वसई : दीड दिवसाच्या गणरायाच्या विसर्जनानंतर वसईच्या पाचूबंदर जेटी समुद्रकिनारी मोठ्या संख्येने गणेशमूर्ती फेकलेल्या अवस्थेत आढळून आल्याने संताप व्यक्त होत आहे. विसर्जनासाठी महापालिकेने उभारलेल्या कृत्रिम तलावातीलच या मूर्ती असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
तब्बल दीडशे ते दोनशेहून अधिक गणेशमूर्ती किनाऱ्यावर आढळल्याने विसर्जन व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दीड दिवसाच्या गणेशमूर्तींचे शहरात भक्तीभावाने विसर्जन झाल्यानंतर बुधवारी रात्री वसई पश्चिमेकडील वसई किल्ला आणि पाचूबंदर जेटीजवळ तुटलेल्या मूर्ती अस्ताव्यस्त अवस्थेत दिसून आल्या. या प्रकाराची माहिती मिळताच परिसरात नागरिकांची गर्दी झाली. स्थानिकांनी तातडीने वसई पोलीस आणि महापालिकेला माहिती दिल्यानंतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली.
वसई-विरार महापालिकेने यंदा गणेश विसर्जनासाठी विविध ठिकाणी कृत्रिम तलावांची व्यवस्था केली होती. मात्र या तलावांमध्ये विसर्जित केलेल्या मूर्ती नंतर योग्य पद्धतीने हाताळल्या गेल्या का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. तर मूर्ती भरतीच्या पाण्यामुळे जेटीजवळ वाहून आल्या असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. घटनास्थळी आढळलेल्या मूर्ती महापालिकेने हटवल्या असून, परिसरात पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे.
दरम्यान, वसई न्यायालयाजवळील कृत्रिम तलावातील पाणी ठेकेदाराने गटारात सोडल्यानंतर अडीच दिवसांच्या गणेशमूर्ती पाण्यातच पडून असल्याचा प्रकारही समोर आला आहे. माहिती मिळाल्यानंतर महापालिकेने कचऱ्याच्या गाडीच्या सहाय्याने त्या मूर्ती बाहेर काढल्याचा आरोप भाजपचे गटनेते अशोक शेळके यांनी केला. या प्रकाराची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
या संपूर्ण प्रकारामुळे भाविकांच्या भावना दुखावल्याची प्रतिक्रिया स्थानिक शिवसेना ठाकरे गटाचे विभागप्रमुख दत्ता जाधव यांनी दिली. कृत्रिम तलावातील मूर्ती पाचूबंदर जेटीपर्यंत नेमक्या कशा पोहोचल्या, त्या कुणी हलवल्या आणि विसर्जनानंतर मूर्तींची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी कुणाची होती, याची चौकशी होणे गरजेचे आहे. सहाय्यक आयुक्त संगिता घाडीगावकर यांनी मूर्ती कुठल्या तलावातील आहेत आणि त्या तेथे कुणी आणल्या याचा तपास करून कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले आहे. तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सौरभी पवार यांनी पुढील तपास सुरू असल्याचे सांगितले आहे.

