Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
वांद्र्याच्या गरीब नगरमधील पात्र झोपडीधारकांचे पुनर्वसन कधी? राज्यमंत्र्यांनी सांगितली तारीख

वांद्र्याच्या गरीब नगरमधील पात्र झोपडीधारकांचे पुनर्वसन कधी? राज्यमंत्र्यांनी सांगितली तारीख

मुंबई : वांद्रे पूर्वच्या गरीब नगर परिसरात मे 2026 मध्ये रेल्वे आणि प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण विरोधी मोहीम राबवून सुमारे 500 हून अधिक अनधिकृत झोपड्या पाडण्यात आल्या होत्या.रेल्वे आणि प्रशासनाच्या या कारवाईनंतर बेघर झालेल्या गरीब कुटुंबांचे पुनर्वसन करण्यासाठी आमदार झिशान सिद्दीकी प्रयत्न करताना दिसत आहे.

झिशान सिद्दीकी यांनी यासंदर्भात विधान परिषदेत लक्षवेधी सूचना मांडली होती. यावर राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी उत्तर दिले. दरम्यान, या चर्चेत सदस्य भाई जगताप यांनी सहभाग घेतला.

झिशान सिद्दीकी म्हणाले की, मी विकास किंवा सौंदर्यीकरणाच्या विरोधात नाही, पण गरीबांची घरे तोडून त्यांना बेघर करणे चुकीचे आहे. त्यामुळे गरीब नगरमधील सर्व बाधितांना प्रधानमंत्री आवास योजना किंवा सरकारी योजनेच्या अंतर्गत पर्यायी घरे देणार का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

माधुरी मिसाळ यांनी सांगितले की, मुंबईतील वांद्रे (पूर्व) येथील गरीब नगर परिसरातील पुनर्वसनास पात्र असलेल्या १०० झोपडीधारकांचे १५ ऑगस्टपूर्वी पुनर्वसन करण्यात येणार असून त्यांना ३०० चौरस फुटांची सदनिका उपलब्ध करून दिली जाईल. तसेच न्यायालयाच्या आदेशानुसार केवळ पात्र झोपडीधारकांनाच पुनर्वसनाचा लाभ दिला जाईल. एखाद्या व्यक्तीकडे पात्रतेसंदर्भातील आवश्यक कागदपत्रे असल्यास त्यांची तपासणी करून नियमानुसार न्याय दिला जाईल, असे त्यांनी नमूद केले.

संबंधित रेल्वे प्रकल्पासाठी स्पार्क या संस्थेमार्फत 2018 मध्ये सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यानुसार 141 झोपडीधारकांचे सर्वेक्षण झाले असून त्यापैकी 100 जण पात्र, तर 41 जण अपात्र ठरले आहेत. तसेच न्यायालयाच्या आदेशानुसार सुमारे 600 झोपड्यांपैकी 500 अनधिकृत झोपड्यांवर कारवाई करण्यात आली. पात्र ठरलेल्या 100 झोपड्यांवर कारवाई करण्यात आलेली नाही. त्या ठिकाणी आजही पाणी व वीज यांसारख्या मूलभूत सुविधा पुरविल्या जात आहेत, असेही राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी नमूद केले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar