मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांच्यावर शुक्रवारपासून (4 जुलै) खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एकनाथ शिंदे यांना अशक्तपणा आणि ताप आल्यामुळे शुक्रवारी संध्याकाळी त्यांना ठाण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
त्यांची प्रकृती चांगली असून त्यांनी आजारपणातही राज्यातील पावसाचा आढावा घेत काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत.
सध्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बरीच धावपळ झाली आहे. अशातच दिल्लीवाऱ्या, ठाकरे गटातील बंडखोरांचा शिवसेनेत प्रवेश, पक्षाची कामे, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी यामुळे त्यांना स्वत:च्या प्रकृतीकडे लक्ष द्यायला वेळ मिळाला नाही. याचा परिणाम त्यांच्या तब्येतीवर झाल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे त्यांना अशक्तपणा जाणवू लागला आणि अंगात कणकणदेखील होऊ लागली होती. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून त्यांनी रुग्णालयात दाखल होणे पसंत केले.
मधल्या काळात अनेक राजकीय घडामोडी झाल्या. ठाकरे गटातील सहा खासदार शिवसेनेच्या गळाला लागले. त्यांचा पक्षप्रवेश, त्यानंतर ठाकरे गटाचे विधान परिषद सदस्य सचिन अहिर यांचा अचानक विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी अर्ज दाखल करत ठाकरे गटाला मोठा धक्का देण्यात आला. या सर्व कामांसाठी एकनाथ शिंदे यांना मोठी धावपळ करावी लागली. तसेच त्यांना अचानक दिल्ली दौरे या साऱ्या दगदगीचा त्यांच्या तब्येतीवर परिमाण झाला. शिवाय पावसाळी अधिवेशन सुरू आहे. त्यामुळे त्यांना अशक्तपणाचा त्रास होऊ लागला होता. दरम्यान, दिवसभर पावसाने गोंधळ घातल्यामुळे एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयातूनच आढावा घेतला आणि शिवसैनिकांनी घटनास्थळी जाऊन मदत करण्याचे आदेश दिले.
दरम्यान, शिंदे यांची तब्येत चांगली असून चिंतेचे कोणतेही कारण नाही, असे रुग्णालय प्रशासनाने कळवले आहे. वास्तविक धुळ्यातील ठाकरे गटाच्या शुभांगी पाटील यांच्या शिवसेना प्रवेशाचा कार्यक्रम शुक्रवारी ठाण्यात दुपारी होणार होता. मात्र, एकनाथ शिंदे यांना ताप येऊ लागल्याने आणि अशक्तपणा जाणवू लागल्याने त्यांना कार्यक्रमाला जाऊ न देता रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यामुळे मध्यरात्री दोन वाजता खासदार श्रीकांत शिंदे यांचा उपस्थितीत शुभांगी पाटील यांनी पक्षप्रवेश केला. शुभांगी पाटील यांनी महाविकास आघाडीकडून नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढवली होती आणि त्यांना 50 हजार मते मिळाली होती.

