Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
लाडकी बहीण योजनेतील अपात्र महिलांची पुन्हा होणार छाननी,पात्र लाभार्थींना न्याय मिळणार; बावनकुळेंचे आश्वासन

लाडकी बहीण योजनेतील अपात्र महिलांची पुन्हा होणार छाननी,पात्र लाभार्थींना न्याय मिळणार; बावनकुळेंचे आश्वासन

Image Source:(Internet)

नागपूर : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून सुमारे ८१ लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आल्याच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण तापले असताना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले आहे.

अपात्र ठरलेल्या प्रकरणांची पुन्हा समितीमार्फत तपासणी करण्यात येणार असून, पात्र असलेल्या महिलांना योजनेचा लाभ मिळेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

लाडकी बहीण योजनेतील मोठ्या प्रमाणावरील अपात्रतेच्या निर्णयावर विरोधकांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे नेते जयंत पाटील यांनी हा प्रकार राज्याच्या आर्थिक स्थितीबाबत गंभीर प्रश्न निर्माण करणारा असल्याचे म्हटले. तर आमदार रोहित पवार यांनी ई-केवायसीची अट पुढे करून लाभार्थ्यांची संख्या कमी करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला.

काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार तसेच ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनीही सरकारवर टीकेची झोड उठवली. या पार्श्वभूमीवर नागपुरात पत्रकारांशी संवाद साधताना बावनकुळे म्हणाले की, काही लाभार्थी निर्धारित निकषांमध्ये बसत नसल्यामुळे त्यांची नावे वगळण्यात आली आहेत. मात्र, यामध्ये कुठल्याही पात्र महिलेला अन्याय होऊ नये यासाठी सर्व प्रकरणांची फेरतपासणी केली जाणार आहे.

महायुतीच्या विजयाचा दावा-
यावेळी विधानपरिषद निवडणुकीबाबत बोलताना बावनकुळे यांनी महायुतीच्या सर्व उमेदवारांच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला. १७ पैकी १७ जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून येतील आणि युतीला मोठे यश मिळेल, असा दावा त्यांनी केला.

जागावाटपाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, भारतीय जनता पक्ष ११, शिवसेना (शिंदे गट) ४ आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) २ जागांवर निवडणूक लढवत आहे. सर्व घटक पक्षांमध्ये पूर्ण समन्वय असून विजय निश्चित असल्याचे त्यांनी नमूद केले.

राणा दाम्पत्य महायुतीसोबतच राहणार-
अमरावतीतील राजकीय घडामोडींवर भाष्य करताना बावनकुळे म्हणाले की, माजी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे दोघेही अनुभवी नेते आहेत. काही स्थानिक स्तरावरील मतभेद असले तरी ते महायुतीसोबतच राहतील. यासंदर्भात आपण स्वतः त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

विरोधकांवर पलटवार-
विजय वडेट्टीवार यांच्या आरोपांना उत्तर देताना बावनकुळे यांनी काँग्रेसने आपल्या पक्षातील नाराजीची कारणे शोधण्याची गरज असल्याचे म्हटले. महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरही त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधत, आरक्षण विधेयकाला ठाम पाठिंबा न दिल्यामुळे महिलांना व्यापक प्रतिनिधित्वाची संधी गमवावी लागल्याचा आरोप केला.

शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यांवर प्रतिक्रिया देताना बावनकुळे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश विकासाच्या मार्गावर वेगाने पुढे जात आहे. राष्ट्रहित, विकास आणि विकसित भारताच्या ध्येयामुळे जनतेत मोदींबद्दलचा विश्वास आणि आदर वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Abhijeet Bharat