Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
मुख्यमंत्रीपदाच्या चर्चांदरम्यान मोठी कारवाई; कर्नाटकातील मंत्र्यांच्या जावयावर ईडीची धाड

मुख्यमंत्रीपदाच्या चर्चांदरम्यान मोठी कारवाई; कर्नाटकातील मंत्र्यांच्या जावयावर ईडीची धाड

Image Source:(Internet)

बंगळुरू : कर्नाटकच्या राजकारणात चर्चेत असलेले सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या कुटुंबाशी संबंधित व्यक्तीवर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई केली आहे.

जारकीहोळी यांचे जावई आणि बेळगावचे अतिरिक्त उत्पादन शुल्क आयुक्त वाय. मंजुनाथ यांच्या निवासस्थानासह राज्यातील विविध ठिकाणी ईडीने एकाच वेळी छापेमारी केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बेळगाव, म्हैसूर, बंगळुरू आणि हसन जिल्ह्यातील आरसिकेरेसह सहा ठिकाणी ईडीच्या पथकांनी शोधमोहीम राबवली. या कारवाईदरम्यान वाय. मंजुनाथ यांच्याशी संबंधित आर्थिक व्यवहार आणि मालमत्तेशी संबंधित कागदपत्रांची तपासणी करण्यात आली.

सूत्रांच्या माहितीनुसार, ईडीने मंजुनाथ यांच्या काही निकटवर्तीयांच्या घरांवर आणि मालमत्तांवरही धाड टाकली. म्हैसूरमधील एका मित्राचे घर, बंगळुरूमधील अपार्टमेंट, आरसिकेरे येथील मालमत्ता तसेच बेळगाव जिल्ह्यातील काही ठिकाणांची तपासणी करण्यात आल्याचे समोर आले आहे.

अवैध मालमत्तेच्या व्यवहारांचा संशय-
वाय. मंजुनाथ यांच्यावर बेनामी व्यवहारांद्वारे जमीन, बार आणि रेस्टॉरंट व्यवसायात गुंतवणूक करून अवैध संपत्ती जमा केल्याचा आरोप आहे. याच अनुषंगाने ईडीकडून आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

छापेमारीदरम्यान काही महत्त्वाची कागदपत्रे आणि आर्थिक व्यवहारांशी संबंधित माहिती तपास यंत्रणांच्या हाती लागल्याची चर्चा असली, तरी याबाबत ईडीकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी करण्यात आलेले नाही.

राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण-
सतीश जारकीहोळी हे कर्नाटक काँग्रेसमधील प्रभावशाली नेते मानले जातात. काही दिवसांपूर्वी राज्यातील नेतृत्वबदलाच्या चर्चांमध्ये त्यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी संभाव्य दावेदार म्हणूनही पुढे आले होते. अशा परिस्थितीत त्यांच्या जावयाशी संबंधित व्यक्तींवर झालेल्या ईडी कारवाईमुळे राजकीय चर्चांना नवे वळण मिळाले आहे.

दरम्यान, ईडीच्या तपासातून आणखी कोणते खुलासे होतात आणि वाय. मंजुनाथ यांच्याविरोधात पुढे काय कारवाई होते, याकडे आता संपूर्ण कर्नाटकचे लक्ष लागले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Abhijeet Bharat