Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
मुंबईत मुसळधार पावसाचा तडाखा; मेट्रो सेवा ठप्प, दुपारच्या सत्रातील शाळांना सुट्टी

मुंबईत मुसळधार पावसाचा तडाखा; मेट्रो सेवा ठप्प, दुपारच्या सत्रातील शाळांना सुट्टी

Image Source:(Internet)

मुंबई आणि उपनगरांमध्ये शनिवारी सकाळपासून पावसाने जोरदार हजेरी लावली असून अनेक भागांत जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुसळधार पावसामुळे सखल परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले असून नागरिकांना वाहतुकीसह विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे.

अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली आणि बोरिवली परिसरात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिल्याने प्रशासनाने नागरिकांना समुद्रकिनारे आणि पाणी साचणाऱ्या भागांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान, मुसळधार पावसाचा फटका मुंबई मेट्रो सेवेलाही बसला आहे. कांदरपाडा ते आनंदनगर स्थानकांदरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने मेट्रो मार्ग २अ वरील सेवा विस्कळीत झाली आहे. दहिसर पूर्व ते कांदरपाडा या दरम्यान तांत्रिक बिघाड झाल्यामुळे अनेक प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. मुख्य रस्त्यांवर पाणी साचल्याने बस आणि खासगी वाहनांची वाहतूकही संथ गतीने सुरू आहे.

पावसाची तीव्रता लक्षात घेऊन बृहन्मुंबई महानगरपालिका आणि शिक्षण विभागाने शनिवारी, ४ जुलै २०२६ रोजी मुंबईतील सर्व सरकारी तसेच खासगी शाळांच्या दुपारच्या सत्राला सुट्टी जाहीर केली आहे. सकाळी शाळेत उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे घरी पाठवण्याच्या सूचना मुख्याध्यापकांना देण्यात आल्या आहेत. सकाळी ८.३० ते ११.३० या तीन तासांच्या कालावधीत कुलाबा येथे २९ मिमी, तर सांताक्रूज येथे ४८.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

प्रशासनाच्या माहितीनुसार, पुढील काही तास पालघर, ठाणे, रायगड आणि जळगाव जिल्ह्यांसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. त्यामुळे संबंधित यंत्रणा सतर्क करण्यात आली असून वसई-विरार महानगरपालिका प्रशासनही आपत्ती व्यवस्थापनासाठी सज्ज झाले आहे. विरार पश्चिमेतील नवीन कॉलेज परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने मुख्य रस्ता नदीसारखा दिसत आहे.

विरार रेल्वे स्थानकाकडे जाणारे मार्ग पाण्याखाली गेल्याने दुचाकी, रिक्षा आणि इतर लहान वाहनांची वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे प्रवाशांना स्थानकापर्यंत पोहोचवण्यासाठी ट्रॅक्टरची मदत घेतली जात आहे. परिसरातील साचलेल्या पाण्याचा तातडीने निचरा करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून प्रशासनाकडे करण्यात येत आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Abhijeet Bharat