वसई : विरारच्या नारंगी गावात कौटुंबिक वादातून सुनेला धक्का दिल्याने तिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्राची कल्पेश पाटील (वय 28) असे मृत महिलेचे नाव असून, त्या विरार पश्चिम येथील नारंगी गावातील भगत आळी येथे पती व सासरच्या कुटुंबासह राहत होत्या.
या प्रकरणी आरोपी सासरे गणपत पाटील (वय 60) यांना बोळींज पोलिसांनी घटनास्थळावरून ताब्यात घेतले असून नंतर अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्राची पाटील या गुरुवारी सकाळी आपल्या भावासोबत माहेरी जाण्यासाठी निघाल्या होत्या. सासरे शिवीगाळ करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांचा भाऊ विशाल पाटील त्यांना माहेरी घेऊन जाण्यासाठी घरी आला होता. त्यावेळी प्राची आपल्या आठ महिन्यांच्या मुलीला घेत असताना त्यांच्यात आणि आरोपी गणपत पाटील यांच्यात वाद झाला. मुलगी गणपत पाटील यांच्या खांद्यावर असताना तिला ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात वादाचे रूपांतर धक्काबुक्कीत झाले. त्यानंतर आरोपीने प्राची यांना धक्का दिल्याचा आरोप आहे. या धक्क्यामुळे प्राची खाली पडून त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच बोळींज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी गणपत पाटील यांना ताब्यात घेतले. या प्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 105 व 351(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून, पुढील तपास बोळींज पोलीस करत आहेत.

