Saturday, 01 Feb, 7.00 am आपलं व्यासपीठ

मुख्य पान
जगण्याची साधी सोपी सूत्रे एकशे त्रेपन्न

सांगेन गोष्टी हिताच्याच चार भाग अकरा

घराबाहेर गेल्यावर स्नान, भोजन, जलपान आधी वाहनाला द्यावे. म्हणजे पूर्वीच्या काळी प्रवास रथातून असे, त्यांची व्यवस्था आधी पहावी. केवळ सारथीच नव्हे तर घोडे आदि प्राण्यांचे पोटापाण्याचे आधी पहावे. कारण परतीच्या प्रवासामधे हे वाहन, वा चालक पुनः ताजेतवाने व्हायला हवेत, नाहीतर त्याचा त्रास आपल्यालाच भोगावा लागतो.

अनोळखी ठिकाणी गेल्यावर माहिती नसलेल्या जलाशयात पोहायला अथवा आंघोळीला पण जाऊ नये. मगरीसारखे प्राणी आधी चाहुल लागू न देता हल्ला करतात. बाहुबली करतो, म्हणून बाहुंचे बळ दाखवून, नदीत पोहू नये. उंचसखल वाकड्यातिकड्या पर्वतावर चढू नये, या कड्यावरून त्या कड्यावर माकडासारख्या उड्या मारू नयेत. घसरून पडण्यामुळे, जीवाला धोका संभवू शकतो. पिक्चरमधे दाखवतात, ते सर्व खोटे असते, ब्लु व्हेलसारखे मोबाईल गेम तर प्रत्यक्षात मानसिकताच बदलवून टाकतात, याची जाणीव मुलांना वारंवार करून द्यावी.

पेटलेल्या अग्निसमोरुन जाऊ नये, अग्निकडे पाठ करून कधी बसू नये, अग्निच्या आणि अग्निच्या जवळ बसलेल्या माणसाच्या मधूनही कधी जाऊ नये. अग्निशी विनाकारण खेळ खेळू नये. आज मंकी जंपिंग, रिव्हर राफ्टींग, व्हॅली क्राॅसिंग सारखे साहसी प्रकार केले जातात, तेव्हा सावधगिरी बाळगली पाहिजे.

हे साहस करणे देखील एकवेळ परवडेल, पण प्रत्यक्षात कोणतेही साहस न करता, साहस केल्याचा आभास निर्माण करीत स्वतःचा स्वतः फोटो काढणे हे जास्ती खतरनाक असते. आजच्या मराठी भाषेत याला "सेल्फी" म्हणतात. नाकाला हात बोट न लावता, नाकावरची माशी कशी उडवायची याचे प्रात्यक्षिक किंवा नसलेल्या भुवया ताण ताण ताणून त्याची धनुकली करायची, आणि ओठ जेवढे होतील तेवढे डुकराच्या तोंडासारखे करायचे, आणि हे सगळं करताना, एका हाताने अधांतरी राहात, दुसऱ्या हाताच्या तीन बोटानी मोबाईल सांभाळत, करंगळी मागे उचलून एका बोटाने फोटो काढायचा. महाडेंजरस. ग्रंथकार ग्रंथ लिहित होते, त्यावेळी जर हा सेल्फी प्रकार पाहिला असता तर त्याच्यावर तीन चार श्लोक तरी रचले असते.

हे सर्व आपला जीव सुरक्षित रहावा यासाठी सांगितलेले आहे.

याचा अर्थ असा नव्हे की, साहस करूच नये, गिर्यारोहण करूच नये, नदीमधे पोहूच नये. हे सर्व करताना आधी आपल्या सर्व क्षमतांचा विचार करावा. आपल्या सोबत ( नंतर ओरड मारायला तरी ) कुणीतरी असावे. एवढेच. बाकी व्हा बाहुबली !

वैद्य सुविनय दामले
कुडाळ सिंधुदुर्ग
02362223423

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Aapla Vyaaspith
Top