Sunday, 19 Jan, 7.52 pm आपलं व्यासपीठ

मुख्य पान
पोलिसांसाठी प्रत्येक जिल्ह्यात नेमबाजी प्रशिक्षण केंद्र - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

पुणे : नेमबाजी हा श्वासावर नियंत्रण ठेवणारा उत्तम योगाचा प्रकार आहे. पोलिसांच्या उत्तम स्वास्थ्यासाठी शासन कटिबद्ध असून राज्यात प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी पोलिसांसाठी नेमबाजी प्रशिक्षण केंद्र उभारणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केली. पोलीस विभागाने तातडीने प्रस्ताव सादर करण्याची सूचना त्यांनी यावेळी केली.
म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे तेराव्या अखिल भारतीय पोलीस नेमबाजी (क्रिडा) अजिंक्यपद स्पर्धेचा समारोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विधान परिषद उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे, खासदार श्रीरंग बारणे, पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल ज्येष्ठ महिला नेमबाज चंद्रो तोमर, श्रीमती प्रकाशी तोमर (शुटर दादी), पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, निवृत्त पोलीस अधिकारी टी. एस. धिल्लन, रितू छाब्रिया उपस्थित होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, कोणत्याही स्पर्धेत जय-पराजय या गोष्टी होतच असतात. मात्र या स्पर्धेच्या निमित्ताने पोलीस दलाच्या नेमबाजीतील गुण तक्त्यामुळे समाजातील अपप्रवृत्तीवर दहशत बसेल. हा खेळ श्वासावर नियंत्रण राखणारा मेंदूच्या योगाचा आणि मन:शांतीचा उत्तम पर्याय आहे. याचसाठी मला नेमबाजीचा छंद आहे.
जिद्द असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही, असे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, तोमर दादी या देशाच्या प्रेरणा आहेत. देशातील पोलिसांचा नेम अचूक असणे आवश्यक आहे. पोलिसांच्या चांगल्या स्वास्थ्यासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्नशील आहे. त्यासाठी आवश्यक असणारी प्रत्येक गोष्ट आम्ही करणार आहोत. पोलिस व संरक्षण दलामुळेच सर्वसामान्य लोक निश्चिंत असतात. अचूकता आणि शिस्त हे पोलीस दलाचे वैशिष्ट्य आहे. विजेत्यांचे अभिनंदन मात्र पुढच्या स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाने विजेतेपद मिळवावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
पोलीस दलाच्या लेझीम आणि बॅगपायपर पथकाने सादरीकरण करत सर्वांची मने जिंकली. त्यानंतर स्पर्धेत सहभागी झालेल्या विविध राज्यातील पोलीस पथकांनी संचालन करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सलामी दिली. सीआरपीएफ पथकाने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले.
साभार : महान्यूज

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Aapla Vyaaspith
Top