Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
वसईत विहिरीत बुडून दहावीतील विद्यार्थ्याचा मृत्यू

वसईत विहिरीत बुडून दहावीतील विद्यार्थ्याचा मृत्यू

वसई : वसईच्या माणिकपूर-कुंभारपाडा परिसरातील पाण्याने भरलेल्या विहिरीत बुडून दहावीत शिकणाऱ्या 16 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी (24 ऑगस्ट) दुपारी घडली.

प्रेम प्रवीण सावंत असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. दहावीची परीक्षा संपल्यानंतर मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या प्रेमला पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो बुडाला. घटनेची माहिती मिळताच वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम राबवली आणि प्रेमचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला.

प्रेम हा वसई पूर्वेकडील गोखिवरे येथील दीपदर्शन परिसरात कुटुंबासोबत राहत होता. तो वसईतील जी. जे. वर्तक विद्यालयात इयत्ता दहावीत शिकत होता. शनिवारी सकाळी दहावीची प्रिलिम परीक्षा संपल्यानंतर तो पाच मित्रांसोबत माणिकपूर-कुंभारपाडा परिसरातील विहिरीवर पोहण्यासाठी गेला होता. पोहत असताना दुपारी सुमारे 12 वाजण्याच्या सुमारास पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने प्रेम बुडाल्याची माहिती आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, एका विद्यार्थ्याचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.

दरम्यान, या परिसरातील विहिरीत मुले वारंवार पोहण्यासाठी येत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. यापूर्वी विहिरीभोवती सुरक्षा जाळ्या बसवण्यात आल्या होत्या; मात्र नंतर त्या काढण्यात आल्याने सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. विहिरीभोवती पुन्हा सुरक्षा जाळ्या बसवून अशा दुर्घटना टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. पाण्याने भरलेल्या विहिरी आणि असुरक्षित जलस्रोतांपासून मुलांनी दूर राहावे, तसेच पालकांनीही मुलांच्या सुरक्षेकडे लक्ष द्यावे, असे आवाहन या घटनेच्या पार्श्वभूमीवर करण्यात येत आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar