्रशासना कडून करण्यात आले आहे, जेणेकरून विद्युत अपघात टाळता येतील आणि सार्वजनिक सुरक्षेला बळकटी मिळेल असे स्पष्ट केले आहे.

