Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
व्हीआयपी कोट्यातून रेल्वे तिकिटसाठी बोगस लेटर पुरविणारे गजाआड, मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

व्हीआयपी कोट्यातून रेल्वे तिकिटसाठी बोगस लेटर पुरविणारे गजाआड, मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

मुंबई : व्हीआयपी कोट्यातून रेल्वे तिकिटासाठी राज्यपालासह लोकभवन कार्यालयातील बोगस लेटर देणार्‍या 6 जणांच्या एका टोळीला मलबार हिल पोलिसांनी अटक केली आहे. अमरीश ईश्‍वरलाल ठक्कर, तारीक मेहफुज खान, दिपककुमार कन्हैयालाल यादव, विनय विक्रमसिंग रावत, सागर ईश्‍वरलाल ठक्कर आणि क्षत्रुंजय रामकुमार यादव ऊर्फ अनुप ऊर्फ मोहन अशी या सहा जणांची नावे असून यातील अमरिश हा या टोळीचा म्होरक्या आहे.

मुंबईसह गुजरात आणि उत्तर प्रदेशात ही कारवाई करण्यात आली आहे. फेब्रुवारी 2026 रोजी लोकभवन कार्यालयातून मलबार हिल पोलिसांना एक पत्र प्राप्त झाले होते. त्यात अज्ञात व्यक्तीने राज्यपालासह लोकभवनाच्या बोगस लेटरहेडचा वापर करुन व्हीआयपी कोट्यातून काही प्रवाशांचे तिकिट कन्फर्म करण्याचा प्रयत्न केला होता, ज्यानंतर हे प्रकरण प्रामुख्याने समोर आले.

लोकभवनाच्या बोगस लेटरहेडमध्ये संबंधित अधिकार्‍याची बोगस स्वाक्षरी, नाव आणि पदाचा स्टॅम्प मारण्यात आला होता. त्यांचा मोबाईल क्रमांकही बोगस देण्यात आले होते. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर अज्ञात आरोपीविरुद्ध मलबार हिल पोलिसांनी बोगस दस्तावेज बनवून लोकभवन कार्यालयाची फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. या तक्रारीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर गोरवे, पोलीस निरीक्षक दिगंबर बिडवे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय रणजीत चव्हाण, उपनिरीक्षक इंद्रजीत मोहिते, अक्षय चौगुले, पोलीस अंमलदार गुलाबखान पठाण, संतोष लोखंडे, राजेश सरवदे, रामेश्‍वर माचेवाड, सचिन चतुर, आशिष घोरपडे, सत्यवान राऊत, समीर भालेराव आणि जगदेश यांनी तपास सुरु केला होता.

मुंबईसह गुजरात आणि उत्तरप्रदेशातून या पथकाने मुख्य आरोपीसह सहाजणांना अटक केली होती. चौकशीत या टोळीने ही फसवणूक केल्याचे तपासात उघडकीस आले. या टोळीचा म्होरक्या अमरीश ठक्कर असून त्यानेच काही रेल्वे एजंटच्या मदतीने बोगस लेटरहेडवर व्हीआयपी कोट्यातून रेल्वे तिकिट दिल्याचे उघडकीस आले होते. त्यासाठी या टोळीला काही ठराविक रक्कम कमिशन दिले जात होते. त्यांच्याकडून पोलिसांनी बारा मोबाईल फोन, एक लॅपटॉप, सोळा सिमकार्ड, सत्तर क्रेडिट-डेबीट कार्ड, चारशेहून अधिक व्यक्तींची व्हीआयपी बुकींगसंदर्भातील गोपनीय माहितीचा डेटाबेस, दोन बोगस शिक्के, पाच आधारकार्ड, स्टॅम्प पॅण्ड आदी मुद्देमाल जप्त केला आहे. तपासात व्हीआयपी कोट्यातून तिकिट कन्फर्म करुन देणारी ही एक आंतरराज्य टोळी आहे. आरोपींच्या चौकशीतून इतर काही आरोपींचे नावे समोर आली असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम सुरु केली आहे. या टोळीविरुद्ध यापूर्वी कुर्ला, मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस ठाण्यात अशाच प्रकारचे गुन्हे दाखल असल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar