वसई: वसई विरारमध्ये गुरुवारी (23 जुलै) पहाटे झालेल्या जोरदार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे विरार पूर्वेतील चंदनसार परिसरात एक महाकाय वडाचे झाड मुख्य रस्त्यावर कोसळले. झाड कोसळताना विजेचे खांब आणि तारा देखील खाली आल्याने संपूर्ण परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला.
सुदैवाने ही घटना पहाटे घडल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.
गुरुवारी पहाटे विरार परिसरात मुसळधार पाऊस आणि जोरदार वादळी वाऱ्याने हजेरी लावली. या नैसर्गिक तडाख्याचा सर्वाधिक फटका विरार पूर्व येथील चंदनसार परिसराला बसला. मुख्य रस्त्यालगत उभे असलेले जुने आणि विशाल वडाचे झाड मुळासकट उन्मळून थेट रस्त्यावर कोसळले.
झाड पडताना त्याचा मोठा भाग विजेच्या तारांवर आणि खांबांवर आदळला. त्यामुळे परिसरातील तब्बल तीन ते चार विजेचे खांब वाकून जमिनीवर कोसळले तर अनेक विद्युत तारा रस्त्यावर विखुरल्या. ही परिस्थिती धोकादायक असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून तातडीने रस्ता दोन्ही बाजूनी बंद करण्यात आला. परिणामी काही काळ परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आणि वाहतुकीवर मोठा परिणाम झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. कोणताही अपघात होऊ नये म्हणून महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून संबंधित भागातील वीजपुरवठा तात्काळ बंद करण्यात आला. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी झाडाच्या फांद्या कापून रस्ता मोकळा करण्याचे काम सुरू केले. त्यांच्या प्रयत्नांमुळे काही वेळात मुख्य रस्त्यावरील अडथळा दूर करण्यात यश आले.
दरम्यान विजेचे खांब कोसळल्यामुळे चंदनसार आणि आसपासच्या परिसरातील शेकडो ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यानंतर महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी कोसळलेल्या खांबांची दुरुस्ती करून परिसरातील वीज पुरवठा पूर्ववत केला.
या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी वादळी पावसामुळे मोठे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. हवामान खराब असल्याने नागरिकांनी अनावश्यक बाहेर पडणे टाळावे तसेच पडलेले विजतारे किंवा धोकादायक ठिकाणांपासून सुरक्षित अंतर राखावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

