वसई : विरार पूर्वेतील गोपचरपाडा परिसरात गांजाची विक्री करण्यासाठी आलेल्या तरुणाला अमली पदार्थ विरोधी कक्ष-2च्या पथकाने सापळा रचून ताब्यात घेतले. त्याच्याकडून 54 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असून, या कारवाईत वाहनांसह तब्बल 38 लाख रुपयांचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला आहे.
या प्रकरणातील आणखी एक संशयित फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
विरार पूर्वेतील गोपचरपाडा येथील मकवाना ग्राऊंडजवळ रमाबाई इमारतीसमोर गांजाची विक्री होणार असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी कक्ष-2ला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी बुधवारी दुपारी सापळा रचला. कारवाईदरम्यान राहुल पलई शर्मा (21) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडे विक्रीसाठी ठेवलेला 540 ग्रॅम गांजा आढळून आला. या गांजाची किंमत सुमारे 27 हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
तपास पुढे सुरू असताना राहुलला गांजा उपलब्ध करून देणाऱ्या अल्ताफ इनार हुसैन सय्यद याचे नाव समोर आले. मात्र, कारवाईची चाहूल लागताच तो फरार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान, या कारवाईत गांजासह तब्बल 37 लाख 97 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
जप्त केलेल्या ऐवजात 20 लाख रुपये किमतीची महिंद्रा थार रॉक्स कार, 15 लाख रुपयांची महिंद्रा कार, 2.5 लाख रुपये किमतीची रॉयल एनफिल्ड क्लासिक 650 दुचाकी आणि 20 हजार 70 रुपयांच्या रोख रकमेचा समावेश आहे. त्यामुळे गांजाच्या छोट्या साठ्यासोबत मोठ्या किमतीची वाहने आणि रोकडही जप्त झाल्याने या प्रकरणाचा तपास अधिक महत्त्वाचा ठरला आहे.
या प्रकरणी राहुल शर्मा आणि फरार आरोपी अल्ताफ सय्यद यांच्याविरोधात एनडीपीएस कायदा 1985 मधील कलम 8(क) आणि 20(ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.
ही कारवाई अमली पदार्थ गुन्हे शाखा-२चे प्रभारी पोलीस निरीक्षक शाहूराज रणवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मनीष साबळे आणि संदेश राणे तसेच पोलीस हवालदार नरळे, अजित आणि गायकवाड यांच्या पथकाने केली.

