Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
मान्सूनची प्रतीक्षा वाढली; केरळात आगमन लांबले, महाराष्ट्रातही उशिराची शक्यता

मान्सूनची प्रतीक्षा वाढली; केरळात आगमन लांबले, महाराष्ट्रातही उशिराची शक्यता

ImgSource(Internet)

मुंबई : देशभरातील नागरिक ज्या मान्सूनची आतुरतेने वाट पाहत आहेत, त्याच्या आगमनाला आता आणखी विलंब होण्याची क्यता व्यक्त करण्यात आली आहे. आधी १ जूनला केरळमध्ये मान्सून दाखल होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता.

मात्र आता हवामान विभागाने नवीन अपडेट देत मान्सून ३ ते ४ जूनदरम्यान केरळ किनारपट्टीवर पोहोचू शकतो, असे सांगितले आहे.

मान्सूनचा वेग सध्या मंदावल्याने त्याचा परिणाम महाराष्ट्राच्या आगमनावरही होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अंदमान आणि श्रीलंकेजवळ सक्रिय झालेला मान्सून भारताच्या दिशेने सरकत असला तरी त्याची गती कमी झाल्याचे हवामान तज्ज्ञांनी नमूद केले आहे.

बंगालच्या उपसागरातील चक्राकार परिस्थितीमुळे नैऋत्य मोसमी वाऱ्यांची ताकद कमी झाली आहे. त्यामुळे मान्सूनच्या पुढे सरकण्याच्या प्रक्रियेला विलंब होत असल्याचे सांगितले जात आहे. हवामान विभागाने या स्थितीला 'मृदू मान्सून आगमन' असे संबोधले आहे.

दरम्यान, कोकण किनारपट्टी भागात उष्णतेसोबतच अधूनमधून प्री-मान्सून पावसाच्या सरी कोसळत आहेत. २९ मे ते १ जूनदरम्यान काही भागांत वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस होण्याचा अंदाज आहे. ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी सुरू आहेत. मात्र वातावरणातील आर्द्रता वाढल्याने उकाड्यातही वाढ झाली आहे. पुढील काही दिवसांत तापमानात ३ ते ४ अंशांनी वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

तर मुंबई शहरातही दमट हवामानामुळे नागरिक हैराण झाले आहेत. कमाल तापमान ३४ ते ३६ अंश सेल्सिअसदरम्यान नोंदवले जात असून हवेत आर्द्रतेचे प्रमाण वाढले आहे. रविवारी आणि सोमवारी मुंबई, ठाणे आणि उपनगरांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

प्रशासनाने नागरिकांना पुरेसे पाणी पिणे, दुपारच्या उन्हात बाहेर पडताना काळजी घेणे आणि आवश्यक असल्यासच घराबाहेर पडण्याचे आवाहन केले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Abhijeet Bharat