Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
जळगावच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण; गुलाबराव पाटील भाजपच्या वाटेवर?

जळगावच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण; गुलाबराव पाटील भाजपच्या वाटेवर?

Image Source:(Internet)

ळगाव : विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीपूर्वी महायुतीतील जागावाटपाचा तिढा अधिकच गुंतागुंतीचा होताना दिसत आहे. जळगावची जागा भाजपच्या वाट्याला जाण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने शिवसेना शिंदे गटात नाराजीची चर्चा रंगली आहे.

या पार्श्वभूमीवर राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील आणि त्यांचे पुत्र प्रताप पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील संख्याबळाचा आधार घेत शिवसेना शिंदे गटाने जळगाव विधान परिषद मतदारसंघावर दावा केला होता. प्रताप पाटील यांना उमेदवारी मिळावी यासाठी गुलाबराव पाटील यांनी पक्ष नेतृत्वाकडे पाठपुरावा केल्याचे सांगितले जाते. यासाठी स्थानिक स्तरावर राजकीय हालचालींनाही वेग आला होता. मात्र, उत्तर महाराष्ट्रातील आपली राजकीय ताकद कायम ठेवण्याच्या उद्देशाने भाजप ही जागा सोडण्यास तयार नसल्याचे संकेत मिळत आहेत.

यामुळे शिंदे गटाच्या अपेक्षांवर पाणी फिरल्याची चर्चा सुरू असतानाच गुलाबराव पाटील आणि त्यांचे पुत्र भाजपमध्ये जाणार असल्याच्या अफवांनी जोर धरला आहे. या चर्चांबाबत विचारणा करण्यात आल्यानंतर गुलाबराव पाटील यांनी सावध प्रतिक्रिया देत आपली भूमिका स्पष्ट केली.

'४५ वर्षांची शिवसेनेतील निष्ठा विसरू नका'
प्रवेशाच्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना गुलाबराव पाटील म्हणाले, "मी गेली ४५ वर्षे शिवसेनेत काम केले आहे आणि आजही शिवसेनेचाच मंत्री आहे. माझ्या निष्ठेबाबत शंका उपस्थित करणे योग्य नाही."

तसेच जळगावच्या जागेबाबत आपण दोन वेळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केल्याचे त्यांनी सांगितले. "एकाच विषयावर वारंवार बोलणे योग्य नाही. अखेर महायुतीतील प्रमुख नेतेच जागावाटपाचा अंतिम निर्णय घेतील," असेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान, महायुतीतील जागावाटपाचा अंतिम निर्णय लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यानंतर जळगावच्या राजकारणात मोठे राजकीय बदल घडतात का, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Abhijeet Bharat