Dailyhunt
खरा धर्म धोक्यात; भाजपच्या विजयावर ठाकरे गटाचा गंभीर आरोप

खरा धर्म धोक्यात; भाजपच्या विजयावर ठाकरे गटाचा गंभीर आरोप

Image Source:(Internet)

वी दिल्ली : पश्चिम बंगालमधील निवडणूक निकालांनंतर राजकीय वातावरण तापले असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने भाजपवर जोरदार टीका केली आहे. भारतीय जनता पक्षने पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचा पराभव करत मिळवलेल्या विजयावर ठाकरे गटाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

पक्षाच्या मुखपत्रातील अग्रलेखात म्हटले आहे की, "पाच राज्यांतील निकाल भाजपसाठी मोठा टप्पा ठरला असला तरी हे निकाल सरळ मार्गाने लागले, असे दिसत नाही." देशात वाढत्या अत्याचारांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक विजय साजरा केला जात असल्याची टीकाही करण्यात आली आहे.


"धर्माच्या नावाखाली विकृती"-

अग्रलेखात पुढे म्हटले आहे की, मुलींवरील अत्याचारांच्या घटना घडत असताना निवडणूक विजयाचा उत्सव साजरा होणे हे लोकशाहीचे भयावह रूप दर्शवते. "अशा विकृतीला जर धर्माचा विजय म्हणत असतील, तर खरा धर्मच बुडताना दिसत आहे," अशा शब्दांत ठाकरे गटाने संताप व्यक्त केला.

मोदी-शहा आणि निवडणूक प्रक्रियेवर आरोप
पक्षाने नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावरही थेट निशाणा साधत, याआधी ममता बॅनर्जी यांचा पराभव करण्यात अपयश आले होते, मात्र यावेळी परिस्थिती वेगळी असल्याचा दावा केला आहे. निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावरही पक्षाने टीका करत, त्यांच्या भूमिकेमुळे भाजपला फायदा झाल्याचा आरोप करण्यात आला.

तसेच, पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात अर्धसैनिक दल तैनात करणे, अधिकारी बदलणे आणि मतदार याद्यांमधून लाखो नावे वगळली गेल्याचा आरोपही अग्रलेखात करण्यात आला आहे.

हा जनतेचा कौल नाही-
सध्याचे निकाल हे जनतेचा कौल नसून निवडणूक आयोगाच्या मदतीने लावलेले निकाल असल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाने केला आहे. "लोकशाहीतील निवडणुका निष्पक्ष असतील तर पराभवही मान्य करता येतो. मात्र, सध्याच्या परिस्थितीत निवडणूक प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे," असे मत व्यक्त करण्यात आले.

यासोबतच, न्यायालयीन व्यवस्थेवरही अप्रत्यक्ष टीका करत, सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचाही मार्ग कठीण होत चालल्याचे पक्षाने नमूद केले आहे. देशातील लोकशाही मूल्यांवर धोका निर्माण झाल्याची भावना ठाकरे गटाने व्यक्त केली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Abhijeet Bharat