Sunday, 19 Jan, 8.15 am आपलं व्यासपीठ

मुख्य पान
अविस्मरणीय भूतान सहल भाग ०३

भारताचा शेजारी भूतान हा जागतिक पर्यटन क्षेत्रात रहस्यमय देश म्हणून ओळखला जातो. हिमालयाच्या कुशीत बसलेला हा देश निसर्गसौंदर्याने परिपूर्ण आहेच पण येथील नागरिकही अतिशय आनंदी आहेत. जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात भूतान या देशाची सात दिवस अविस्मरणीय सहल कुटुंबियांसोबत पहिल्यांदाच केली.

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आम्ही विमानाने पश्चिम बंगालच्या बागडोगरा या आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहचलो. त्यानंतर खाजगी ट्रॅव्हल एजंटच्या कारने फुन्सलिंग या भूतान मधील सर्वात पहिल्या गावांमध्ये पोहोचलो. प्रवेश केल्या क्षणी आपण वेगळ्या देशामध्ये आलो आहोत याची जाणीव झाली. सुंदर इमारती छोट्या स्वरूपात प्रत्येक घरापुढे असलेला बागबगीचा आणि कमालीची स्वच्छता यामुळे भूतानचे प्रवेशद्वार समजले जाणाऱ्या या गावामध्ये खूप आनंद वाटला.

या ठिकाणी भारत आणि भूतान यांच्या दरम्यान फक्त एक तार कंपाउंड आहे. भारतामधील लोक रोजच्या दैनंदिन व्यवहारासाठी मुख्य दरवाजातून भूतानमध्ये ये-जा करत असतात. या देशांमध्ये फिरण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम परमिट किंवा व्हिसाची आवश्यकता असते. जो तिथे गेल्यानंतर आपल्याला मिळतो. दुसऱ्या दिवशी परमिट मिळाल्यानंतर तेथील स्थानिक ट्रॅव्हल एजंट मार्फत आम्ही पुढील प्रवास सुरु केला. त्यानंतर आम्ही भूतान देशाची राजधानी थिंफु या शहरांमध्ये पोहोचलो. अत्यंत सुंदर असे राजधानीचे शहर आहे. विशेष म्हणजे संपूर्ण देशामध्ये कुठेही वाहतुकीचा सिग्नल नाही. दुचाकी खूप कमी प्रमाणात आहेत. गरजेचेच वेळेस चार चाकी रस्त्यावर येतात अन्यथा संपूर्ण देशामध्ये पर्यटकांच्या गाड्या सोडून स्थानिक लोक फार कमी प्रमाणात दळणवळण करतात. जगातील सर्वात आनंदी देश म्हणून या देशाची ओळख आहे. संपूर्ण देशाची लोकसंख्या ही आपल्याकडील एखाद्या मोठ्या शहराच्या लोकसंख्येएवढी आहे .

जगातील बहुतेक सर्व देशांचा विकास हा तेथील दरडोई उत्पन्नावरून म्हणजे जीडीपीवरून मोजला जातो. भूतान त्याला अपवाद आहे. येथे नागरिकांचे दरडोई उत्पन्न किती याला फारसे महत्त्व दिले जात नाही तर माणसे किती समाधानी व आनंदी आहेत त्यावरून देशाचा विकास किती झाला हे ठरविले जाते.

जगभरातील अर्थतज्ञ समाधान हवे असेल तर पैसाच तो देऊ शकतो किंवा पैशांने विकत घेता येणार्‍या गोष्टीतून आनंद मिळविता येतो असे सांगतात. तेव्हा भूतान मात्र सगळे काही आहे म्हणजे सुख आहे असे मानत नाही. ३८ हजार किमी परिसराचा हा देश माणसांना पैशांपेक्षाही मोठे मानणारा देश आहे.

अत्यंत सुंदर असे नयनरम्य चित्र संपूर्ण देशामध्ये आपल्याला दिसून येतं. थिंपू मध्ये पाहण्यासाठी मॉनेस्ट्री संग्रहालय ,जोंग पॅलेस ,मोती टाँग्ज ,तसेच टाकीन या प्राण्यांसाठी प्रसिद्ध असणारे प्राणी संग्रहालय आहे. त्याचप्रमाणे खूप मोठ्या प्रमाणात तिबेटियन वस्तू मिळण्याचे हँडीक्राफ्ट मार्केट प्रसिद्ध आहे. जगातील सर्वात मोठी दुसऱ्या क्रमांकाची बुद्धाची मूर्ती येथे आहे. तसेच भूतान मधील एकमेव दुर्गामातेचं मंदिर सुद्धा येथे पहायला मिळेल. येथे दोन दिवस राहिल्यानंतर आम्ही पुढील ठिकाणी म्हणजे पुनाखा येथे जाण्यासाठी निघालो. वाटेतच आम्हांला डोचुला हे गांव लागले. येथे बर्फ पडत असतो. त्याचप्रमाणे येथे एका लढाईत शहिद झालेल्या भूतानच्या १०८ जवानांचं स्मारक उभारण्यात आले आहे. पुढे आम्ही नॅशनल बोटेनिकल पार्क पाहिले. त्यानंतर आम्ही पुनाखा येथे पोहचलो. पूनाखा येथे चिमणी लखांग नावाची मॉनेस्ट्री आहे. ज्या जोडप्यांना मूल - बाळ होत नाही ते जोडपे विशेषतः येथे जात असतात. येथे आम्ही १४ किमीचा रिव्हर राफ्टिंग करण्याचा आनंद घेतला. विविध प्रकारचे बौद्ध धर्मीय प्रार्थना स्थळे आणि तेथील आल्हाददायक हवामान यामुळे येथील दोन दिवस मुक्काम खूपच छान वाटला.

त्यानंतर आम्ही पारो या ठिकाणी आलो. या देशांमधील एकमेव विमानतळ इथे आहे. तसेच सांग मॉनेस्ट्री ,नॅशनल म्युझियम ,हिस्टरी हे देखील येथे पाहण्यासारखे आहे. येथे गेल्यानंतर आम्ही भूतानचा पोशाख परिधान करून फोटोशूट करण्याचा आनंद घेतला. या देशातील सर्वात आकर्षक ठिकाण म्हणजे या देशाच्या राजांचा राजवाडा म्हणजेच पॅलेस !! अत्यंत सुंदर आणि देखणी अशी ही अतिभव्य वास्तू आहे. सायंकाळी साडेचार ते साडेपाच या वेळेत येथे प्रवेश मिळतो. रात्री संपूर्ण राजवाड्यावर ती विद्युत रोषणाई केलेली असते ती खूप पाहण्यासारखी आहे. त्याचप्रमाणे इथे इथले दुसरे आकर्षण म्हणजे उंच पर्वतावरील टायगर नेस्ट मॉनेस्ट्री एक दिवसाचा ट्रेक खरोखर अविस्मरणीय असा आहे. जंगलातून सुमारे १४ किलोमीटरचा हा पर्वत प्रवास आपल्या ट्रीपचे सार्थक लावणार आहे. जर आपण या देशाला भेट देणार असाल तर टायगर नेस्ट मॉनेस्ट्री हे ठिकाण कदापि चुकवू नका. चढण्यासाठी अवघड आहे. परंतु नजरेचे पारणे फेडणारे आहे. त्यामुळे आपण या देशांमध्ये जर जाणार असाल तर पूर्वनियोजन करून जावे.

@ योगेश शामराव शेटे

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Aapla Vyaaspith
Top