Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
उत्तन-पाली डम्पिंग ग्राउंडबाबत हरित लवादाचे पालिकेला निर्देश

उत्तन-पाली डम्पिंग ग्राउंडबाबत हरित लवादाचे पालिकेला निर्देश

भाईंदर : मिरा-भाईंदर महापालिकेच्या उत्तन-पाली येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाबाबत राष्ट्रीय हरित लवादाच्या पश्चिम विभागीय खंडपीठाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. प्रकल्प तातडीने बंद करणे पर्यावरणाच्या दृष्टीने योग्य ठरणार नसल्याचे स्पष्ट करताना, महापालिकेला संबंधित प्राधिकरणाकडून पर्यावरण मंजुरी मिळविण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

तसेच, उत्तन-पाली येथील तब्बल 9.09 लाख मेट्रिक टन साचलेला विना प्रक्रिया असलेला (वारसा) कचरा हटविण्यासाठी तीन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. अन्यथा तीन महिन्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने नुकसान भरपाई निश्चित करून दंड आकारण्याचे निर्देश आदेशात दिले आहेत.

हरित लवाद समोर सादर झालेल्या माहितीनुसार, उत्तन-पाली येथील सर्व्हे क्रमांक 25 आणि 65 या ठिकाणी कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू आहे. या ठिकाणी 2009 पासून मोठ्या प्रमाणात साचलेला विना प्रक्रिया असलेला (वारसा) कचरा असून, त्यातून आग लागणे, लीचेटमुळे घाण व दुर्गंधीयुक्त पाणी निघून आजुबाजुच्या जलस्रोत व परिसरावर परिणाम होणे, दुर्गंधी आणि नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. यात दहा याचिकाकर्त्या संस्था यांच्या म्हणण्यानुसार, दररोज सुमारे 500 मेट्रिक टन कचरा या ठिकाणी येत असून त्यातील सुमारे 200 मेट्रिक टन कचर्यावर प्रक्रिया न-होता तो टाकला जात असल्याचा दावा करण्यात आला होता.

या प्रकरणात महापालिकेने पर्यायी जागांचा शोध घेण्यासाठी प्रयत्न केल्याचे हरित लवादाने नोंदवले. मात्र, पर्यायी ठिकाणी स्थानिकांचा विरोध झाल्याने स्थलांतराचा प्रश्न गुंतागुंतीचा बनला आहे. सध्या योग्य पर्यायी जागा उपलब्ध नसल्याने नवीन योग्य जागा मिळेपर्यंत विद्यमान सुविधा स्थलांतरित करण्याची आवश्यकता नसल्याचे लवादाने यापूर्वीच्या नोंदींच्या आधारे स्पष्ट केले. उत्तन-पाली येथे सुमारे 31.02 हेक्टर क्षेत्र घनकचरा व्यवस्थापनासाठी उपलब्ध आहे. प्रकल्पात ओला व सुका कचरा प्रक्रिया, लीचेट प्रक्रिया, सॅनिटरी लँडफिल तसेच विकेंद्रित कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याची कामे सुरू असल्याचे महापालिकेने लवादाला सांगितले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar