Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
वाळूशिल्पकार रविराज चिपकर

वाळूशिल्पकार रविराज चिपकर

- नारायण गिरप

मूर्तिकलेचे पारंपरिक बाळकडू घेऊन जन्मलेल्या शांत, मेहनती रविराजने आपल्या गणेश चित्रशाळेत शाडूच्या मातीने बाप्पा साकारतानाच वेगळा प्रयोग म्हणून वाळूशिल्पामध्ये कौशल्य प्राप्त केले.

शिल्पकलेतील भीष्माचार्य राम सुतार यांच्याकडे नोएडात रविराजने सहा महिने शिक्षण घेतले. जे.जे.स्कूल ऑफ आर्टमधील फाईन आर्टचे सुवर्णपदक विजेते दीपक गावडे यांचे या क्षेत्रात रविराजला लहानपणापासूनच मार्गदर्शन लाभले तसेच जे.जे. स्कूलमधील श्रीकांत वलावटे यांनी त्याला मूर्तीकामाबाबत मार्गदर्शन केले. वयाच्या 23व्या वर्षी कोकणातील समुद्रकिनारी महोत्सवात सहभागी होत वाळूशिल्पाचा श्रीगणेशा झाला.


कोकणच्या मातीला संस्कृतीचा गंध आहे तसेच येथील कलेलाही परंपरेची जोड आहे. या मातीतील कलाकार ह्याच मातीशी इमान राखून घडतात! मनात 'जिद्द' असेल तर यशाची 'हद्द' सुध्दा आपण सहज पार करू शकतो. वाळू हातात घेतली तरी ती निसटते पण रविराजसारख्या कलाकाराच्या हातात गेल्यावर ती त्याची होऊन जाते. या वाळूशिल्पकार रविराज अर्जुन चिपकर याचा जन्म 16 जानेवारी 1988 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील आरवली-सोन्सुरे येथे झाला. रविराजचे बालपण आध्यात्मिक वातावरणात गेले. आजोबा गणेश मूर्तिकार त्यामुळे त्या मातीची ओढ त्याला स्वस्थ बसू देईना. अगदी चौथी-पाचवीत असताना गणपती बनविण्याचा त्याचा प्रयत्न चालू होता. लहानपणापासूनची ही आवड लक्षात घेऊन घरातून फाईन आर्ट करण्याचा सल्ला त्याला मिळाला. आजोबा, काका आणि आईने दिलेले पाठबळ रविराजला पुढे घेऊन गेले. त्याने कणकवली महाविद्यालयातून फाईन आर्टचे प्रशिक्षण पूर्ण केले. रविराजचे आजोबा शिवसद्गुरू बालदत्तनाथ यांच्या वारसाने, काका मीननाथ चिपकर यांच्याकडून कलेची सुरुवात झाली. आज तेच त्याला विशेष मार्गदर्शन करीत आहेत.

मूर्तिकलेचे पारंपरिक बाळकडू घेऊन जन्मलेल्या शांत, मेहनती रविराजने आपल्या गणेश चित्रशाळेत शाडूच्या मातीने बाप्पा साकारतानाच वेगळा प्रयोग म्हणून वाळूशिल्पामध्ये कौशल्य प्राप्त केले. शिल्पकलेतील भीष्माचार्य राम सुतार यांच्याकडे नोएडात रविराजने सहा महिने शिक्षण घेतले. जे.जे.स्कूल ऑफ आर्टमधील फाईन आर्टचे सुवर्णपदक विजेते दीपक गावडे यांचे या क्षेत्रात रविराजला लहानपणापासूनच मार्गदर्शन लाभले तसेच जे.जे. स्कूलमधील श्रीकांत वलावटे यांनी त्याला मूर्तीकामाबाबत मार्गदर्शन केले. वयाच्या 23व्या वर्षी कोकणातील समुद्रकिनारी महोत्सवात सहभागी होत वाळूशिल्पाचा श्रीगणेशा झाला. 2015 ला मालवणमध्ये भरलेल्या प्रशिक्षण शिबिरात सहभागी झाल्याने त्याला खूप काही शिकता आले. ओडिशातील सुप्रसिद्ध वाळूशिल्पकार सुदर्शन पटनायक यांच्या प्रेरणेने त्याने वाळूशिल्प कलेत प्रवेश केला. सुदर्शन पटनायकांसारख्या जोहरीकडून पारख झाल्यामुळे ओडिशात भरलेल्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनामध्ये हा हिरा चमकला.

वाळूचा वापर करून विविध कलाकुसरीची, प्रबोधनात्मक आणि सामाजिक संदेश देणारी शिल्पे रविराज साकारत आहे. समुद्रकिनार्‍यावरील वाळू आणि पाण्याचा योग्य वापर करून ही शिल्पे बनविली जातात. 2010 मध्ये रविराजने पहिले वाळूशिल्प बनविले ते होते, छत्रपती शिवाजी महाराजांचे! त्यावेळी त्याच्यावर कौतुकाचा प्रचंड वर्षाव झाला, त्यातून स्फूर्ती घेऊन त्याने मागे वळून पाहिलेच नाही.

कार्तिक एकादशीनिमित्त पंढरपूर यात्रेचे औचित्य साधून आरवली सागरतीर्थावर साकारलेले पांडुरंगाचे शिल्प डोळ्याचे पारणे फेडणारेच होते. ह्या 16 इंची शिल्पाला एक तास लागला होता. समुद्रकिनारी फिरण्यासाठी, मौजमजेसाठी आलेल्या लहान मुलांकडून किनार्‍यावर वाळूची घरे बांधताना आपण कुतुहलाने पाहत राहतो, मात्र याला दर्जेदार आकार दिला तर त्यातून सुंदर कलाकृती निर्माण होऊ शकते हे रविराज सिद्ध करून दाखवित आहे. सांताक्लॉजच्या शिल्पातून त्याने 'मास्क वापरा नि सुरक्षित रहा' असा संदेश कोरोनात दिला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईला, वाळूशिल्प साकारून श्रध्दांजली वाहिली, आरवली-सोन्सुरे येथील गजांतलक्ष्मी मंदिरात एका सुंदरशा प्लॅटफॉर्मवर समुद्रकिनार्‍याचा देखावा साकारून गणेश चतुर्थीच्या उत्साहात 'आकर्षक गणराय' दर्शन देण्यास सज्ज झाले होते, नवरात्रीचे औचित्य साधून वाळूशिल्पात 'दुर्गामाता' अवतरली होती. सद्गुरू बालदत्तनाथ यांचे शिल्प मठाजवळच साकारले होते, त्यास तब्बल दहा तास लागले होते.

भारताच्या तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख जनरल बिपिन रावत यांच्या अपघाती मृत्यूने अख्खा देश हळहळला, याने व्यथित झालेल्या रविराजने त्यांचे वाळूशिल्प बनवित आगळ्या-वेगळ्या पध्दतीने त्यांना श्रद्धांजली अर्पण करीत सैन्यदलाप्रती आदरभाव व्यक्त केला. स्वर्गीय गानसम्राज्ञी लता मंगेशकर, श्रेष्ठ-ज्येष्ठ साहित्यिक वि.स.खांडेकर, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, शिवचरित्रकार बाबासाहेब पुरंदरे, सिंधुताई सपकाळ, अजित पवार, ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू शेन वॉर्न आदींची वाळूशिल्पे साकारून त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण केली आहे, त्याचबरोबर राम सुतार यांच्या शंभरीनिमित्त वाळूशिल्पातून मानवंदना दिली. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे अप्रतिम वाळूशिल्प साकारून त्यांना मानाचा मुजरा केला. याचबरोबर गणपती, शंकर-गणपती, बालगणेश, श्रीराम, 3 फुटी पंचमुखी हनुमान आदी देवादिकांची वाळूशिल्पे त्याने बनविली आहेत. असंख्य भक्तांना आवडलेली स्वामी समर्थ आणि गणपतीचे थ्रीडी शिल्प साकारून त्याने भक्तीच्या समीधा बाप्पाचरणी वाहिल्या.

वाळूशिल्पातील स्वामी समर्थ, बाळूमामा, गणराया सोशल मीडियावर व्हायरल होताच तळकोकणातील चाकरमानी, असंख्य पर्यटकांनी 'याचि देही याचि डोळा' अनुभूती घेतली. राष्ट्रीय नेत्यांच्या जयंती-पुण्यतिथ्यांचे औचित्य साधून कौशल्यपूर्ण वाळूशिल्पे आणि त्याचे प्रदर्शन सोन्सुरेसारख्या छोट्या गावात राहून रविराज करतो आहे. आवड म्हणून कलेत पारंगत होऊन करत असलेले कलाविष्कार सोन्सुरे गावाचे लौकिक वाढविणारे आणि प्रेरणादायी आहेत. आपल्या आयुष्यातील अविस्मरणीय प्रसंग सांगताना रविराज म्हणतो, कणकवली येथील भालचंद्र महाराजांची प्रतिकृती बनवत असताना प्रत्येक कलाकाराला अपूर्णतेकडून पूर्णत्वाकडे नेणारा दैवी अनुभव आला आणि अखेर 18 तासांनी ब्रम्हमुहूर्तावर ती प्रतिकृती घडली.

'वाळूचे कण रगडिता 'शिल्प'ही घडे…' अशाप्रकारे आरवली, शिरोडा आदी समुद्रकिनार्‍यांवर गेली 12 वर्षे 350 हून अधिक वाळूशिल्पे रविराजने साकारली आहेत. रांगोळीप्रमाणे वाळूशिल्पेसुद्धा अल्पायुषी असल्याने ती त्यांच्या मूळ रूपात वाळूतच मिसळतात. मनाला होणार्‍या यातना शब्दांत व्यक्त करू शकत नाही. तरीही सृजनाच्या लाटा मनसागरात उसळतच राहतात. निसर्गनियमानुसार वार्‍यानेसुध्दा वाळूशिल्प कोसळण्याची शक्यता असते. ती कायमस्वरूपी टिकावी ही धारणाच नसल्याने नवनिर्मितीचा आस्वाद घेऊन त्याचे निर्माल्य होण्यातच अधिक धन्यता वाटते, असे रविराज म्हणतो. वाळूशिल्प कलेव्यतिरिक्त रविराजमध्ये मूर्तिकलाही भिनलेली आहे. स्वामी समर्थांच्या एक इंच मूर्तीपासून भल्या मोठ्या मूर्तीही तो बनवितो. खडीतून साकारलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे शिल्प बघताना राजांना मनातून मुजरा केल्याशिवाय राहवत नाही. सहज ढिगार्‍यातील खडी चाळत असताना या दगडांनी आकार कधी घेतला हे त्यालाच समजले नाही.

कलावंताकडे साधनेबरोबरच चाणाक्ष, सत्यशोधक, मर्मग्राही अशी नजर असावी लागते याची सुंदर प्रचिती रविराजकडे बघून येते. वाळूशिल्पाबरोबरच रविराजच्या अंगी असलेल्या कलांचा आस्वाद घेण्यासाठी देश-विदेशातून अभ्यासक, पर्यटकही भेटीला आल्यावर त्यांना शिवचैतन्य बालदत्तनाथ मठात आध्यात्मिक अनुभवही घेता येतो. रविराजसारख्या कलाकारांमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा मान उंचावला जातोय, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. रविराजला 'कोकणसाद'चा उत्तम कलाकार म्हणून मत्स्य उद्योग व बंदरे विकासमंत्री तथा पालकमंत्री (सिंधुदुर्ग) नितेश राणे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनाला चालना मिळण्यासाठी पहिले 'विजयश्री वाळूशिल्पकला संग्रहालय' रविराजने तात्पुरत्या स्वरूपात उभे केले होते. आपल्याजवळ जितके आहे, ते दुसर्‍यांना देण्यात मला खूप आनंद वाटतो. आपण शिल्प घडवितो. लोक त्याची मनापासून स्तुतीही करतात. अशा शिल्पकलांचे जतन होण्याच्या दृष्टीने सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एक 'म्युझियम' होण्याची गरज आहे. शासनाने त्यासाठी सहकार्य केल्यास सिंधुदुर्गाच्या सांस्कृतिक आणि पारंपरिक कलासंस्कृतीची एक नवी ओळख जगाला होईल असे मला वाटते. ह्या कलेला मानवंदना देताना रविकलेची किरणे दूरवर पसरून वाळूशिल्पकला प्रकाशमय होवो नि ही सौरऊर्जा अखंड कार्यरत राहो! अल्पायुषी असलेल्या वाळूशिल्पाला चिरायू होण्याचे वरदान लाभो!

(लेखक ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक आहेत.)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar